मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बरवर सध्या मोजक्याच स्थानकांत लोकल गाडय़ांना थांबा देत जलद लोकल चालवल्याने मधल्या स्थानकांतील प्रवाशांची गैरसोय होत होती. ही गैरसोय टाळण्यासाठी धीम्या लोकलही चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार १० ऑक्टोबरपासून २२ नवीन धीम्या लोकल फे ऱ्यांची भर पडणार असून सीएसएमटी ते कसारा, कर्जत मार्गावर १८ आणि सीएसएमटी ते पनवेल मार्गावर चार फे ऱ्या असतील. सीएसएमटी ते पनवेल मार्गावर धीम्या लोकल चालवताना मात्र चार स्थानकांत थांबे देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे धीम्या लोकलला अर्थ काय, असा प्रश्न उपस्थित होतो.

२२ धीम्या लोकल फे ऱ्यांची भर पडणार असल्याने मध्य रेल्वेच्या एकू ण फे ऱ्यांची संख्या ४३१ वरुन ४५३ होणार आहे. आधीच्या ४३१ लोकल फे ऱ्यांच्या वेळा आणि थांब्यांमध्ये काहीही बदल होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. धीम्या लोकल फेऱ्या सीएसएमटी ते कसारा मार्गावर चालवताना थानशेत आणि उंबरमाळी स्थानकात थांबा देण्यात आलेला नाही. तर सीएसएमटी ते कर्जत मार्गावरही शेलू स्थानकात थांबणार नाहीत. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल चार धीम्या लोकल फेऱ्यांनाही रे रोड, कॉटन ग्रीन, चुनाभट्टी, मानसरोवर स्थानकांत थांबा नसेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. त्यामुळे या स्थानकांतून प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांची गैरसोयच होणार आहे. ठाणे ते पनवेल  ट्रान्स हार्बर मार्गावर सध्या सहा लोकल फे ऱ्या होत असून त्यांना काही मोजक्याच स्थानकांत थांबे आहेत. या मार्गावर मात्र धीम्या लोकल चालवण्याविषयी निर्णय झालेला नाही.

एका वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, क्यूआर कोड ई पास यासह अन्य कामांमुळे रेल्वे सुरक्षा दल, तिकीट तपासनीसांवर मोठा ताण आहे. त्यामुळे मनुष्यबळाचा अभाव आणि सुरक्षेच्या कारणास्तवही हार्बरवर सुरु होणाऱ्या धीम्या लोकल फे ऱ्यांना मोजक्याच स्थानकात थांबा दिलेला आहे. याशिवाय स्थानकातील थांब्यांबाबत सध्या राज्य सरकारकडून सूचना येत असतात. सूचनांनुसार त्या स्थानकातून प्रवास करणारे अत्यावश्यक सेवा कर्मचारीही नसल्याचे कारण सांगण्यात आले.

प्रशासनाचे अज्ञान

मध्य रेल्वेने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात सीएसएमटी ते पनवेल मार्गावर धीम्या लोकल फेऱ्यांना किंग्ज सर्कल स्थानक थांबा वगळण्यात आल्याचे सांगण्यात आले. मुळातच या मार्गावर किं ग्ज सर्कल स्थानक नाही. याबाबत राज्य सरकारकडूनच सूचना असल्याचे मध्य रेल्वेकडून उत्तर देण्यात आले.