प्रारूपाला विरोधी पक्षांचा जोरदार आक्षेप; शिवसेनेचीही आराखडय़ाविरोधात भूमिका
शहराच्या पुढील २० वर्षांच्या विकासाची दिशा स्पष्ट करण्यासाठी आवश्यक असलेल्या विकास आराखडय़ाच्या मंजुरीत आणखी एक अडथळा निर्माण झाला आहे. महानगरपालिकेच्या सभागृहात सादर करण्यात आलेल्या प्रारूपाला विरोधी पक्षांनी जोरदार आक्षेप घेतला. शिवसेनेने यापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडे आराखडय़ाविरोधात भूमिका मांडली आहे. त्यामुळे शुक्रवारी विकास आराखडा सादर करताना केवळ भाजपच एकाकी पडल्याचे दिसत होते.
गेल्या दोन वर्षांपासून विकास आराखडा चर्चेत आहे. यापूर्वी तत्कालीन आयुक्त सीताराम कुंटे यांच्या कारकिर्दीत सादर करण्यात आलेल्या २०१४-३४च्या प्रारूप आराखडय़ातील चुका तसेच शिफारशींना जोरदार विरोध झाला होता. जागांच्या नामनिर्देशनात सुमारे हजार चुका सापडल्याने अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुधारित आराखडा बनवण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आयुक्त अजय मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या सुधारित आराखडय़ाचे प्रारूप औपचारिकपणे सादर होण्यापूर्वीच टप्प्याटप्प्याने विकास नियंत्रण नियमावलीच्या स्वरूपात लोकांसमोर आले. परवडणाऱ्या घरांसाठी मोकळ्या जागा विकासकांसाठी खुल्या करणाऱ्या पालिका प्रशासनाच्या शिफारशींविरोधात सामान्य नागरिक, पर्यावरण, सामाजिक क्षेत्रातून तीव्र विरोध झाला होता.
शुक्रवारी सभागृहात विकास आराखडा सादर करण्यासाठी सर्व पक्षांकडून संमती मिळावी यासाठी गटनेत्यांच्या बैठकीत सत्ताधारी व प्रशासनाने मनधरणी केली. मात्र सभागृहात आराखडा सादर होण्यापूर्वीच विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी निवेदन मांडण्यास सुरुवात केली व या आराखडय़ाला विरोध केला. मनसे, सपा यांनीही आराखडय़ाला विरोध केला. आराखडा मांडून मग विरोध करू या, अशी भूमिका सत्ताधारी शिवसेनेने घेतली होती. मात्र भाजपची या सगळ्यात कोंडी झाली होती. सभागृहात संख्याबळाच्या आधारावर आराखडा सादर करण्यात आला. त्यानंतर काँग्रेस, मनसे व सपाने तातडीने पत्रकार परिषद घेऊन आराखडय़ातील प्रस्तावांना विरोध केला. आराखडय़ातील विकासाच्या धोरणाला विरोध असल्याचे सपाचे गटनेते रईस शेख व मनसे नगरसेवक चेतन कदम यांनी सांगितले. या परिषदेनंतर शिवसेनेनेही स्वत:ची भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्र्यांना भेटून आम्ही आमची भूमिका मांडली आहे. सामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध झाली पाहिजेत. मात्र नाविकास क्षेत्र, मिठागरे अशा मोकळ्या जमिनींवर बांधकामांना तसेच आरेमध्ये मेट्रो कारशेडला आमचा विरोध आहे, असे सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव म्हणाल्या.

जमिनी बळकावण्याचा डाव
मोकळ्या जमिनी बळकावण्याचा हा डाव आहे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सांगण्यावरून विकासकांना अनुकूल असलेला हा आराखडा असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी केला.