04 August 2020

News Flash

शेकापची अवस्था ‘खटारा’ चिन्हाप्रमाणेच !

एकमेव आमदाराचा भाजपला पाठिंबा

(संग्रहित छायाचित्र)

संतोष प्रधान

शेतकरी कामगार पक्षाचे निवडणूक चिन्ह खटारा. राज्याच्या राजकारणात एकेकाळी मुख्य विरोधी पक्षाची भूमिका बजाविलेल्या या पक्षाची अवस्था खटारा या निवडणूक चिन्हासारखी झाली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा एकमेव आमदार निवडून आला असला तरी तोही उपरा आहे.

शेतकरी कामगार पक्ष राज्याच्या राजकारणात एकेकाळी प्रबळ विरोधी पक्ष मानला जायचा. १९४७ मध्ये काँग्रेसमधील काही नेत्यांनी एकत्र येऊन शेकापची स्थापना केली होती. काँग्रेस पक्ष भांडवलशाहीचे समर्थन करीत असून, शेतकरी आणि कामगारांच्या हिताला प्राधान्य दिले जात नाही, असा आक्षेप काँग्रेसमधील काही नेत्यांचा होता. शंकरराव मोरे यांच्या पुढाकाराने या पक्षाची स्थापना झाली. केशवराव जेधे, तुळशीदास जाधव, शंकरराव मोहिते-पाटील, यशवंतराव मोहिते, आनंदराव चव्हाण आदी बडी मंडळी तेव्हा शेकापमध्ये दाखल झाली होती. काँग्रेसची एकहाती सत्ता असताना शेकाप प्रमुख विरोधकाची भूमिका बजावीत असे. १९६० ते १९७२ या काळात शेकापकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद होते. कृष्णराव धुळप यांनी दहा वर्षे विरोधी पक्षनेतेपद भूषविले. याशिवाय दि. बा. पाटील, गणपतराव देशमुख, दत्ता पाटील यांनाही हे पद भूषविण्याची संधी मिळाली. १९९९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये शेकापचे गणपतराव देशमुख यांनी रोजगार हमी खात्याचे मंत्रिपद भूषविले होते. गणपतराव देशमुख हे पाच दशके विधानसभेचे सदस्य होते.

बेरजेच्या राजकारणात धक्का

शेकापला पहिला धक्का दिला तो राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी. बेरजेच्या राजकारणात यशवंतरावांनी शेकापमधील अनेक नेत्यांना काँग्रेसमध्ये दाखल करून घेतले. त्यात विजयसिंह मोहिते-पाटील यांचे वडील शंकरराव मोहिते, पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील आनंदराव चव्हाण, तुळशीदास जाधव, यशवंतराव मोहिते आदी अनेक नेत्यांचा समावेश होता. यानंतरही प्रा. एन. डी. पाटील व अन्य नेत्यांनी शेकापचे अस्तित्व कायम ठेवले. विधानसभेत केशवराव धोंडगे हे किल्ला लढवीत असत. १९९०च्या दशकापर्यंत शेकापची ताकद बऱ्यापैकी होती. यानंतर पक्षाची पीछेहाट होत गेली. अलीकडे तर शेकाप हा रायगड जिल्ह्य़ापुरताच मर्यादित पक्ष झाला होता. अलिबाग, पनवेल, पेण या पट्टय़ातच पक्षाची ताकद उरली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्य़ात शेकापचा एकही आमदार निवडून आला नाही. मूळ कुलाबा व सध्याच्या रायगड जिल्ह्य़ात शेकापची पाटी पहिल्यांदाच कोरी राहिली.  शेकाप तसेच पक्षाचे नेते आमदार भाई जयंत पाटील यांना हा मोठा धक्का मानला जातो. ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख हे ११ वेळा विधानसभेवर निवडून आले होते. प्रकृती साथ देत नसल्याने त्यांनी यंदा निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. याऐवजी गणपतरावांच्या नातवाला उमेदवारी देण्यात आली होती. पण आजोबांप्रमाणे नातवाला मतदारांनी साथ दिली नाही. शिवसेनेच्या शहाजी पाटील यांनी देशमुख यांच्या नातवाचा पराभव केला.

एकमेव आमदाराचा भाजप बरोबर

नांदेड जिल्ह्य़ातील लोहा मतदारसंघातून शामसुंदर शिंदे हे एकमेव शेकापचे उमेदवार निवडून आले. निवृत्त सनदी अधिकारी शिंदे हे भाजपमध्ये होते. परंतु युतीत लोहा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटय़ाला गेल्याने शिंदे यांनी अंतिम टप्प्यात शेकापची उमेदवारी मिळविली. शिंदे यांच्या विजयात शेकापपेक्षा स्वत:ची ताकद महत्त्वाची ठरली. शेकाप हा पारंपरिकदृष्टय़ा भाजपविरोधी पक्ष मानला जातो. पण राज्यात सत्ता स्थापण्याच्या घडामोडींमध्ये भाजप आणि शिवसेनेने अधिकाधिक अपक्ष आणि छोटय़ा पक्षांना आपल्या गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले. यातूनच शेकापच्या शिंदे यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला.

जनता दलाचाही जनाधार आटला

राज्याच्या राजकारणात समाजवादी चळवळीतील नेत्यांचा  प्रभाव होता. एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, मधू दंडवते, मृणालताई गोरे, बापूसाहेब काळदाते,  ग. प्र. प्रधान असे मोठे नेते होऊन गेले.  १९७७ नंतर जनता लाटेत राज्यातही जनता पक्षाला चांगले यश मिळाले होते. १९७८ मध्ये जनता पक्षाचे  ९१ आमदार निवडून आले होते. शरद पवार यांनी जनता पक्षाच्या मदतीनेच पुलोदचा प्रयोग केला होता. १९८० मध्ये १७ , १९८५ मध्ये २० तर १९९० मध्ये २४ आमदार जनता पक्ष किंवा जनता दलाचे निवडून आले होते. १९९० मध्ये जनता दलात फूट पडून आमदारांचा एक गट काँग्रेसमध्ये दाखल झाला. त्यानंतर जनता दलाला कधीच चांगले यश मिळाले नाही. २००४ पासून राज्य विधानसभेत जनता दलाचा एकही आमदार निवडून आलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2019 12:48 am

Web Title: shetkari kamgar paksh mla support bjp abn 97
Next Stories
1 २०० तक्रारदारांना बक्षिसाची प्रतीक्षा
2 झोपु प्राधिकरणासोबतचा करार रद्द करण्याचे आदेश
3 कल्याण ते बदलापूर, आसनगावपर्यंत १५ डबा जलद लोकल
Just Now!
X