सामनाच्या आजच्या अग्रलेखातून पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल असा दावा करण्यात आला होता. त्यानंतर शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी सर्व काही समसमान पाहिजे असे अप्रत्यक्षपणे सूचित केले. भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी हे विधान केल्यानंतर सभागृहात एकच हंशा पिकला. मी कार्यक्रमाबद्दल बोलतोय असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले पण त्यांचा अप्रत्यक्ष इशारा सत्तेतल्या समसमान वाटयाकडे आहे. एका युतीची पुढची गोष्ट महाराष्ट्राच्या व्यासपीठावर असून संपूर्ण देश बघतोय असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी या कार्यक्रमात संसदेतील घोषणांवरुन ओवेसींवर सडकून टीका केली. ओवेसी हिंदुस्थानात समान भागीदार आहेत असे म्हणतात. ? एकतरी हिंदु पाकिस्तानात आम्ही समान भागीदार आहोत बोलू शकतो का? ओवेसी हिंदुस्थानात समान भागीदार आहेत म्हणता मग वंदे मातरम् म्हणायला त्यांना लाज कसली वाटते ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

दुसऱ्याच्या पराभवावर मी आनंद व्यक्त करत नाही. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांना डरपोक म्हणणाऱ्यांचा पराभव झाला त्याचा आनंद आहे. काश्मीर हिंदुस्थानचा अविभाज्य घटक आहे. कलम ३७० काढणार नाही म्हणाऱ्यांचा पराभव झाला त्याचा आनंदच आहे असे उद्धव म्हणाले. कर्माने मरणार त्याला धर्माने मारु नकोस हे मला शिवसेनाप्रमुखांनी सांगितले आहे. मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यामध्ये शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे असा उद्धव ठाकरेंनी दावा केला.

मैदान साफ असताना पायात पाय अडकून पडण्याचा धोका असतो. युती करताना पूर्ण विचारुन केली. पुन्हा वाद होणार नाहीत याची काळजी घेतली आहे असे उद्धव यांनी सांगितले. शिवसेना-भाजपाचा दुरावा आता कमी झाला असून  आता फक्त सात नाही तर एकसाथ दौडू असे उद्धव म्हणाले.