22 February 2020

News Flash

नोकरी बचावासाठी आयटीकरांचा कौशल्य विकास

काही जणांनी समाज माध्यम व्यवस्थापन, एसईओ अशा अभ्यासक्रमांनाही पसंती दिली आहे.

अद्ययावत शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या प्रवेशात तीन महिन्यांत २५ टक्के वाढ

‘अद्ययावत प्रशिक्षण घ्या अन्यथा घरचा रस्ता धरा..’ अशी भूमिका घेत आयटी कंपन्यांनी मोठय़ा प्रमाणावर नोकर कपात सुरू केली आहे.  त्यातून बचावासाठी अनेक ‘स्मार्ट’ तरुणांनी अद्ययावत कौशल्य अवगत करण्यासाठी खासगी संस्थांकडे धाव घेतली आहे. यामुळे गेल्या दोन ते तीन महिन्यात या संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रमांच्या चौकशीत दुप्पटीने वाढ झाली आहे तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशातही २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये ६० टक्क्याहून अधिक विद्यार्थी हे आयटी क्षेत्रात नोकरी करणारे असल्याचे निरीक्षणही शैक्षणिक संस्थांनी नोंदविले आहे.

ही सुरुवात गेल्या सहा महिन्यांपासूनच झाली असून आयटी तरुणांचा डेटा अ‍ॅनालेसिस, इंटरनेट ऑफ थिंग्ज, बिग डेटा यासारख्या अभ्यासक्रमांकडे ओढा वाढला आहे. तसेच काही जणांनी समाज माध्यम व्यवस्थापन, एसईओ अशा अभ्यासक्रमांनाही पसंती दिली आहे.

गेल्या सहा महिन्यांमध्ये आमच्याकडे येणाऱ्या चौकशींमध्ये आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांचे प्रमाण सुमारे ४६ टक्के इतके होते असे  जिगसॉ ऑनलाइन प्रशिक्षण अकादमीचे संस्थापक गौरव व्होरा यांनी नमूद केले. गेल्या दोन ते तीन महिन्यांमध्ये विविध अभ्यासक्रमांची चौकशी करणाऱ्यांचे प्रमाण दुप्पट झाल्याचे अपग्रॅड या ऑनलाइन प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक मयांक कुमार यांनी नमूद केले. तर सध्या आम्ही आयोजित करत असलेल्या ‘करिअर वीक’ या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांमध्ये ८० टक्के विद्यार्थी हे आयटी क्षेत्रात काम करणारे असतात असेही मयांक यांनी नमूद केले.

यामध्ये कंपनीत एखाद्या प्रकल्पाचे व्यवस्थापक किंवा चमूचे प्रमुख म्हणून काम करणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याचेही ते म्हणाले. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यताही व्यक्त होत लागली आहे. आयटीमधील विविध कौशल्ये अवगत करण्यासाठी ऑनलाइन प्रशिक्षण संस्था उपलब्ध असल्यामुळे आम्हाला नवीन प्रशिक्षण अवगत करण्यासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज भासत नसल्याचे आयटीमध्ये प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या सुशांत (नाव बदलले आहे)ने सांगितले.

कंपन्यांनी नोकर कपात आत्ता सुरू केली असली तरी साधारणत: नोव्हेंबर ते डिसेंबरपासून या कंपन्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर बदल करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासूनच आमच्याकडे विविध अभ्यासक्रमांच्या चौकशांमध्ये वाढ झाली आहे. अनेकांना आत्तापर्यंत केलेल्या कामापेक्षा भविष्यात वेगळे काम  करायची इच्छा आहे.

गौरव व्होरा, संस्थापक, जिगसॉ ऑनलाइन प्रशिक्षण अकादमी

First Published on May 31, 2017 4:02 am

Web Title: skill development in it sector
Next Stories
1 औषध विक्रेत्यांच्या संपाचा फज्जा?
2 बारावीचा निकाल लागला, पुढे काय?
3 ‘मुक्त विद्यालय मंडळ’ स्थापनेचा राज्य सरकारचा निर्णय!