दुकानांत पाणी शिरल्याने मालाचे नुकसान

मुंबई : टाळेबंदीमुळे आधीच आर्थिक गर्तेत सापडलेल्या दुकानदारांना मंगळवारी आणि बुधवारी पडलेल्या पावसामुळे मोठय़ा नुकसानाला सामोरे जावे लागले. पावसाचे पाणी दुकानांत शिरून तेथील मालाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती अनेक दुकानदारांनी दिली. मागील चार महिन्यांपासून व्यवसाय नसतानाही दुकानाचे भाडे, कामगारांचा पगार, कर्जाचे हप्ते यांनी बेजार झालेल्या व्यापाऱ्यांच्या चिंतेत यामुळे आणखीच भर पडली आहे.

मागील महिन्यांपासून बहुतांश व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली असली तरी गिऱ्हाईक नसल्याने त्यांना तोटा सहन करुनच दुकान चालवावे लागत आहे. त्यातून काहीसा दिलासा म्हणून बुधवारपासून या व्यापाऱ्यांना दरदिवशी दुकाने उघडण्याची परवानगी मिळाली होती. मात्र पहिल्याच दिवशी या व्यापाऱ्यांना मोठय़ा नुकसानाला सामोरे जावे लागले. हिंदमाता, दादर टी. टी., परळ, ग्रँट रोड, ताडदेव, मरिन लाईन्स आदी परिसरातील अनेक दुकानात पाणी भरले. शहरातील अनेक भागात चार फुटांपर्यंत पाणी भरले होते. पाणी दुकानात शिरल्याने मालासह, फर्निचर आणि इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले. मंगळवारी दिवसभर आणि रात्रीही पाऊस थांबला नसल्याने अनेक दुकानामध्ये मध्यरात्री पाणी भरले. त्यामुळे व्यापाऱ्यांना माल सुरक्षितस्थळी हलविण्याची संधीच मिळाली नाही. गुरुवारी दिवसभर दुकानाची सफाई करण्यातच बहुतांश व्यापारी गुंतले होते. खराब मालाच्या ढिगाऱ्याकडे पाहत परिस्थितीपुढे हतबलता ते व्यक्त करत होते.

हिंदमाता परिसरात अजय बैदा यांचे ‘शुभ लाभ’ हे साडय़ांचे दुकान आहे. लग्न सराईसाठी तोठय़ा प्रमाणात मालाची खरेदी केली होती. मात्र हा माल दुकानात पडून आहे. ‘सोमवारी दुकान उघडले तेव्हा पावसाची कोणतीच लक्षणे नव्हती. दिवसाआड दुकान उघडे ठेवण्याच्या नियमानुसार मंगळवारी दुकान बंद होते. त्यामुळे मालाची कोणतीच व्यवस्था करता आली नाही,’ असे अजय सांगतात. ‘मंगळवारी रात्री दुकानात पाणी शिरून मालाचे मोठे नुकसान झाले. सुमारे १० ते १२ हजार रुपये किमतीच्या लग्नात वापरल्या जाणाऱ्या साडय़ा पाण्यात भिजल्याने रंग मिसळून खराब झाल्या. त्या फेकून देण्याशिवाय पर्याय नाही,’ असे खराब झालेल्या साडय़ांचा ढिगारा दाखवत अजय सांगत होते.

हिंदमाता परिसरातच विरल गोहील यांचेही साडय़ांचे दुकान आहे. २६ जुलै २००५ च्या प्रलयानंतर प्रथमच दुकानात पाणी शिरल्याचे ते सांगतात. ‘मंगळवारी मध्यरात्री दुकानात पाणी शिरले त्यावेळी नालासोपाऱ्यावरून येणे शक्य नव्हते. अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे,’ असे गोहील सांगतात. ग्रँट रोड परिसरातील अनेक दुकानांत काल पहिल्यांदाच पाणी शिरले.