|| शैलजा तिवले

रखडलेली डिजिटल नोंदणी अखेर सुरू

मुंबई : करोना साथीने असंसर्गजन्य आजारांचे महत्त्व अधोरेखित केल्यानंतर राज्याने असंसर्गजन्य आजार निर्मूलनाचा कार्यक्रम राबविण्यावर विशेष भर दिला असून रुग्णांची डिजिटल नोंदणी राज्यात गेल्या वर्षापासून सुरू झाली आहे. वर्षभरात सुमारे २ लाख ८२ हजार असंसर्गजन्य रुग्णांची सॉफ्टवेअरमध्ये नोंदणी झाली आहे. यात सर्वाधिक म्हणजे जवळपास ८१ टक्के  रुग्ण हे उच्च रक्तदाबाचे असून ३३ टक्के  रुग्ण हे मधुमेहाचे आहेत.

असंसर्गजन्य आजारांचे वेळेत निदान आणि उपचारासाठी पाठपुराव्याच्या दृष्टीने डिजिटल नोंदणी करण्याचा प्रकल्प राबविण्याचे नियोजन मागील दोन वर्षांपासून राज्यात सुरू आहे. करोना साथीमुळे असंसर्गजन्य आजाराच्या रुग्णांची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध असण्याची गरज प्रामुख्याने निदर्शनास आल्यानंतर याला गती मिळाली आहे. यातून धडा घेत आरोग्य विभागाने अखेर रखडलेली टॅब खरेदी मार्गी लावून रुग्णांची डिजिटल नोंदणी सुरू केली. यात मुंबई वगळता सर्व जिल्ह्यांचा यात समावेश केला गेला. त्या दृष्टीने आरोग्यवर्धिनी केंद्रातील परिचारिकांना (एएनएम) प्रशिक्षण देऊन टॅबही गेल्या वर्षी दिले गेले. ३० वर्षांवरील व्यक्तींची नोंदणी आशा सेविका करत असून यांच्या प्राथमिक तपासण्या आणि डिजिटल नोंदणी एएनएम करतात. लक्षणे आढळलेल्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र्रात पुढील तपासणीसाठी पाठविले जाते. येथील डॉक्टर आजारांचे निदान करतात आणि उपचार सुरू केले जातात, असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.

राज्यात मार्च २०२० ते १ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मध्ये ३ लाख ८६ व्यक्तींच्या तपासण्या केल्याची नोंद सॉफ्टवेअरमध्ये झाली असून २ लाख ८२ हजार रुग्णांची माहिती जतन केली आहे. यात अधिक रुग्ण उच्च रक्तदाबाचे(२,३०,०३५) आणि मधुमेहाचे (९३,८८१) आहेत. डिजिटल स्वरूपात सर्वाधिक नोंदणी भंडारा (६५,६९९), अहमदनगर (५१,५२८) आणि सातारा (४५,६२२) या जिल्ह्यांमध्ये झाली आहे. सर्वात कमी नोंदणी परभणी(७), वाशिम (१५), यवतमाळ (१८) आणि सांगली (१७) येथे झाली आहे. सॉफ्टवेअरमध्ये तपासण्यांच्या नोंदी सर्वाधिक भंडारा, सातार आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या असल्याने उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या अधिकतर रुग्णांची नोंद याच जिल्ह्यांमध्ये झाली आहे. राज्यात गेल्या वर्षभरात १ कोटी ८० लाख रुग्णांच्या नोंदणी करण्याचे लक्ष्य होते; परंतु प्रत्यक्षात ७१ टक्के  डिजिटल नोंदणी पूर्ण झाली आहे.

तपासण्या आणि सॉफ्टवेअरमध्ये नोंदणी करण्यासाठी राज्यातील सुमारे दहा हजार एएनएमना प्रशिक्षण देऊन १०,६२० टॅब दिलेले आहेत. ३४ जिल्ह्यांमधील १८२४ प्राथमिक आरोग्य केंद्रावर निदान केले जात असून १८०९ वैद्यकीय अधिकाऱ्यांना याचे प्रशिक्षणही दिलेले आहे.

गर्भाशय मुखाच्या  कर्करोगाचे निदान

गर्भायश मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिकतर असून वेळेत निदान करणे गरजेचे आहे. यासाठी उपकेंद्र्र म्हणजेच आरोग्यवर्धिनी केंद्र्रातील एनएमला प्राथमिक तपासणी करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, जेणेकरून या स्तरावरच निदान करून पुढील तपासण्या तातडीने केल्या जातील. मार्च २०२१ पासून या तपासण्याही केल्या जातील, अशी माहिती डॉ. जोगेवार यांनी दिली.

आता मुंबईचाही समावेश

मुंबईत असंसर्गजन्य आजारांसाठी स्वतंत्र विभाग असल्याने डिजिटल नोंदणीमध्ये कार्यक्रमात समावेश केलेला नव्हता; परंतु या वर्षीपासून याचाही समावेश राज्याच्या विभागात केला जाणार असून नोंदणीसह अन्य कार्यक्रम राज्याच्या आरोग्य विभागामार्फत राबविले जाणार आहेत.

सुमारे ८०० कर्करुग्णांच्या नोंदी

तपासण्यांमधून निदान झालेल्या सुमारे ८०० कर्करुग्णांची नोंद केली आहे. यात सर्वाधिक ३८४ रुग्ण तोंडाच्या कर्करोगाचे आहेत. १६४ स्तनाच्या कर्करोगाचे आणि २४३ रुग्ण गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या रुग्णांची माहिती यात साठविलेली आहे. सर्वाधिक १४० तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांची नोंद साताऱ्यात झाली आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे सर्वाधिक ११० रुग्ण उस्मानाबादमध्ये नोंदले आहेत.

दरवर्षी ४० टक्के  याप्रमाणे राज्यातील सर्व असंसर्गजन्य रुग्णांची नोंदणी डिजिटल पद्धतीने करण्यात येणार आहे. करोनामुळे या वर्षी नोंदणीचे काम उशिराने सुरू झाले. त्यामुळे लक्ष्यापेक्षा कमी नोंदणी सॉफ्टवेअरमध्ये झाल्या आहेत; परंतु आता पुढील काळात अधिक जलद गतीने काम करण्यात येणार आहेत. डिजिटल नोंदणी झाल्यास या रुग्णांचा पाठपुरावा करणे सोपे होईल. – डॉ. पद्माजा जोगेवार, प्रमुख, राज्य असंसर्गजन्य आजार विभाग