प्रधानसेवकाचा पुढे सम्राट कसा होतो, ते जनतेने अनेकदा अनुभवले आहे, असा टोमणा मारत शिवसेनेने शुक्रवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखामधून दिल्लीचे नियोजित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चिमटे काढतानाच मोदी यांनाही टोमणे मारण्यात आले आहेत.
नरेंद्र मोदी स्वत:ला ‘प्रधान सेवक’ म्हणवून घेतात. केजरीवाल स्वत:चे नवे बारसे काय करतात ते आता पाहायचे. राजकारणात येताना आणि निवडणुका लढवताना प्रत्येक जण जनतेचा सेवक असतो. त्या सेवकाचा पुढे सम्राट कसा होतो ते जनतेने अनेकदा अनुभवले आहे. केजरीवाल दिल्लीत काय करतात ते आता पाहायचे?, असे या अग्रलेखात लिहिण्यात आले आहे.
केजरीवाल यांनी मागील वेळेस जाहीर केले होते की, त्यांचे मंत्री लाल दिव्याच्या गाड्या व इतर सुविधा घेणार नाहीत, मेट्रोने प्रवास करतील, प्रत्यक्षात काय झाले? केजरीवाल यांनी एक-दोन दिवस मेट्रोने सफर केली, पण मुख्यमंत्री मेट्रोत एकटेच शिरत नाहीत. त्यांचा मोठा फौजफाटाही त्यांच्या बरोबर शिरतो व त्याचा त्रास सामान्य जनतेला होतो. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीने प्रसिद्धीसाठी हे असले ‘स्टंट’ करू नयेत व ज्या काही राजशिष्टाचाराच्या बाबी आहेत त्यांचे पालन करावे, असा सल्ला केजरीवाल यांना देण्यात आला आहे.
केजरीवाल यांचा ‘ब्रॅण्ड’ मफलर आहे, पण गरज नसेल तेव्हा त्यांनी मफलर गुंडाळून ठेवायला हरकत नाही. ओबामा दिल्लीत आले तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी ३०-३५ लाखांचा ‘ब्रॅण्डेड’ कोट घातल्याची चर्चा मीडियात रंगली. उद्या केजरीवाल यांचा मफलरही ‘ब्रॅण्डेड’ होऊ नये, केजरीवाल मफलर गुंडाळतात म्हणून फॅशन कंपन्यांनी ‘ब्रॅण्डेड’ मफलर बाजारात आणून स्वत:चे खिसे भरू नयेत, असाही टोला लगावण्यात आला आहे.