मुंबईमधील चर्चगेट रेल्वे स्थानक १० जानेवारी १८७० रोजी सुरु झाले. आज पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असणाऱ्या या चर्चगेट स्थानकाचा इतिहासही त्याच्या नावाइतकाच रंजक आहे. मात्र आपल्यापैकी खूपच कमी लोकांना ब्रिटिशांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा घेतलेला धसका आणि चर्चगेटचे नामकरण याबद्दलचा इतिहास ठाऊक असेल. आजच्या शिवजयंतीचे औचित्य साधून ‘लोकप्रभा’मधील एका जुन्या लेखाच्या संदर्भाने हाच संबंध सांगण्यासाठी ही लेख…

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या सात बेटांच्या समूहाने म्हणजे मुंबईने शेकडो वर्षांपासून देशी व परदेशी राज्यकर्त्यांना आकर्षित केले होते. कुलाबा-धाकटा कुलाबा- मुंबई- माझगांव- परळ- वरळी व माहीम अशा या सात बेटांवर मूळ वस्ती फक्त कोळी, भंडारी व आगरी लोकांची होती. गुजराथमधील चंपानेरमधून दक्षिणेकडील प्रदेश जिंकत जिंकत येथवर आलेल्या राणा प्रताप बिंबाने मोक्याच्या माहीम बेटावर इ.स. ११४० ते १२४१ दरम्यान मोठा मजबूत दगडी किल्ला बांधला. त्यानंतर इ.स. १३४८ मध्ये येथे घुसलेल्या मुगलांनी काही व १५३४ मध्ये मोगलांना हटवून मुंबई बळकावलेल्या पोर्तुगीजांनी काही बेटांवर किल्ले बांधले. मात्र नंतर त्यांनी राजघराण्यांतील सोयरिकीमुळे मुंबई बेट ब्रिटिशांना १६६१ मध्ये आंदण दिले व ते प्रत्यक्ष हस्तांतरित होण्याची प्रक्रिया १६६५ मध्ये पूर्ण झाल्यावर येथे आधी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा व नंतर यथावकाश इंग्लंडच्या राणीचा राज्यकारभार सुरू झाला. मुंबईचे खरे महत्त्व ब्रिटिशांनीच ओळखले होते.

मुंबईच्या सात बेटांपैकी फक्त मध्ये असलेले मुंबई बेट क्षेत्रफळाने मोठे होते. त्यामुळे त्यावर वस्ती करणे ब्रिटिशांना जास्त सोयीचे होते. येथूनच वस्ती व कारभार करताना त्यांनी प्रशस्त व प्रचंड मोठा किल्ला येथे उभारला. तथापि काही काळानंतर त्यांनीच तो पाडूनही टाकला. या किल्ल्यासंदर्भातील माहितीचा मागोवा घेताना लक्षात आलेली विशेष गमतीदार गोष्ट अशी की, किल्ल्याच्या निर्मितीचे प्रयोजन आणि दोनशे वर्षांनंतर तो पाडण्याचा निर्णय या दोन्ही गोष्टींशी संबंधित असलेला विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळा मराठे वंशज यांचा, स्वत:ला जगज्जेता म्हणविणाऱ्या ब्रिटिशांनी घेतलेला धसका!

ब्रिटिशांनी मराठय़ांचा धसका

इ. स. १६१२ मध्ये ब्रिटिशांनी सुरत येथे वखारी स्थापन केल्या व तेथून समुद्रमार्गाने त्यांचा व्यापार सुरू झाला. तेथे राज्य मोगलांचे होते. नाशिक येथे देवदर्शनासाठी आलेल्या शिवाजी महाराजांच्या चुलतीला मोगलांच्या टोळीने पळवून नेले. त्यांचा पाठलाग करून शिवाजी महाराजांनी चुलतीला सोडवून आणले (नोव्हेंबर १६६३) व या आगळिकीची मोगलांना अद्दल घडविण्याकरिता मोजक्या मावळ्या घोडेस्वारांसोबत दौडत जाऊन जानेवारी १६६४ मध्ये सुरतेमधील सर्व मोगलांना लुटून साफ केले. महाराजांच्या सक्त ताकिदीमुळे वखारीमधील ब्रिटिशांना मावळ्यांनी हातही लावला नाही. परंतु ब्रिटिशांनी मराठय़ांचा धसका मात्र घेतला. सुरत व मुंबई या दोन्ही ठिकाणी त्यांचे गव्हर्नर नेमलेले असत. त्यांच्या राणीबरोबरच्या तत्कालीन पत्रव्यवहारामध्ये हा धसका स्पष्टपणे व्यक्त झालेला दिसतो.

