दहावीच्या परीक्षेत यंदाही फुटीचे सत्र; भिवंडीत शिकवणी चालकाला अटक

मुंबई : गेल्या वर्षीची दहावीची परीक्षा प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे गाजल्यानंतर यंदाही परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटीचे सत्र सुरूच असल्याचे समोर आले आहे. बुधवारी झालेल्या इतिहासाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका जवळपास तासभर आधीच विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर सापडली असून त्यापूर्वी विज्ञान विषयाची प्रश्नपत्रिकाही परीक्षेपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी खासगी शिकवणी चालकाला अटक केले आहे.

गेल्या वर्षी परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना व्हॉटसअ‍ॅपवर मिळण्याचा प्रकार दहावीच्या परीक्षेत घडला होता. त्या वेळी या प्रकरणात गुंतलेल्या शाळेचे परीक्षा केंद्र रद्द करण्याची कारवाई मंडळाने केली. यंदा अधिक काटेकोरपणे नियोजन करण्यात आल्याचे सांगणाऱ्या मंडळाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. यंदाही दहावीच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटल्याचे सत्र समोर आले आहे. दहावीची इतिहासाची परीक्षा बुधवारी होती. ११ वाजता सुरू होणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका १० वाजून ५० मिनिटांनी विद्यार्थ्यांच्या हाती पडणे आणि त्यापूर्वी साडेदहा वाजता विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश मिळणे अपेक्षित आहे. मात्र, असे असताना भिवंडी येथील परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर साधारण १० वाजून १० मिनिटांनीच प्रश्नपत्रिका असल्याचे उघड झाले. या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान यापूर्वी १५ मार्च रोजी झालेल्या विज्ञान भाग १ या विषयाची प्रश्नपत्रिकाही एक तास आधीच व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध झाली असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते गोविंदप्रसाद शर्मा यांनी भिवंडी पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीबाबत केलेल्या तपासानंतर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

आधी सूचना मिळूनही..

गेल्या वर्षीचा अनुभव गाठीशी असताना आणि त्यापूर्वी प्रश्नपत्रिका दहा मिनिटे आधी देण्याच्या निर्णयानंतर त्या व्हायरल होत असल्याचे वारंवार समोर आले असतानाही राज्य मंडळाचे आणि त्याच्या अखत्यारीतील विभागीय मंडळाचे दुर्लक्ष यंदा भोवले आहे. यंदाही प्रश्नपत्रिका फुटत असल्याची तक्रार गोविंदप्रसाद शर्मा यांनी मुंबई विभागीय मंडळाकडे केली होती. मात्र मंडळाने याकडे दुर्लक्ष केले. अखेर शर्मा यांनी भिवंडी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. मंडळाच्या ढिसाळ कारभाराचा फटका प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे.

विज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणी पोलिसांना एका खासगी शिकवणी चालकाला अटक केली आहे. आरोपीला २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गेल्या वर्षी झालेल्या गैरप्रकारांमध्येही खासगी शिकवणी चालक आणि परीक्षा केंद्राचे लागेबांधे समोर आले होते. त्या प्रकाराची पाळेमुळे औरंगाबाद विभागापर्यंतही पोहोचल्याचे समोर आले होते. त्यानंतर ० ते १५ जणांना अटक केली होती.

पुन्हा परीक्षा नाही..

दरम्यान प्रश्नपत्रिका फुटल्याचे समोर आल्यानंतर इतिहासाची परीक्षा पुन्हा होणार असल्याचे संदेश समाजमाध्यमांवर फिरू लागले. मात्र प्रश्नपत्रिका फुटलीच नाही, अशी भूमिका घेत परीक्षा पुन्हा होणार नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. याबाबत राज्य मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे म्हणाल्या, ‘‘प्रश्नपत्रिका ज्या विद्यार्थ्यांकडे सापडली त्यांची चौकशी पोलिसांनी केली आहे. ती अजून किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली त्याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, परीक्षा पुन्हा घेण्याची आवश्यकता दिसत नाही.’’