रेमडेसिविरचा राज्यात अनधिकृत साठा नाही आणि दमणच्या कंपनीकडून तो महाराष्ट्रालाच दिला जाणार होता, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट केल्याने राज्य सरकारला घरचा अहेर मिळाला असल्याची टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी केली.

रेमडेसिविरचा अनधिकृत साठा महाराष्ट्रात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांनी पोलिसांवर दबाव आणला, या साठ्याची चौकशी करा, असे आरोप  मंत्री बाळासाहेब थोरात, नवाब मलिक, दिलीप वळसे-पाटील आदी करीत होते. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भाजपवर टीका केली होती. त्यानंतर शिंगणे यांनी खुलासा केला आहे. असे सांगून दरेकर म्हणाले, आमदार रोहित पवारांनी आपल्या मतदारसंघात रेमडेसिविर इंजेक्शनचे वाटप केले आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर बोर्डाकडे किंवा रोहित पवार यांच्याकडे इंजेक्शनचा साठा कुठून आला, याची सरकारने चौकशी केली का, त्यांना नोटीस तरी पाठवली का? बारामती येथील बनावट इंजेक्शन प्रकरणाचीही चौकशी करण्याची मागणी दरेकर यांनी केली.