एकाच किल्ल्यातून सुरत आणि मुंबईचा कारभार

मुंबई बेटाच्या पूर्व किनाऱ्यावर इ.स. १५३८ च्या आसपास ज्याला मुंबई बेट पोर्तुगीजांनी भाडय़ाने दिले होते, त्या मार्सिया दा ओर्ता या शास्त्रज्ञाने मॅनॉर हाऊस या नावाचा बंगला बांधला. त्या बंगल्यात १६२६ नंतर पोर्तुगीज गव्हर्नर राहात असे. नंतर १६६५ मध्ये तेथे ब्रिटिश गव्हर्नर राहाण्यास आला. त्याने, म्हणजे हम्फ्रेकूकने, मॅनॉर हाऊसभोवती तटबंदी करून घेतली व त्यावर अठरा तोफा बसवल्या. त्याला ‘बॉम्बे कॅसल’ असे नाव दिले. हा ब्रिटिश राज्यकारभाराचा त्या काळातील मुख्य पत्ता होता. ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला गव्हर्नर जॉर्ज ऑक्झेंडन (नियुक्ती १६६८) व नंतर जिराल्ड आँजियर (१६७२) हे सुरत व मुंबई दोन्ही ठिकाणांचा कारभार पाहात.

चर्चगेट नाव नक्की आले कुठून?

दि. ३, ४ व ५ ऑक्टोबर १६७० साली शिवाजी महाराजांनी सुरत दुसऱ्यांदा लुटून साफ केली. त्यानंतर मात्र ब्रिटिशांनी शिवाजी महाराजांची हायच खाल्ली. १७१५ मध्ये नियुक्ती झालेल्या चार्ल्स बून या गव्हर्नरने तोपर्यंत विस्तारलेल्या शहराभोवती उंच, रुंद व भक्कम भिंती बांधून त्याला किल्ल्याचे स्वरूप आणले. या किल्ल्याच्या पूर्व बाजूस समुद्र असल्याने तेथून दोन दरवाजे होते, त्यांना मरीन गेट असे म्हणत. उत्तरेच्या भिंतीत, दक्षिणोत्तर बझारगेट स्ट्रीटच्या उत्तर टोकास बझारगेट या नावाचा तिहेरी दरवाजा होता. त्याला तीन दरवाजा असे देखील म्हणत. पश्चिमेकडील भिंतीमध्ये टाऊन हॉलजवळील सेंट थॉमस चर्चकडून सरळ पश्चिमेस जाणाऱ्या रस्त्यावर तो दरवाजा होता, त्याला चर्चगेट असे नाव होते व त्या रस्त्याला चर्चगेट स्ट्रीट असे म्हणत.

आणि तेच चर्चगेट स्टेशन झालं

किल्ल्याबाहेर पडल्यावर हीच चर्चगेट स्ट्रीट पुढे पश्चिमेकडे गेल्यावर इ.स. १८६७-७२ च्या आसपास उत्तरेकडून आलेल्या व कुलाब्यापर्यंत जाणाऱ्या बीबीसीआय रेल्वेला तिने जेथे छेदले तेथील स्टेशनला चर्चगेट असे नाव दिले व तेच अजून प्रचारात आहे. मूळचा चर्चगेट दरवाजा कधीच इतिहास जमा झाला! चर्चगेट स्ट्रीटने रेल्वेला जेथे छेदले तेथे लेव्हल क्रॉसिंग होते. रेल्वे कुलाब्यापर्यंत जात होती व शेवटचे स्टेशन ही फार देखणी इमारत होती. १९३० नंतर रेल्वे चर्चगेटपुढचे कुलाब्यापर्यंतचे रूळ तोडले, १९३७ मध्ये कुलाबा स्टेशन पाडले व स्टेशनच्या जागेत १९५० नंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांसाठी फ्लॅट्स बांधून ‘बधवार पार्क’ निर्माण केले.

कुलाबा कॉजवेचा इतिहास काय?

किल्ल्याच्या दक्षिणेकडील भिंतीमध्ये टाऊन हॉलकडून सरळ दक्षिणेस आलेल्या अपोलो स्ट्रीटच्या टोकाशी ‘अपोलो गेट’ या नावाचा दरवाजा होता. आता तेथेच आसपास पूर्वेस ‘रॉयल सेलर्स होम’ म्हणजे पोलीस मुख्यालय आहे. अपोलो गेटच्या दक्षिणेस बाहेर पडल्यावर कुलाबा बेटापर्यंत समुद्रच होता. तेथे भरतीच्या वेळी अपघाताने बुडून अनेक सैनिक मारले गेल्यामुळे तेथून ससून डॉकपर्यंत समुद्रात भर घालून कुलाबा बेटाला जोडणारा कुलाबा कॉजवे १८३८ मध्ये पूर्ण केला.

