मावळ परिसरात शेतकऱ्यांवरील गोळीबाराबद्दल एम. जी. गायकवाड समितीने जबाबदार ठरविलेले पोलीस अधिकारी संदीप कर्णिक यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली, अशी विचारणा करीत मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी ३० जुलैपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे आदेश राज्य सरकारला सोमवारी दिले. संदीप कर्णिक यांच्यासह अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करीत जमावावर गोळीबार केल्याचा आरोप ईश्वरप्रसाद खंडेलवाल यांनी करीत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी जनहित याचिकेद्वारे केली होती. राज्य सरकारने प्रकरणाच्या चौकशीसाठी एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील समिती नियुक्त केली होती. या समितीने नुकताच चौकशी अहवाल सादर केला.

लाच मागणाऱ्या पोलिसांना अटक
मुंबई : तपास करण्यासाठी पंजाबला जाण्याचा खर्च तसेच तेथील हॉटेलच्या वास्तव्याचे बिल अशी एकूण १४ हजारांची लाच मागणाऱ्या मालवणी पोलीस ठाण्याच्या दोन पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने सोमवारी अटक केली. विशेष म्हणजे हॉटेलच्या वास्तव्याचे बिल या पोलिसांनी बँक खात्यात जमा करण्यास सांगितले होते.या प्रकरणातील फिर्यादी व्यावसायिक आहेत. पंजाबमधील एका व्यक्तीने त्यांची फसवणूक केली होती. त्याचा तपास मालवणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक तोंडे आणि पोलीस नाईक रमाकांत रेवंडकर करत होते. तपासासाठी पंजाबला जावे लागेल, असे सांगून त्यांनी फिर्यादीकडून १० हजार रुपये घेतले. नंतर जालंधर येथे आपण उतरलो असून तेथील हॉटेलचे १० हजार रुपयांचे बिल बँक खात्यात भरण्यास त्यांनी सांगितले. तसेच पुढील तपासासाठी अमृतसरला जाण्यासाठी आणखी ५ हजार रुपयांची मागणी केली. फिर्यादीने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधात्मक खात्याकडे तक्रार दिली . सोमवारी  दोघेही पोलीस मुंबईत येताच अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली.

लग्नास नकार दिल्याने तरुणीवर ब्लेडने हल्ला
मुंबई : लग्नास नकार दिल्याने ग्रँट रोड येथील एका तरुणीवर रविवारी रात्री ब्लेडने वार करण्यात आला. जखमी झालेल्या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून हल्लेखोराला जमावाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पीडित तरुणी १८ वर्षांची असून नवी मुंबई येथील हॉटेलात काम करते. ग्रँट परिसरातच राहणाऱ्या अजीम सय्यद खान या तरुणाशी तिची मैत्री होती. त्याने तिच्यामागे लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र ती त्याला नकार देत होती. ही तरुणी कामावरून घरी परतत असताना अजीमने तिला पुन्हा लग्नाची मागणी केली. यावेळीही तिने नकार दिल्यामुळे संतापलेल्या अजमीने तिच्यावर ब्लेडने वार केले.  पळून जाणाऱ्या अजीमला जमावाने पकडले. दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिसांनी अजीमला अटक केली.

प्रीती झिंटाकडून साक्षीदारांची नावे सादर
मुंबई : विनयभंगप्रकरणी अभिनेत्री प्रीती झिंटाने सोमवारी मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची भेट घेऊन घटनेच्या वेळी हजर असणाऱ्या आणखी साक्षीदारांची नावे सादर केली. या साक्षीदारांची संपूर्ण चौकशी केल्यानंतरच नेस वाडियाला चौकशीसाठी बोलावले जाईल, असे मारिया यांनी स्पष्ट केले. प्रीतीने उद्योगपती नेस वाडियावर विनयभंगाचे आरोप केले आहेत.  प्रीतीने नव्याने अर्ज देऊन प्रकरणाची सविस्तर माहिती दिल्याचे मारिया यांनी सांगितले.

दोन अपघातांत एक ठार, तीन जखमी
मुंबई : सोमवारी माहीम आणि अ‍ॅण्टॉप हिल येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत एकजण ठार तर तीनजण जखमी झाले.    मारुती स्विफ्ट कार दादरहून अंधेरीच्या दिशेने जात असताना माहीम येथून भाजी घेऊन जाणारा एक टेम्पो त्या गाडीवर आदळला. या अपघातात मारुतीमधील महिलेसह दोनजण जखमी झाले. पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली.अ‍ॅण्टॉप हिल येथे सिमेंट मिक्सर ट्रकने रेल्वे पुलाला धडक दिल्याने एक अज्ञात पादचारी ठार झाला. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक मौसिद खान (२१) याला अटक केली.