News Flash

अघोषित संपामुळे एसटी ठप्प

राज्यातील ७० टक्केसेवा खंडित, प्रवाशांचे हाल; कर्मचाऱ्यांवर कारवाई

राज्यातील ७० टक्केसेवा खंडित, प्रवाशांचे हाल; कर्मचाऱ्यांवर कारवाई

वेतनवाढ आणि एसटी महामंडळाने केलेल्या सुधारित वेतनवाढीला विरोध करत राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून अघोषित संप पुकारला. ऐन सुट्टय़ांच्या काळात केलेल्या या संपामुळे प्रवाशांचे मात्र हाल झाले. राज्यातील ७० टक्के एसटी सेवा यामुळे बंद राहिली. या संपाला काही ठिकाणी हिंसक वळणही लागले. संप मागे घेण्यासाठी एसटी महामंडळाकडून निलंबनाचे दबावतंत्रही वापरले. तर बस सेवा सुरू करताना अडथळा निर्माण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जोपर्यंत वेतनवाढीवर योग्य तोडगा निघत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कामगारांनी केला आहे.

सातव्या वेतन आयोगानुसार वेतनवाढ द्यावी यासह अन्य काही मागण्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेसह, महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स काँग्रेस (इंटक) यांनी केल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून वेतनवाढीची मागणी केली जात असून त्यासाठी एसटी महामंडळासोबत नवीन वेतन करारही करण्यात आलेला नाही. वेतनवाढीची मागणी करत गेल्या वर्षीच्या दिवाळीतही संप करण्यात आला होता. वेतनवाढीचा तिढा सुटत नसल्याचे पाहताना एसटी महामंडळाकडून ४८४९ कोटी रुपयांचा सुधारित वेतन करार घोषित केला. मात्र यामुळेही वेतनात फारशी वाढ होत नसल्याचे समजताच  कामगारांमध्ये असंतोष पसरला आणि गुरुवारी मध्यरात्रीपासून अचानक अघोषित संप पुकारण्यात आला. तत्पूर्वी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी एक लघुसंदेशही फिरला. मात्र हे कामगारांचे उत्स्फूर्त आंदोलन असून त्याला कोणत्याही कामगार संघटनेचा पाठिंबा नसल्याचे लघुसंदेशातून दर्शविण्यात आले.

पालघर जिल्ह्य़ातील ८ आगारांपैकी वसई, बोईसर आणि पालघर पूर्णपणे बंद राहिले. ठाण्यात संपात सामील झालेल्या आठ कंत्राटी कामगारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मुंबईतील कुर्ला आणि परळ आगारात तर एसटी बस गाडय़ा उभ्याच होत्या. मुंबई सेन्ट्रल आगारातून बस सेवा अंशत: सुरू होती. परळ आणि उस्मानाबादेत पोलीस बंदोबस्तात एसटी गाडय़ा सोडल्या जात असतानाच त्या अडविणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. नांदेड जिल्ह्य़ातील भोकर तालुक्यात संपादरम्यान  एका एसटी बसवर दगड मारून काचा फोडण्यात आल्या. तर परळ, कुर्ला येथे एसटीवर दगडफेक करण्यात आली. एसटी महामंडळाने संपाचा परिणाम मुख्यत्वे मुंबई, ठाणे, पालघरसह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे या जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात जाणवल्याचे सांगितले. तुलनेने मराठवाडा आणि विदर्भात ६० टक्के वाहतूक सुरू असल्याचा दावा एसटी महामंडळाकडून करण्यात आला.

या संपाची झळ मात्र सामान्य प्रवाशांना बसली. अचानक पुकारलेल्या संपाची  प्रवाशांना कल्पना नव्हती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. सामानासह आगारात येताच एकही बस आगारातून सुटणार नसल्याचे समजणाऱ्या प्रवाशांकडून एसटी महामंडळ आणि आंदोलनकर्त्यांच्या विरोधात रोष व्यक्त केला जात होता. तसेच पर्यायी वाहतुकीसाठी प्रवाशांची धडपड सुरू होती. ग्रामीण भागात तर एसटी आंदोलनाची मोठी झळ बसली. बस सुरू होईल या आशेने अनेक प्रवासी आगारांत ताटकळतच उभे होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ३५ हजार २४९ फेऱ्यांपैकी १० हजार ३९७ फेऱ्या सुरळीत सुरू होत्या. हे आंदोलन शनिवारीही सुरूच ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

१५ कोटींचा महसूल बुडाला

अघोषित संपामुळे एसटी महामंडळाचे सुमारे १५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली. दिवसभरात महाराष्ट्रातील २५० आगारातून सुमारे ३० टक्केच एसटी बसच्या फेऱ्या सुटल्या. राज्यातील २५ आगार पूर्ण क्षमतेने, तर १४५ आगारांमध्ये अंशत: वाहतूक सुरू होती. राज्यातील ८० आगारातून दिवसभरात एकही बस सुटली नसल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.

