पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणं महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना मान्य आहे का ? अशी विचारणा करत महाराजांच्या वंशजांनी तात्काळ राजीनामे द्यायला हवेत असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी रविवारीही अशाच पद्धतीने टीका केली होती. यानंतर राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांच्या जिभेला लगाम घालण्यास सांगितले होते. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार करत नेमकी भूमिका स्पष्ट केली.

भाजपा नेत्यांना मान्य आहे का ?
“महाराष्ट्रातील नेत्यांनी भूमिका घेतली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. नरेंद्र मोदींशी महाराजांची तुलना करणं राज्यातील भाजपा नेत्यांना मान्य आहे का ? मान्य असेल तर त्यांनी स्पष्टपणे सांगावं,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा – ‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ पुस्तकाचे भाजपा कार्यालयात प्रकाशन

भूमिका घ्या म्हटलं तर चिडण्याचं कारण नाही
आपल्या आधीच्या वक्तव्यासंबंधी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, ‘महाराजांचे जे वंशज आहेत ते सगळे भाजपात आहेत. मग कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही गाद्यांचे जे प्रमुख आहेत त्यांनी सुद्धा शिवाजी महाराजांची जी तुलना केली आहे ती योग्य आहे की नाही याबद्दल भूमिका घ्या म्हटलं तर चिडण्याचं कारण नाही. महाराजांचे वंशज आहात त्याबद्दल आम्हाला आदर आहे. याचा अर्थ तुम्ही भूमिका घेऊ नये असं आहे का? महाराजांची अशा पद्धतीने तुलना केल्याबद्दल तुम्ही तात्काळ राजीनामे द्यायला हवे,” असं स्पष्ट मत संजय राऊत यांनी यावेळी माडलं.

आणखी वाचा – छत्रपती संभाजीराजेंच्या इशाऱ्यानंतर संजय राऊत यांचं उत्तर, म्हणाले…

उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा
यावेळी संजय राऊत यांनी आपली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी यासंबंधी सविस्तर चर्चा झाल्याचं सांगितलं. “मी काहीही चुकीचं बोललेलो नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझी आज सकाळी सविस्तर चर्चा झाली. त्यांनी आपली भूमिका योग्य असल्याचं सांगितलं आहे. जनता भूमिका घेत असेल तर वंशजांनीही भूमिका घेतली पाहिजे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. भाजपा नेते संध्याकाळपर्यंत भूमिका स्पष्ट करतील अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.

आणखी वाचा – ही तर भक्तांची चमचेगिरी, नरेंद्र मोदींची काही चूक नाही – संजय राऊत

पंतप्रधानांच्या अपरोक्ष ही चमचेगिरी चालते
संजय राऊत यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची यामध्ये काही चूक नसल्याचं म्हटलं. “नरेंद्र मोदी महान व्यक्ती आहेत, त्यांचा आदर करतो, पण महाराजांशी तुलना करणं योग्य नाही. पंतप्रधानांच्या अपरोक्ष ही चमचेगिरी चालते. याबद्दल त्यांना काही माहिती नसतं. हे पुस्तक मागे घेतलं पाहिजे, त्याच्यावर बंदी घातली पाहिजे. तसंच भाजपाने याच्याशी आपला संबंध नाही हे जाहीर केलं पाहिजे,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

जय भगवान गोयल यांनी दिल्लीत महाराष्ट्र सदनावर हल्ला केला होता
हे वादग्रस्त पुस्तक लिहिणाऱ्या जय भगवान गोयल यांच्यावरही संजय राऊत यांनी टीका केली. “१५ वर्षापूर्वी दिल्लीत महाराष्ट्र सदनावर त्याने हल्ला केला होता. सदनाचा चक्काचूर करत महाराष्ट्राविरोधात गरळ ओकली होती. त्यांना आव्हान देणारा मी पहिला खासदार होतो. त्यांना पळवून लावलं होतं. महाराष्ट्राचा अपमान केला तो महाराजांचाही अपमान करतो आणि त्यावर महाराष्ट्रातील नेते अवाक्षर काढायला तयार नसतील महाराष्ट्राचं राजकारण करण्याचा अधिकार नाही. महाराजांचं नाव घ्यायचं त्यांना अधिकार नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.