वक्त्यांची वैचारिक स्पष्टता, शैलीदार मांडणीमुळे रंगलेल्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या स्पर्धेत नाशिकच्या जे. आर. सपट महाविद्यालयाची श्रुती बोरस्ते यंदाची ‘वक्ता दशसहस्रेषु’ ठरली.

‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेची महाअंतिम फेरी शनिवारी रंगली. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, रत्नागिरी या आठ विभागांमधील विजेत्यांमध्ये जोरदार चुरस झाली. वास्तवाला स्पर्श करणारे विषय, तरुणांचे विचार, परखड मतप्रणाली आणि ठाम भूमिका ही या वर्षीच्या ‘वक्ता दशसहस्रेषु’ स्पर्धेची वैशिष्टय़े ठरली. कोल्हापूरच्या एस. के. एन. सिंहगड महाविद्यालयाची उमा गायकवाड द्वितीय क्रमांक तर रत्नागिरीच्या एस. एच. महाविद्यालयाची विद्यार्थिनी अनघा पंडित तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. औरंगाबादच्या एसबीईएस महाविद्यालयाच्या आदित्य देशमुख याने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. तर ठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्रथमेश उंबरे याला लालित्यपूर्ण शैलीसाठी वसंत कुंभोजकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी स्पर्धकांशी संवाद साधत आठही विषयांचा धांडोळा घेतला.

Senior Gandhian Dhirubhai Mehta passed away
ज्येष्ठ गांधीवादी धीरूभाई मेहता यांचे निधन; कस्तुरबा हेल्थ सोसायटी झाली पोरकी
nashik, Fraud Case Registered Against Panjarpol , Nashik Panjarpol Sanstha Managers, Forged Letter, Allegedly Signed by Chief Minister, land acquisition panjrapole nashik, panjrapole nashik fraud, forged letter cm eknath shinde,
भूसंपादन प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे बनावटपत्र, श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा

‘वक्ता दशसहस्रेषु’ ठरलेल्या श्रुती बोरस्ते हिने ‘तानाजीला छपाक’ या विषयावर आपले विचार मांडले. चित्रपटांच्या पलीकडे जाऊन त्यामागे झालेले राजकारण तिने अधोरेखित केले. तर वर्तमानाच्या गमजा मारणारे आपण वास्तवात मात्र इतिहास पाहणे पसंत करतो का, यावर विचार करायला हवा, असेही ती म्हणाली.

तर द्वितीय क्रमांक पटकावलेल्या उमा गायकवाड हिने ‘हम देखेंगे’ आणि तृतीय क्रमांकाच्या अनघा पंडित हिने ‘विचारधारा : एक समृद्ध अडगळ’ या विषयांवर भाष्य करत वास्तवाची जाणीव करून दिली. ‘विकासाची किंमत’ याविषयी आदित्य देशमुख या उत्तेजनार्थ आलेल्या विद्यार्थ्यांने आपले विचार मांडले. तर लालित्यपूर्ण शैलीचा मान मिळवणारा प्रथमेश उंबरे ‘देशोदेशीचे ट्रम्प’ या विषयावर बोलत ‘ट्रम्प’ ही प्रवृत्ती कशा पद्धतीने समाजात वावरत आहे यावर बोट ठेवले. स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ रंगकर्मी शफाअत खान आणि नाटय़ लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते अजित भुरे यांनी केले.

गूगलवर माहिती मिळते, विचार नाही. ही विचार रुजवणारी स्पर्धा आहे, असे म्हणत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी स्पर्धेचे स्वरूप उलगडले. ‘वक्त्यांच्या साधनेतून साध्य होते ते वक्तृत्व’ असेही ते म्हणाले. महाराष्ट्राला असलेली उज्ज्वल वक्तृत्वाची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ स्पर्धा आयोजित केली जाते. विद्यार्थ्यांनी पुढे  येऊन समाजवास्तवाविषयी आपली भूमिका ठामपणे मांडणे, विचार व्यक्त करणे, हा यामागील उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या वेळी डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे उदय पेंडसे आणि मिलिंद आरोलकर उपस्थित होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन याच स्पर्धेतून २०१८ ला ‘वक्ता दशसहस्रेषु’ ठरलेल्या रिद्धी म्हात्रे हिने केले.

