मेल-एक्स्प्रेस गाडय़ांच्या वेळापत्रकावर परिणाम

मुंबई : कोपरी उड्डाणपुलावर गर्डर बसविण्याच्या कामासाठी ठाणे ते मुलुंड स्थानकादरम्यान मध्य रेल्वेकडून विशेष ‘ट्रॅफिक ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. २३, २४ जानेवारीच्या मध्यरात्री १ ते पहाटे ४ पर्यंत हा ‘ब्लॉक’ असेल. यामुळे दोन दिवस मेल-एक्स्प्रेस गाडय़ांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार असून काही विशेष गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत.

गाडी क्रमांक ०७०५७ व ०७०५८ मुंबई ते सिकंदराबाद ते मुंबई, ०७३१७ व ०७३१८ हुबळी ते एलटीटी ते हुबळी गाडी रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०२११६ सोलापूर ते मुंबई विशेष रेल्वेगाडी पुण्यापर्यंतच धावेल. तर ०१११२ मडगाव ते मुंबई गाडी पनवेलपर्यंतच धावणार आहे. गाडी क्रमांक ०१३०१ मुंबई ते बंगळूरु गाडी ‘सीएसएमटी’ऐवजी पुण्यातून सुटेल.

०१११३ मुंबई ते मडगाव गाडी पनवेलमधून सुटणार आहे. त्यामुळे गाडी पकडण्यासाठी अनेकांची मोठी धावपळ उडणार आहे. ‘सीएसएमटी’ऐवजी पुण्यातून सुटणाऱ्या गाडय़ांमुळे मुंबईतील प्रवाशांना पुण्यापर्यंत जावे लागेल.

भुवनेश्वर ते मुंबई, गोरखपूर ते एलटीटी, हावडा ते मुंबई, मंगळूरु जंक्शन ते मुंबई, गडग ते मुंबई, गोंदिया ते मुंबई, नागपूर ते मुंबईसह अन्य काही गाडय़ा कल्याण, ठाणे व दादपर्यंतच चालवण्यात येतील. गाडी क्रमांक ०१००४ सावंतवाडी रोड ते दादर २३ व २४ जानेवारीला दादर स्थानकात सकाळी ७.१० ऐवजी सकाळी ६.४० वाजता पोहोचेल. तसेच कुर्ला ते ठाणे दरम्यान मध्यरात्री १२.३० ते पहाटे ५.३० वाजेपर्यंत लोकल फेऱ्या रद्द केल्या आहेत.