शेअर बाजाराची कार्यपद्धती, गुंतवणूकदारांना असलेले संरक्षण, सध्याच्या गुंतवणूक विश्वात शेअर्स डिमॅटचे महत्त्व आणि ताजे विमा पॉलिसींच्या डिमॅटची प्रक्रिया वगैरेविषयी सोप्या भाषेत माहिती देणारा ‘श.. शेअर बाजाराचा’ हा लोकप्रिय कार्यक्रम येत्या मंगळवारी, २५ मार्च सायंकाळी ६ वाजता प्रबोधनकार ठाकरे लघु नाटय़गृह, चौथा मजला, बोरिवली (प.) येथे आयोजित करण्यात आला आहे.
‘लोकसत्ता’ आणि ‘सीडीएसएल’ यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा हा कार्यक्रम संपूर्ण विनामूल्य असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर इच्छुकांना प्रवेश दिला जाईल.
सीडीएसएलच्या गुंतवणूकदार शिक्षण विभागाचे प्रमुख चंद्रशेखर ठाकूर हे उपस्थितांना स्लाइड शोच्या माध्यमातून मार्गदर्शन करतील. ठाकूर संबोधित करीत असलेला हा ९६८ वा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात उपस्थितांना डिमॅटविषयी सुबोध पुस्तिका मोफत दिल्या जातील. प्रसिद्ध गुंतवणूक विश्लेषक व्ही. के. शर्मा गुंतवणूकदारांना बाजारातील सद्यस्थितीविषयी मार्गदर्शन करतील. दोन्ही वक्ते उपस्थितांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्न-शंकांचेही समाधान करतील. एचडीएफसी सिक्युरिटीज् लिमिटेडने या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे.