अपेक्षेप्रमाणे शिशिर शिंदे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत आज (मंगळवार) शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या ५२ व्या वर्धापन दिनाचा मुहूर्त साधून शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनगटाला शिवबंधन बांधून आणि हाती भगवा झेंडा घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिशिर शिंदे भावूक झाले होते. मनसेत असताना मी जे काही बोललो त्याची आज माफी मागतो. सर्वांनी मला उदारपणाने माफ करावे असे म्हणत त्यांनी विधानसभेवर भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे म्हटले.

गेल्या काही दिवसांपासून शिशिर शिंदे हे मनसेचे इंजिन सोडून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. अपेक्षेप्रमाणे शिंदे यांनी आज सेनेत प्रवेश केला.

वयाच्या १७ व्या वर्षी एका हातात भगवा झेंडा तर दुसऱ्या हातात धोंडा घेऊन शिवसेनेत आलो होतो. शिवसेनेत येण्यापूर्वी आपण मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.