चेंबूरपासून कळंबोलीपर्यंत खड्डेच खड्डे ; ४० मिनिटांच्या प्रवासाला दोन तास

मुंबईहून नवी मुंबई तसेच पुण्याच्या दिशेने ये-जा करण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या शीव-पनवेल महामार्गाची पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हा मार्ग अमेरिकेतील रस्त्यांसारखा बनवल्याचा दावा राज्य सरकारच्या वतीने अवघ्या चार महिन्यांपूर्वी करण्यात आला होता. मात्र, या रस्त्याची सध्याची दुर्दशा पाहता आफ्रिकेतील मागास देशांतही इतके वाईट रस्ते असतील का, अशी शंका मनात आल्यावाचून राहात नाही. मुंबईतील चेंबूरपासून नवी मुंबईतील कळंबोलीपर्यंत या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने अवघ्या ४० मिनिटांच्या प्रवासासाठी वाहनांना दीड ते दोन तास मोजावे लागत आहेत.

मुंबईहून पुणे तसेच कोकण, गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी शीव-पनवेल महामार्ग हा महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावरील वाहनांचा भार वाढल्यानंतर अवघ्या चार वर्षांपूर्वी राज्य सरकारने १२०० कोटींपेक्षा अधिक खर्च करून या मार्गाचे रुंदीकरण तसेच काही ठिकाणी काँक्रीटीकरण केले. मात्र, सध्या या महामार्गाची अवस्था अतिशय बिकट बनली आहे. गेल्या तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे तर या महामार्गावरून जाणेही असह्य़ होऊ लागले आहे. या मार्गावर जागोजागी खड्डे पडल्याचे चित्र असून त्याचा परिणाम वाहतूक कोंडीतही होत आहे.

चेंबूरच्या पांजरापोळ सर्कल येथून या रस्त्यावर खड्डे दिसू लागतात. चार महिन्यांपूर्वी स्थानिक नगरसेविकेने मोठा गाजावाजा करत या भागातील रस्ता नव्याने करून घेतला. मात्र, याच रस्त्यावर सध्या मोठमोठे खड्डे पडले आहेत. पूर्व मुक्तमार्गही याच ठिकाणी शीव-पनवेल महामार्गाला मिळतो. त्यामुळे येथे नेहमीच वाहतूक कोंडी असते. त्यातच आता खड्डय़ांमुळे येथे वाहनांच्या रांगा लागत आहेत.

नवी मुंबईतही या महामार्गाची दुर्दशा झाली आहे. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये नवी मुंबईत झालेल्या १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेपूर्वी नवी मुंबईतील तुर्भे ते सानपाडा या भागातील महामार्गाच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु, गेल्या तीन दिवसांतील पावसाने या रस्त्यावरील डांबर वाहून गेले आहे. वाशी ते बेलापूर दरम्यानचा १४ किलोमीटरचा शीव-पनवेल महामार्ग पालिकेकडे हस्तांतर करण्याचा प्रस्ताव नवी मुंबई महापालिकेने गेल्यावर्षी संमत केला. मात्र, त्यावर अजून राज्य सरकारची मोहोर उमटलेली नाही. त्यामुळे महामार्गावरील खड्डय़ांची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचा महापालिकेचा दावा आहे.

‘सततच्या पावसामुळे खड्डे भरण्यामध्ये मोठा अडथळा येत असून पाऊस कमी झाल्यास संपूर्ण महामार्गावरील खड्डे आठ दिवसात भरण्यात येतील. शिवाय ज्या भागात डांबरी रस्ते आहेत. तेदेखील लवकरच सिमेंटचे तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुढे खड्डय़ांची समस्या येणार नाही.

– किशोर पाटील, अधीक्षक अभियंता- सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई मंडळ

शीव-पनवेल महामार्गावरील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत विधानसभेत आवाज उठवला असून निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. जोरदार पावसामुळे खड्डे दुरुस्तीच्या कामाला अडथळा निर्माण होत होता. तातडीने या मार्गाची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

मंदा म्हात्रे, आमदार , बेलापूर विधानसभा

खड्डे कुठे कुठे?

चेंबूर पांजरापोळ सर्कलजवळ, मानखुर्द ट्रॉम्बे उड्डाणपुलाखाली, वाशी गाव, वाशी उड्डाणपुलाखाली,  तुर्भे उड्डाणपुलापासून नेरुळ एलपी जंक्शनपर्यंत, उरण फाटा, बेलापूर उड्डाणपुलाखाली, कळंबोली.