शरद पवार आणि भाजपा हे समीकरण कधीही जुळणं शक्य नाही असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. “अजित पवार यांनी जेव्हा भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापन केली होती. तेव्हा काही क्षणांसाठी असं वाटलं की सगळं संपलं. मात्र त्यादिवशी काही वेळातच हे स्पष्ट झालं होतं की शरद पवार यांचा या सगळ्याला पाठिंबा नाही. त्या दिवशी जे काही घडलं ते अपेक्षित नव्हतं. मात्र शरद पवार हे भाजपासोबत जाणं, हातमिळवणी करणं हे कधीही शक्य नाही याची खात्री मला पटली.

भाजपा, राष्ट्रीय  स्वयंसेवक संघ या सगळ्यांबाबत माझी मतं काय आहेत? हे सगळ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. त्यामुळे त्या धर्मांध शक्तीविरोधात जे कोणी एकवटले त्यांना आम्ही सोबत घेणारच. भले ती शिवसेना का असेना. भाजपाविरोधात जे काही एकवटतील त्यांना आम्ही सोबत घेऊ असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जितेंद्र आव्हाड यांनी ही भूमिका मांडली.

लोकसभा निवडणुकीनंतर मराठा समाज काहीसा भाजपाकडे झुकला होता. मात्र मराठा समाज नाराज झाला तो शरद पवारांवर झालेल्या टीकेमुळे. तसंच त्यांना ईडीची नोटीसही पाठवण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या देवेद्र फडणवीस यांचं एक वाक्य आलं की शरद पवार यांचं राजकारण संपलं. यानंतर भाजपाकडे झुकलेला मराठा समाज हा नाराज झाला. त्याचाही फटका भाजपाला बसला असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.