शीना बोरा हत्याकांडाचा तपास योग्य अधिकाऱयांच्या समूहाकडून केला जाईल, असे मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी मंगळवारी स्पष्ट केले. अहमद जावेद यांनी मंगळवारी दुपारी मावळते पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडून पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. गृह विभागाने मंगळवारी सकाळी राकेश मारिया यांची बढतीवर होमगार्डचे महासंचालक म्हणून आणि त्यांच्या जागी अहमद जावेद यांची मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त केली.
मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून आपल्यापुढे कोणती आव्हाने आहेत, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत. गणपती उत्सव काही दिवसांवर आला आहे. हे सर्व उत्सव शांततेत पार पडावेत, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. प्रत्येक गुन्ह्याचा तपास कायदेशीर पद्धतीने करण्यावरच आमचा भर राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शीना बोरा हत्याकांडाच्या तपासाबद्दल ते म्हणाले, या गुन्ह्यातील सर्व आरोपींना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील काळात त्याचा तपास योग्य अधिकाऱयांकडून केला जाईल.