भाजपसोबतची २५ वर्षांची युती विधानसभेच्या जागावाटपावरून तुटल्यानंतर शिवसेनेने केंद्र सरकारमधूनही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतताच शिवसेनेचे केंद्रातील एकमेव मंत्री अनंत गीते त्यांच्याकडे राजीनामा सोपवतील, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी जाहीर केले. त्यासोबतच शिवसेना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतूनही (एनडीए) बाहेर पडण्याची शक्यता आहे.
केंद्रात सत्तेत आल्यानंतर भाजपने शिवसेनेला एकच मंत्रिपद, तेही अवजड उद्योग खाते असलेले दिले. त्यामुळे शिवसेना पक्षनेतृत्व आधीच नाराज होते. विधानसभेच्या जागावाटपावरून युती तुटल्यापासून शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार का, याची चर्चा सुरू झाली होती. त्यातच रविवारी मुंबईत झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी
‘महाराष्ट्रात युती तोडायची आणि केंद्रातील मंत्रीपदाबाबत तोंडही उघडायचे नाही, हा शिवसेनेचा ढोंगीपणा असून त्यांच्यावर जनतेने विश्वास कसा ठेवायचा’ असा सवाल करत उद्धव यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर सोमवारी खुद्द उद्धव यांनीच गीते हे राजीनामा देतील, असे जाहीर केले. तसेच पक्ष एनडीएतूनही बाहेर पडण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
दरम्यान, गीते यांनी मात्र आपल्याला याबाबत काहीच कल्पना नसल्याचे म्हटले आहे. ‘अजूनपर्यंत तरी माझ्यापर्यंत तसा निरोप आलेला नाही. मात्र, उद्धव ठाकरे देतील तो आदेश मी पाळेन,’ असे गीते यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
मुंबई महापालिकेतही काडीमोड?
राज्य आणि केंद्रातून भाजपशी फारकत घेणारी शिवसेना मुंबई महापालिकेतही भाजपशी मैत्री तोडेल का, असा प्रश्न आता चर्चिला जात आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांना विचारणा केली असता, योग्य वेळी याबाबत निर्णय घेतला जाईल, असे उत्तर त्यांनी दिले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 30, 2014 3:42 am