…आणि शिवडीचा किल्लाही बांधला

आक्रमणाच्या भीतीमधूनच या किल्ल्याची, म्हणजे फोर्टची निर्मिती झाली. तरीही मराठय़ांचा धसका होताच! चिमाजी आप्पा पेशवे यांनी १७३९ मध्ये चढाई करून पोर्तुगीजांना हरवून वसईचा किल्ला जिंकला. ही बातमी आल्याबरोबर इथे ब्रिटिशांनी मुंबई फोर्टच्या दक्षिणेच्या अपोलो गेटपासून पश्चिमेच्या चर्चगेटपर्यंत व तेथून उत्तरेस जाऊन बझारगेटच्या पूर्वेस समुद्रकिनाऱ्यापर्यंत, असा ३० फूट रुंद व २० फूट खोल सलग खंदक खणण्यास ताबडतोब सुरुवात केली! बाहेरून दौडत आलेल्या शत्रूच्या घोडेस्वारांना झेप टाकून ओलांडणे कठीण व्हावे म्हणून ३० फूट रुंदी! परिचितांना फळ्या टाकून आणले किंवा सोडले जाई. ‘ऑपरेशन चिमाजी आप्पा’च्या प्रभावामुळे, पोर्तुगिजांनी १५८० मध्ये बांधलेला शिवच्या टेकडीवरील किल्लाही लगेच दुरुस्ती करून मजबूत केला गेला आणि पूर्व तटावर शिवडीचा किल्लाही लगेच बांधला गेला (इ.स. १७६८). मुंबई किल्ल्याभोवतीचा खंदक खणून १७४३ मध्ये पाण्याने भरला.

..अशापद्धतीने मुंबई फोर्टमध्ये जाणे गुन्हा

मुंबई फोर्टला एकूण आठ बुरुज होते. वर उल्लेख केलेल्या तीनही गेट्स्मधून सूर्योदयाला फोर्टबाहेरील लोकांना व कर्मचाऱ्यांना आत येऊ दिले जाई. दिवसभराच्या कामानंतर सूर्यास्त होण्यापूर्वी त्यांनी बाहेर जाणे आवश्यक असे व सूर्यास्तास गेट्स् बंद केले जातात. कोणत्याही कारणाने कुणीही या गेट्स्मधून छत्री उघडून अथवा पेटता कंदील हातात घेऊन जाणे हा गुन्हा मानला जाई असा उल्लेख आहे!

‘फोर्ट जॉर्ज’ किल्ला

मुख्य किल्ल्याच्या ईशान्य कोपऱ्याच्या उत्तरेस किल्ल्याबाहेर सैनिकांसाठी सेंट जॉर्जेस् हॉस्पिटल बांधले होते. त्या हॉस्पिटलच्या भोवताली मूळ फोर्टला जोडून इ. स. १७६९ मध्ये ‘फोर्ट जॉर्ज’ हा छोटा फोर्ट बांधला. येथे याआधी डोंगरीचा किल्ला होता. त्याच्या पूर्वेकडील भिंतीस लागूनच समुद्र होता व बोटी नांगरण्याची सोय होती. मोठय़ा फोर्टमध्ये राहाणारे ब्रिटिश अधिकारी व त्यांचे कुटुंबीय, परदेशी शत्रूचा हल्ला झाल्यास या छोटय़ा फोर्टमध्ये आश्रय घेतील व तेथून पूर्वेकडील बोटींमधून पेण किंवा पनवेल येथे पेशव्यांच्या आश्रयास जातील अशी योजना होती! मात्र तशी वेळ आली नाही. या फोर्ट जॉर्जच्या पूर्व भिंतीचा थोडासा भाग आजही उभा आहे.. त्यात शासनाची कार्यालये आहेत. तेथूनच मूळ किल्ल्यांत जाणारे भुयार आहे व ते स्वत: पाहिल्याचे मला स्व. प्रमोद नवलकर (‘भटक्याची भ्रमंती’चे लेखक) यांनी सांगितले होते. ब्रिटिश कुटुंबांच्या पलायन योजनेला या भुयाराने पुष्टीच मिळते.

पुनश्च मराठा प्रभाव!

१८१८ मध्ये पेशव्यांचा पाडाव झाला. त्यामुळे ब्रिटिशांना प्रबळ शत्रू उरला नाही. शिवाय मुंबईतील व्यापार व तिचे महत्त्व वाढत होते, त्यामुळे वस्ती पसरण्याची आवश्यकता होती. १८५५ मध्ये अपोलो गेटचा काही भाग व फोर्टची थोडी तटबंदी पाडली. पण १८६२ ला नियुक्ती झालेल्या सर बार्टल फ्रियर यांनी हुकूम दिला व १८६५ नंतर १८६७ पर्यंत फोर्टच्या सर्व तटबंदी पाडून सर्व खंदक बुजवून टाकले, तसेच नवे रस्ते तयार करून पूर्वीचे रस्ते रुंद करून शहराचे रूप बदलण्यास सुरुवात झाली. पूर्वी जेथे चर्चगेट उभा होता तेथेच १८६७ नंतर सुंदर ‘फ्रियर फाऊंटन’ उभारले, आता त्याचे नांव ‘फ्लोरा फाउंटन’ असे आहे.

(टीप: मूळ लेख ‘लोकप्रभा’मध्ये उज्ज्वला आगासकर यांनी १५ जुलै २०१६ मध्ये ‘मुंबई बेटावरचा ब्रिटिश किल्ला’ या मथळ्याखाली लिहिला होता. तो वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)