अर्थसंकल्पाच्या निमित्ताने स्थायी समितीसाठी प्रशासनाकडून वाटाघाटीअंती मिळविलेल्या तब्बल ५०० कोटी रुपयांचे असमान वाटप केल्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने पालिका सभागृहात सोमवारी थैमान घातले. स्थायी समिती अध्यक्षांचे आगामी अर्थसंकल्पावरील भाषणास सुरुवात होताच विरोधकांनी सुधारित निधी वाटपाची पुस्तिका फाडून सभागृहात उधळली. शिवसेनेविरोधात विरोधकांनी सभागृहात शिमगा केला. मात्र हा गोंधळ सुरू असताना शिवसेनेच्या एकाही नगरसेवकाने चकार शब्दही काढला नाही. अखेर महापौरांनी काँग्रेसच्या सहा नगरसेविकांना निलंबित केले व सभागृह तहकूब केले.
आयुक्त सीताराम कुंटे यांनी स्थायी समितीमध्ये सादर केलेल्या २०१५-१६ च्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यापूर्वी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी प्रशासनाशी वाटाघाटी करून तब्बल ५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळविला होता. यापैकी १०० कोटी ‘बेस्ट उपक्रमा’ला मदत म्हणून देण्याचे त्याच वेळी जाहीर करण्यात आले होते. तर उर्वरित ४०० कोटी रुपयांपैकी प्रत्येक नगरसेवकास एक कोटी रुपयांप्रमाणे २२७ कोटी विकास निधी म्हणून देण्याचे घोषित करण्यात आले होते. मात्र पालिका सभागृहात सोमवारी यशोधर फणसे यांचे अर्थसंकल्पावरील भाषण सुरू होताच उर्वरित १३७ कोटी रुपयांच्या निधीचे असमान वाटप करण्यात आल्याचा ठपका ठेवून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने गोंधळ घातला. वितरित केलेल्या पुस्तिका काँग्रेसच्या नगरसेविकांनी फाडून सभागृहात उधळल्या. महापौर आणि सत्ताधाऱ्यांच्या दिशेनेही कागदपत्रे भिरकविण्यात आली. कागदाचे बोळे फेकून मारण्यात आले. गोंधळातच यशोधर फणसे यांनी भाषण पूर्ण केले. देशभरात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात येत असताना सभागृहात कचरा करू नका, असे महापौर स्नेहल आंबेकर वारंवार विरोधकांना बजावत होत्या. मात्र विरोधक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. काही नगरसेविका तर आसनावर उभ्या राहून शिवसेना नगरसेवकांना आव्हान देत होत्या. परंतु शिवसेनेचे नगरसेवक थंड बसून होते. सभागृह चालविणे अशक्य बनल्यामुळे स्नेहल आंबेकर यांनी काँग्रेस नगरसेविका शीतल म्हात्रे, पारुल मेहता, अजंता यादव, अनिता यादव, वकारुन्निसा अन्सारी आणि नैना दोशी यांना सभागृह नियमावली ३८ (१) अन्वये निलंबित केले. सभागृहातून तात्काळ बाहेर जा, असा आदेश महापौर वारंवार या नगरसेविकांना देत होत्या. मात्र या नगरसेविका सभागृहात गोंधळ घालतच होत्या. गोंधळ टिपेला पोहोचताच स्नेहल आंबेकर यांना सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.
मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेले संजय निरुपम यांना पालिकेतील कामगिरी दाखविण्यासाठी काँग्रेस नगरसेवकांनी हा गोंधळ घातला होता, अशी चर्चा सत्ताधारी पक्षाच्या गोटात सुरू होती.