शिवसेना सत्तेत सामील झाली असली तरी भाजप-शिवसेनेत धुसफूस होत असल्याने स्थापन करण्यात आलेल्या समन्वय समितीची पहिली बैठक २४ फेब्रुवारीला होणार आहे. मात्र शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समितीमध्ये सहभागी होणार नसल्याने त्यातून फारसे निष्पन्न होण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा समन्वय समितीमध्ये समावेश आहे. दुष्काळग्रस्तांना दिली जाणारी अपुरी मदत, शेतकऱ्यांच्या सुरु असलेल्या आत्महत्या, राज्यमंत्र्यांचे अधिकार, मुख्यमंत्री फडणवीस आणि काही कॅबिनेट मंत्र्यांकडून शिवसेनेच्या मंत्र्यांना मिळणारी वागणूक, महत्वाच्या बैठका, कार्यक्रम यामध्ये शिवसेना मंत्र्यांना सहभागी करुन घेणे, मुंबईतील नाईटलाईफ, शिवजयंती यासह अनेक मुद्दय़ांवर भाजप-शिवसेनेत मतभेद आहेत. दोन्ही बाजूंकडून जाहीरपणे वादग्रस्त वक्तव्येही झाली आहेत. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी समन्वय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पण दोन्ही पक्षाच्या प्रमुखांचाच समावेश समितीमध्ये नसल्याने तोडगा निघण्याची शक्यता कमी असल्याचे संबंधितांनी सांगितले.