संदीप आचार्य

करोनाचा वाढता संसर्ग आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रक्तपेढ्यांमधील रक्ताचा साठा अपुरा असल्याने दादर येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाने रक्तदान महायज्ञाला आरंभ केला. त्यानुसार, बुधवारी मुंबईत दोन ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यातील ४३१ रक्तपेढ्यांमध्ये केवळ ३८ रक्ताच्या पिशव्यांचा साठा शिल्लक आहे, तर मुंबईतील ५८ रक्तपेढ्यांमध्ये केवळ ६,५०० रक्ताच्या पिशव्या आहेत. राज्याची रक्ताची वार्षिक गरज सव्वा लक्ष रक्ताच्या पिशव्या असताना केवळ ३८ हजार पिशव्या शिल्लक असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाल्याची दखल घेत सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी पुढाकार घेऊन सिद्धिविनायक मंदिराच्या माध्यमातून रक्तदान महायज्ञाचा संकल्प केला.

१ एप्रिलपासून हा महायज्ञ सुरु झाला असून बुधवारी मुंबईत दोन ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यातील एका शिबिरात स्वत: रक्तदान करून आदेश बांदेकर यांनी या यज्ञाची सुरुवात केली. यासाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांनी संपूर्ण सहकार्य केले असून जे. जे. महानगर रक्तपेढीच्या सहकार्याने आगामी वर्षभर शिबीरे आयोजित केली जाणार आहेत. याबाबत बांदेकर म्हणाले, “आतापर्यंत ११ दिवसांसाठी शिबिरांचे नियोजन पूर्ण झाले असून एक हजाराहून अधिक लोकांनी रक्तदानासाठी नावे नोंदवली आहेत. आम्ही सिद्धिविनायकाच्या माध्यमातून संपूर्ण वर्षभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करणार आहोत. पहिल्या टप्प्यात मुंबईत या शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून नंतर ठाणे, नवी मुंबई, पुणे व नाशिक आदी ठिकाणी ही शिबिरे आयोजित केली जातील”