शिवसेना-काँग्रेस एकत्र; अविश्वास ठराव आणल्यास पाठिंबा देण्याची काँग्रेसची तयारी

बेस्ट उपक्रमाचा तोटा वाढत असतानाच त्यात तिकीट प्रणालीतील ट्रायमॅक्स इलेक्ट्रॉनिक मशीन बेस्ट वाहकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. यामुळे बेस्टचे नुकसान होत असून त्याला बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना सदस्यांनी गुरुवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत केला. त्यामुळे महाव्यवस्थापकांना राज्य सरकारच्या सेवेत पाठवा, अशी मागणीदेखील शिवसेना सदस्यांनी केली. जर सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने महाव्यवस्थापकांविरोधात अविश्वास ठराव आणल्यास त्याला आमचा पाठिंबा असेल, असे सांगून काँग्रेस सदस्य आणि पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही महाव्यवस्थापकांच्या भूमिकेवर टीका केली.

बेस्टचे तिकीट हे वाहकांकडे असणाऱ्या ट्रायमॅक्स मशीनमधून देण्यात येते. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून या मशीनमध्ये होणाऱ्या बिघाडांमुळे वाहक आणि प्रवासी त्रस्त होत आहेत. त्यामुळे दैनदिन बस वाहतुकीवर परिणाम होत आहे. त्यावर उपाय म्हणून प्रशासनाने जुन्या पद्धतीप्रमाणेही तिकीट देण्याचा पर्याय निवडला आहे. गुरुवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत शिवसेनेचे सदस्य सुहास सामंत यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत ट्रायमॅक्स मशीन चार्ज करण्यासाठी काही आगारांमध्ये चार्जर नाहीत. त्यामुळे या मशीन बंदच असून बेस्टचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. ट्रायमॅक्स मशीन वापरण्यायोग्य नसतानाही महाव्यवस्थापकांच्या हट्टीपणामुळे या मशीनचा वापर सुरूच ठेवावा लागत आहे.

अशा महाव्यवस्थापकांना राज्य सरकारच्या सेवेत परत पाठवावे, अशी मागणी सामंत यांनी केली. सामंत यांच्या हरकतीच्या मुद्दय़ाला पाठिंबा देत शिवसेना सदस्य अनिल कोकीळ यांनी नवीन तिकीट मशीनबाबत एक उपसमिती नेमण्यात आल्याची आठवण करून दिली. या समितीने बेस्ट उपक्रमाला अहवाल दिला होता. मात्र हा अहवालही बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांना मान्य नाही. त्यालाही महाव्यवस्थापकांनी गुंडाळले आहे.

बेस्ट समितीच्या अधिकारांवरच गदा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सेना सदस्य अनिल कोकीळ यांनी बैठकीत केला. या वेळी शिवसेनेचे अन्य सदस्यांनीही सुहास सामंत आणि अनिल कोकीळ यांच्या मागणीला पाठिंबा दिला.

काँग्रेसचे सदस्य आणि विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मात्र शिवसेनेच्या भूमिकेवर टीका करतानाच दुसरीकडे महाव्यवस्थापकांविरोधात अविश्वास ठराव आणल्यास पाठिंबा देण्याची तयारीही दर्शविली. बस गाडय़ांचा ताफा आणि प्रवासी संख्या कमी होत आहे. त्यातच ट्रायमॅक्स मशीनमुळेही नुकसान सोसावे लागत आहे. मुळातच शिवसेना ही सत्तेत असून त्यांनी महाव्यवस्थापकांविरोधात अविश्वास ठराव आणावा.

सत्तेत असूनही शिवसेनेकडून आतापर्यंत मागणी का करण्यात आली नाही, असा सवाल बैठकीतच उपस्थित करत सेनेच्या सदस्यांनाच सुनावले. शिवसेना-काँग्रेसच्या या मागणीनंतर बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांनी समितीच्या बैठकीत वारंवार ट्रायमॅक्सचा मुद्दा येत असून ट्रायमॅक्स मशीनमुळे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचे सदस्यांनी निदर्शनासही आणून दिल्याचे सांगितले.

या मुद्दय़ावर आता बेस्ट समितीतील सर्वच पक्षाचे सदस्य गंभीर आहेत. प्रशासन जर यावर तोडगा न काढता आपल्या मतांवर ठाम राहिले तर आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागेल, असे स्पष्टपणे त्यांनी बेस्ट प्रशासनाला सुनावले.

महाव्यवस्थापक परदेशात

बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे हे सध्या काही कामानिमित्त परदेशात आहेत. त्यामुळे गुरुवारी झालेल्या बैठकीत बागडे यांच्याऐवजी उपमहाव्यवस्थापक आर. जे. सिंग उपस्थित होते. बागडे हे २२ मे रोजी मुंबईत दाखल होतील.

भाजपचे मौन

बैठकीला भाजपचे सदस्य सुनील गणाचार्यही उपस्थित होते, मात्र त्यांनी या विषयावर कोणतेही भाष्य न करता गप्पच राहणे पसंत केले.