रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्याने उध्वस्त झालेल्या गावाचे पुनर्वसन करण्याचा निर्णय श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने घेतला आहे. त्यासाठी भरीव निधीची तरतूदही करण्यात आली आहे. या तरतुदीच्या मान्यतेसाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली आहे.

बांदेकर एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, प्रभावती मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तिवरे धरणफुटल्यामुळे अनेक कुटुंब उद्धवस्त झाली आहेत, अनेकांचे संसार नाहीसे झाले आहेत, अशा वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत काय करता येईल, याची आमच्याशी सातत्याने चर्चा करीत होते. खासदार विनायक राऊत आणि आमदार उदय सामंत यांनी मदतीच्या मागणीसाठी ट्रस्टकडे पत्र दिले होते, या मागणीचा विचार करता तिवरे गावाचे पुनर्वसन करण्याचा निर्णय श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने घेतला आहे.

या सर्व गोष्टींचा अत्यंत सहानुभुतीपूर्वक विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आणि तिवरे गावाच्या पुनर्वसनासाठी भरीव असा निधी राखून ठेवण्यात आला आहे. तसेच पुढील मान्यतेसाठी हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आल्याचे बांदेकर यांनी सांगितले.

मुसळधार पावसामुळे २ जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले होते. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली होती. यामध्ये २३ जणांचा मृत्यू झाला होता यांपैकी पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेलेल्या २० जणांचे मृतदेह सापडले होते तर इतर तीन जण अद्यापही बेपत्ता आहेत. या धरणफुटीचा सात गावांना फटका बसलेला असला तरी तिवरे गावातील घरं, शेती, पशूधन वाहून गेल्याने हे गाव उद्धवस्त झाले आहे.