अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपटांच्या निर्मितीप्रकरणामध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून या तपासामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. दीड वर्षांमध्ये राज कुंद्रांनी १०० हून अधिक पॉर्न चित्रपटांची निर्मिती केल्याची माहिती समोर आल्याचं आज तकने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. इतकच नाही तर यामधून त्यांनी कोट्यावधी रुपयांची कमाई केल्याचंही सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर या उद्योगासाठी वेबसाईटऐवजी मोबाइल अ‍ॅपचा पर्याय का निवडण्यात आला याबद्दलचाही खुलासा करण्यात आलाय.

समोर आलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेने अंधेरी पश्चिमेमध्ये असणाऱ्या राज कुंद्रांच्या वियान कंपनीच्या कार्यालयामध्ये छापा टाकला. यामध्ये तपास यंत्रणांना बऱ्याच मोठ्याप्रमाणात माहिती आणि साहित्य सापडलं आहे. हा डेटा काही टेराबाईट्समध्ये आहे यावरुनच या छाप्यामध्ये पोलिसांना तपासासाठी आवश्यक असणारे पुढील धागेदोरे सापडल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी कारवाई करण्याआधीच मोठ्या प्रमाणामध्ये डेटा डिलीटही करण्यात आला असून आता गुन्हे शाखेकडून फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने डेटा रिकव्हरीचा प्रयत्न केला जात आहे.

नक्की वाचा >> पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच झाली व्यक्त; Instagram वर पोस्ट करत म्हणाली…

२० लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स, कोट्यावधींची कमाई

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अश्लील चित्रपट बनवण्याचं काम राज कुंद्रा हे ऑगस्ट २०१९ पासून करत आहेत. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी १०० हून अधिक अश्लील चित्रपटांची निर्मिती केलीय. गुन्हे शाखेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुंद्रांनी या उद्योगामधून कोट्यावधी रुपये कमवल्याचंही सांगितलं जात आहे. ज्या अ‍ॅपच्या माध्यमातून हे अश्लील चित्रपट अपलोड करुन प्रसारित करण्यात येत होते त्या अ‍ॅपला २० लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स होते. यामधूनच कुंद्रा यांना कोट्यावधी रुपये मिळायचे, असं गुन्हे शाखेच्या सुत्रांनी सांगितलं आहे.

…म्हणून केली अ‍ॅपची निवड

वेबसाईटऐवजी कुंद्रांच्या कंपनीने अ‍ॅपचा पर्याय निवडण्यामागेही एक कारण असल्याचं समोर आलं आहे. वेबसाईटच्या तुलनेत अ‍ॅप हे वापरण्यास अधिक सोयीस्कर ठरेल या विचारातून वेबसाईटऐवजी अ‍ॅप सुरु करुन त्या माध्यमातून या चित्रपटांचं वितरण करण्यात तआलं. तसेच वेबसाईटवर कारवाई झाल्यावर तिच्यावर बंदी येऊ शकते मात्र अ‍ॅप पूर्णपणे बंद करता येत नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही मॉडेल्स आणि अभिनेत्री केवळ अशाप्रकारच्या चित्रपटांमध्येच काम करतात आणि कुंद्रा यांचा वापर करुन या चित्रपटांची निर्मिती करायचे.

नक्की पाहा >> कंडक्टरचा मुलगा, हिरे व्यापारी, शिल्पा शेट्टीशी लग्न ते पॉर्न प्रकरण; राज कुंद्रांबद्दलच्या ३० खास गोष्टी

तपासात सहकार्य नाही…

राज कुंद्रांवर एवढे गंभीर आरोप लावण्यात आलेले असतानाही ते तपासामध्ये सहकार्य करत नसल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान कुंद्रा हे सहयोग करत नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. अनेक प्रश्नांना उत्तर देण्यास कुंद्रा टाळाटाळ करत आहेत. तसेच ते सतत त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळत आहे. मी कोणताही अश्लील चित्रपट बनवलेला नाही असं ते वारंवार सांगत आहेत. मात्र राज कुंद्रांविरोधात गुन्हे शाखेकडे सबळ पुरावे असल्याचं पोलिसांनी अधिक स्पष्ट केलं आहे. कुंद्रा यांना भायखळ्यातील तुरुंगात ठेवण्यात आलंय.

नक्की वाचा >> अटकेनंतर राज कुंद्रांनी पहिल्यांदाच न्यायालयासमोर मांडली भूमिका, म्हणाले, “तो कंटेट पॉर्न नाही तर…”

पोलिसांना दिले २५ लाख रुपये

राज कुंद्रा यांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना २५ लाख रुपयांची लाच देऊन अटक टाळली, असा आरोप करण्यात आला आहे. त्याबाबतचे चार ई-मेल लाचलुचपत प्रतिबंधक कक्षाला करण्यात आले होते, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. न्यूफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मकडेही २५ लाख रुपयांची मागणी केल्याचे या ई-मेलमध्ये म्हटले आहे. न्यूफ्लिक्स हे अ‍ॅप यश ठाकूर चालवत होता, असा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू होती. कारवाई टाळण्यासाठी पोलिसांनी २५ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच राज कुंद्रा याने २५ लाख रुपये पोलिसांना दिले, असेही या ई-मेलमध्ये म्हटले होते. दरम्यान पुढील चौकशीसाठी या तक्रारी एप्रिल महिन्यात मुंबई पोलिसांकडे पाठविल्या होत्या, अशी माहिती एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.