राज्यभरातील मंदिरं उघडण्यासाठी भाजपाच्यावतीने आज राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आलं आहे. ठिकठिकाणी भाजपा नेते व पदाधिकारी हे आंदोलन करताना दिसत आहेत. तसेच, राज्यातील महाविकासआघाडी सरकारसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर सत्तेत असलेल्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे. हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी! असं शेलार यांनी म्हटलं आहे.

“जे कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेमध्ये “शेजारी-शेजारी” बसलेत. यानीच अयोध्येत रामाच्या मंदिराचे भूमीपुजन ई पद्धतीने करा, असे अनाहूत सल्ले दिले होते. “भारत तेरे तुकडे हो हजार” म्हणाऱ्यांचे मुंबईत स्वागत केले.त्यांच्या कार्यक्रमाला हे चालले होते. एवढेच नाहीतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची संगत ज्यांनी केली. याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना मुंबईचे पालकमंत्री ज्यांनी केले. पंढरपूरात जाऊन विठ्ठलाच्या मुर्तीला स्पर्श ही ज्यांनी केला नाही. हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी!” अशा शब्दांमध्ये ट्विट करून शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

आणखी वाचा- साईमंदिर सुरु करा ही मागणी करत शिर्डीतही भाजपाचं आंदोलन

बार उघडले, रेस्तराँ उघडले मग मंदिरं आणि मशिदी बंद का? धर्मस्थळं बंद का? असा प्रश्न भाजपाच्या आंदोलकांनी राज्य सरकारला केला आहे. बार आणि रेस्तराँ सुरु करणाऱ्या ठाकरे सरकारला मंदिरं बंद ठेवताना लाज वाटत नाही का? असाही प्रश्न या आंदोलकांनी विचारला आहे.

आणखी वाचा- …तर प्रत्येक भाषणाच्या सुरूवातीला हिंदूह्रदयसम्राट म्हणा; ठाकरेंना चंद्रकांत पाटील यांचं आव्हान

दुसरीकडे राज्यातील मंदिर खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची आठवण करून देणारं पत्र लिहिलं आहे. ”एकीकडे सरकार बार, रेस्टॉरंट खुले करत आहेत. तर देवीदेवतांना मात्र अजूनही लॉकडाउनमध्येच ठेवलं आहे. मागील तीन महिन्याच्या काळात अनेक शिष्टमंडळांनी या संदर्भात माझी भेट घेतली आहे. तुम्ही हिंदुत्वाचे कट्टर समर्थक आहात. तुम्ही हे सार्वजनिकरित्या मान्यही करता. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तुम्ही आयोध्येलाही गेला होता. तुम्ही पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुख्मिणीचीही पूजा केली. अनेक राज्यात मंदिर खुली करण्यात आली असून, महाराष्ट्रातही करोना मार्गदर्शक सूचनाची अंमलबजावणी करून मंदिर खुली करण्यात यावी.” असं राज्यपालांनी पत्रात म्हटलं आहे.

आणखी वाचा- माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचं राज्यपालांना उत्तर

लॉकडाउन शिथिल केला जात असतानाच राज्यात मंदिर खुली करण्याची मागणी जोर धरायला लागली होती. मंदिर खुली करण्यासंदर्भात भाजपा, वंचित बहुजन आघाडीसह इतर संघटनांनीही आंदोलनं देखील केली होती. मात्र, करोना वाढीचा धोका असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी तूर्तास मंदिर खुली होणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर काही दिवसांपूर्वी ‘घंटानाद’ आंदोलन करण्याऱ्या भाजपानं आता मंदिर खुली करण्यासाठी आज पुन्हा एकदा आक्रमक होत राज्यभरात आंदोलन सुरू केली आहेत.