खासगी बसमधून प्रवासी वाहतुकीस मान्यता

एसटी कामगारांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचे निदर्शनास येताच शासनाकडून सर्व खासगी प्रवासी बस, स्कूल बस, कंपनीच्या मालकीच्या बस आणि मालवाहू वाहन यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता देण्यात आली.

एसटी कामगार संघटनेचा नवीन वेतनवाढीला विरोध का

३१ मार्च २०१६ च्या मूळ वेतनात ३,५०० गुणिले २.५७ ची मागणी. यामध्ये ३,५०० रुपयांत तडजोड करण्याची तयारी असतानाही संपाच्या रेटय़ामुळे २.५७ चे सूत्र मान्य झाले. पण ३,५०० रुपयांपैकी काहीही देण्यास एसटी महामंडळाने नकार दिला. त्यामुळे वेतनवाढीवर मर्यादा.

सर्व कर्मचाऱ्यांना ३२ टक्के ते ४८ टक्के वाढीचा दावा. मात्र प्रत्यक्षात ती १७ टक्के ते २५ टक्क्य़ापर्यंत वाढ

नियमित वेतनश्रेणीतील कर्मचाऱ्यांना किमान वेतन ४,६१९ रुपये व कमाल १२,०७१ रुपये वाढीचा दावा. मात्र प्रत्यक्षात अनुक्रमे ३,२१६ आणि कमाल ६,७३३ रुपये इतकीच वाढ कनिष्ठ कर्मचाऱ्यांना किमान ४,६१९ रुपये ते कमाल ९,१०५ रुपये एसटीचा दावा. प्रत्यक्षात मात्र ३,४३० रुपये आणि ६,१९६ रुपये वाढ होत आहे.

कनिष्ठांना न्याय्य थकबाकी दिली जाणार नाही

  • वार्षिक वेतनवाढीचा दर हा वेतन करारान्वये २००८ पासून ३ टक्के असताना व सातव्या वेतन आयोगामध्येही ३ टक्के असताना तसेच राज्य शासनामध्येही ३ टक्के असतानाही एसटी महामंडळालाच २ टक्के का असा आहे.
  • वार्षिक वेतनवाढीचा दर २ टक्के केल्यामुळे १ एप्रिल २०१६ नंतरची वेतनवाढीची रक्कम कमी होणार आहे.
  • संपूर्ण राज्यात कुठेही घरभाडे भत्ता कमी केला नाही. मग एसटी महामंडळातच कमी का असा आहे.

कुठे निलंबन, तर कुठे पोलिसांची कारवाई

  • यवतमाळमध्ये ९ आगारातील ४६ कर्मचाऱ्यांचे निलंबन
  • नांदेडमध्ये पाच कर्मचाऱ्यांचे निलंबन
  • बीडमधील अंबाजोगाई आगारातील १४ कर्मचाऱ्यांचे निलंबन
  • ठाण्यातील आठ कंत्राटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
  • परळमधून पोलिसांनी तीन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले.

कामगारांवर कारवाई केल्यास संघटना ठामपणे पाठीशी

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून यासंदर्भात एक प्रसिद्धिपत्रकच काढण्यात आले. या संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी कोणत्याही संघटनेने संपाची नोटीस न देता एसटी कामगार एवढय़ा मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरला याचाच अर्थ एसटी महामंडळाने जाहीर केलेली नवीन वेतनवाढ समाधान देणारी नाही आणि ती स्वीकारण्याबाबत मनमानी केली जात असल्याचे सांगितले आहे. आंदोलन दडपण्यासाठी प्रशासनाने कामगारांवर कारवाई केल्यास संघटना कामगारांच्या ठामपणे पाठीशी उभी राहील, असे संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले. महामंडळाने जाहीर केलेल्या वेतनवाढीपेक्षा अधिक रक्कम कर्मचाऱ्यांना मिळू शकते. त्यासाठी मान्यताप्राप्त संघटनेशी चर्चा करून तोडगा काढण्याचीही मागणी त्यांनी प्रसिद्धिपत्रकातून केली आहे.

गाडय़ा स्थानकांतच : गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला अघोषित संप शुक्रवारी सकाळपासून अधिक तीव्र झाला. कर्मचारी-कामगारांचा सहभाग पाहता मुंबई, ठाणे, पालघर, उस्मानाबाद, सातारा, सांगली, नागपूर, नांदेड, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासह राज्यातील बहुतांश भागात एसटी धावलीच नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 12:51 am

Web Title: st bus employees strike
Next Stories
1 मृग नक्षत्री आनंदघन अंगणी!
2 मला शिवसेनेची ऑफर होती-नारायण राणे
3 पावसात भिजत कर्तव्य बजावणारा ‘तो’ पोलीसच खरा हिरो – आनंद महिंद्रा
Just Now!
X