महाअंतिम फेरीचे विषय

* विचारधारा : एक समृद्ध अडगळ

* समानता की सारखेपणा

* तानाजीला छपाक

* समान ‘नागरिक’ कायदा

* विष आणि विषाणू

* विकासाची किंमत

* हम देखेंगे

* देशोदेशीचे ट्रम्प

निकाल

* प्रथम क्रमांक – श्रुती बोरस्ते – नाशिक

* लालित्यपूर्ण शैली – वसंत कुंभोजकर पुरस्कार – प्रथमेश उंबरे – ठाणे

* द्वितीय क्रमांक – उमा गायकवाड – कोल्हापूर

* तृतीय क्रमांक – अनघा पंडित – रत्नागिरी

* उत्तेजनार्थ – आदित्य देशमुख – औरंगाबाद

वक्ता विषयाचा विचार कसा करतो, जगाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन आणि तो मांडण्याची पद्धत पाहून विजेत्यांची निवड करण्यात आली. व्यवस्था आणि बाजारीकरण यात विचारांचे सपाटीकरण झाले आहे. अशा वेळी ‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावरून स्पर्धकांनी धाडसाने आपले विचार मांडले त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे. फक्त तरुण वक्त्यांनी मनात आहे ते निर्धास्तपणे मांडावे. भाषेचे बंधन बाळगू नये. उगाचच्या सजावटीमुळे विषय बाजूला जाऊन फोलपणा समोर येतो.     – शफाअत खान

स्पर्धकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. विषय निवडल्यानंतर त्याच्या खोलात जाऊन भिडण्याची तयारी जरा कमी पडली असे वाटले. वक्तृत्व म्हणजे निव्वळ पाठांतर नव्हे. समोरच्या श्रोत्यांबरोबर संवाद साधण्याची एक वेगळी कला अवगत करायला  हवी. येणाऱ्या काळात ती सुधारणा होईल अशी आशा करता येईल. आजच्या तरुणाईला आणि त्यांच्या विचारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा ‘लोकसत्ता’चा उद्देश काही प्रमाणात सफल झाला हे निश्चित.

– अजित भुरे

चौकटीबाहेरचा विचार मांडण्याची प्रेरणा

ठाणे शहराचे प्रतिनिधित्व करताना लालित्यपूर्ण शैलीचा पुरस्कार मला मिळाला याचा आनंद आहे. इतर चार स्पर्धामध्ये जितके शिकता आले असते तितके या एका स्पर्धेत शिकायला मिळाले. चौकटीबाहेरचा विचार मांडण्याची ताकद इथूनच मिळाली.

– प्रथमेश उंबरे, वसंत कुंभोजकर पुरस्कार, जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे.

वैचारिक जडण-घडणीचे व्यासपीठ

मी सोलापूरला राहते, पंढरपूरला शिकते आणि कोल्हापूर विभागातून मी सहभागी झाले होते. तीन विभागांचे प्रतिनिधित्व करताना आज आनंद होत आहे. वैचारिक जडण घडण करणारे हे एक महत्वाचे व्यासपीठ आहे.

उमा गायकवाड, द्वितीय क्रमांक. एस. के. एन. सिंहगड महाविद्यालय. कोल्हापूर.

तज्ज्ञ मंडळींना ऐकण्याची संधी

‘लोकसत्ता’च्या स्पर्धेत सहभागी होऊन आनंद मिळालाच परंतु इतक्या तज्ज्ञ मंडळींना ऐकण्याची संधी मिळाली याचे जास्त अप्रूप आहे. इथले विषय इतर स्पर्धापेक्षा खूपच वेगळे होते. परीक्षकांचे मार्गदर्शन कायम लक्षात राहील.

– अनघा पंडित, तृतीय क्रमांक. एस. एच. महाविद्यालय, रत्नागिरी.

पुन्हा प्रयत्न करून जिंकेन

तीन फेऱ्यांमधून इथे पोहोचलो हीच मोठी गोष्ट आहे. जिंकता आले नाही याचे दु:ख आहेच परंतु असे विषय हाताळायला मिळाले हेही नसे थोडके. पुन्हा प्रयत्न करून नक्की जिंकेन.

– आदित्य देशमुख, उत्तेजनार्थ. एस. बी. इ. एस. महाविद्यालय, औरंगाबाद.

पुन्हा प्रयत्न करून जिंकेन

तीन फेऱ्यांमधून इथे पोहोचलो हीच मोठी गोष्ट आहे. जिंकता आले नाही याचे दु:ख आहेच परंतु असे विषय हाताळायला मिळाले हेही नसे थोडके. पुन्हा प्रयत्न करून नक्की जिंकेन.

– आदित्य देशमुख, उत्तेजनार्थ. एस. बी. इ. एस. महाविद्यालय, औरंगाबाद.