05 June 2020

News Flash

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर झालेली पहिलीच लोकसभा निवडणूक हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी आव्हान मानले जात होते.

| May 17, 2014 02:54 am

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर झालेली पहिलीच लोकसभा निवडणूक हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी आव्हान मानले जात होते. हे आव्हान लीलया पेलताना शिवसेना सोडून गेलेल्या सर्वाचा पराभवही सेनेच्या उमेदवारांनी केल्यामुळे उद्धव यांच्या नेतृत्वावर आता निर्विवाद शिक्कामोर्तब झाले आहे. विशेष म्हणजे शेवटपर्यंत भाजप मनसेची भीती बाळगून होता तर मनसे हे आव्हानच नाही, असे सांगणाऱ्या उद्धव यांनी मनसेलाही या निवडणुकीत आपली ‘औकात’ दाखवून दिली.
लोकसभा निवडणुकीत झंझावाती प्रचार करून उद्धव ठाकरे यांनी अवघा महाराष्ट्र पालथा घातला. त्याचवेळी शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे व उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी शिवसेना उमेदवारांच्या मतदारासंघात रोड शो आणि मेळावे घेण्याचा सपाटा लावला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाळासाहेबांच्या अनुपस्थितीत होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने आणि या निवडणुकीच्या निकालावर विधानसभेचे भवितव्य अवलंबून असल्यामुळे उद्धव यांनी पहिल्यापासून पक्षबांधणीला सर्वाधिक महत्त्व दिले. गटनेत्यांचे विभागवार तसेच मतदारसंघनिहाय मेळावे घेऊन पक्ष तळागाळापर्यंत निवडणुकीसाठी सज्ज राहील याची काळजी घेतल्यामुळे शिवसेनेने सर्वच्या सर्व म्हणजे १९ जागी विजय मिळवला. गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमदेवारांमुळे मुंबईतील सेना-भाजपचा सर्वच्या सर्व जागी पराभव झाला होता आणि काँग्रेस आघाडी विजयी झाली होती. यावेळी त्याचे पुरेपूर उट्टे काढत सेना-भाजपने मुंबईतील सर्वच्या सर्व जागा विक्रमी मतांनी जिंकल्या एवढेच नव्हे तर मनसेच्या उमेदवारांना लाखभरही मते मिळू शकली नाहीत हे उद्धव ठाकरे आणि महायुतीचे यश म्हणावे लागेल, असे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
लोकसभा निवडणूक लढवताना मनसेने मुंबईत केवळ शिवसेनेच्या विरोधातच उमेदवार देऊन मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मनसेने एकीकडे मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देण्याची चाल खेळली तर दुसरीकडे केवळ शिवसेनेच्याच विरोधात मुंबईत उमेदवार उभे केले. या साऱ्याला पुरून उरत उद्धव यांची रणनीती आणि मोदी लाटेच्या जोरावर शिवसेनेने मुंबईत सर्वच्या सर्व जागा जिंकल्या. गेल्यावेळी दक्षिण मुंबईत मनसे दुसऱ्या स्थानावर होती तर शिवसेना तिसऱ्या स्थानावर होती. यावेळी काँग्रेसचे खासदार मिलिंद देवरा यांचा पराभव करून सेनेचे अरविंद सावंत विजयी तर झालेच परंतु मनसेच्या बाळा नांदगावकर यांना लाखभरही मते मिळवता आली नाहीत. मुंबईत मनसेच्या तिन्ही उमेदवारांना लाखभर मते मिळवता आलेली नसून दादरचा बाकेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्याच्या दृष्टीने राहुल शेवाळे यांचा विजय शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. शिवसेना महाराष्ट्रात सर्वच्या सर्व जागा जिंकेल असा विश्वास उद्धव ठाकरे हे सुरुवातीपासून व्यक्त करत होते एवढेच नव्हे तर महायुतीच्या विजयासाठी नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच महाराष्ट्रात त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, असेही सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब हयात असतानाही उद्धव यांच्या नेतृत्वाखालीच शिवसेनेने मुंबई, ठाणे तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका जिंकल्या होत्या. तथापि या विजयाचे श्रेय उद्धव यांचे ‘राज’कीय विरोधक बाळासाहेबांनाच देत होते. खरे तर ज्याप्रमाणे मोदी हे एका रात्रीत उदयाला आलेले नाहीत. त्यांनी गेली पंचवीस वर्षे पक्षबांधणीपासून गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली, त्याचप्रमाणे १९९३पासून उद्धव ठाकरे शिवसेनेच्या पक्षबांधणीकडे लक्ष देत होते. गटप्रमुखांच्या नियुक्तीपासून त्यांनी पक्षबांधणीच्या कामाला सुरुवात केली. बाळासाहेबांच्या निधनानंतरही उद्धव यांनी राज्यव्यापी दौरा केला तेव्हापासून सातत्याने केलेल्या पक्षबांधणीतून शिवसेनेच्या सर्व विरोधकांना चारी मुंडय़ा चित करण्याची किमया उद्धव यांनी साध्य केल्यामुळे आता त्यांच्या नेतृत्वावर निर्विवाद शिक्कामोर्तब झाले आहे.
विधानसभेतही महायुतीच!
लोकसभा निवडणुकीत मिळालेला विजय आणि त्यानंतर अवघ्या चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता महायुती म्हणूनच विधानसभा निवडणुका लढण्यात येतील, असे भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस यांनी ही भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली असून विधानसभेत अन्य कोणाची गरज लागणार नाही, हे पुरते स्पष्ट झाल्याचे भाजपच्या एका नेत्याने सांगितले.

२० जागांवर शिवसेनेने उमेदवार उभे केले होते. त्यापैकी हिंगोलीत सुभाष वानखेडे आणि कोल्हापूरमधून संजय मंडलिक या दोघांचा पराभव झाला आणि १८ जागांवर शिवसेनेने विजयाची मोहोर उमटवली.
मोदीजिंकले बारी सारे हरले, एवढीच प्रतिक्रिया या लोकसभा निवडणुकीच्या निकालानिमित्त राज ठाकरे यांनी दिली आहे. मनसेला मिळालेली मते. अनामत रक्कम का जप्त झाली. तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची वेळ मनसेवर का आली, लोकांनी मनसेला का झिडकारले, याबाबत त्यांनी काहीही भाष्य केले नाही.
विजयामुळे मन भरून आले आहे. बोलण्यासाठी शब्द नाहीत. हा विजय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब तसेच महायुतीचे कार्यकर्ते आणि जनतेचा आहे. देशाला पर्याय सापडला आहे आता राज्यालाही पर्याय सापडू द्या. लोकसभा निवडणुकीतील विजयाचे गीत विधानसभा निवडणुकीतही वाजू द्या.
११जागांवर २००९च्या निवडणुकीत मनसेने उमेदवार उभे केले होते. त्यापैकी नऊ जागांवर युतीचा पराभव झाला होता.
१०जागांवर मनसेने यंदाच्या निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. मात्र युतीला एकाही जागेवर धक्का पोहोचला नाही.
१ लाखापर्यंतही मते मनसेच्या एकाही उमेदवाराला मिळवता आली नाहीत.

नवी मुंबई आणि गणेश नाईक या आजवरच्या अभंग राहिलेल्या समीकरणाला प्रथमच धक्का बसला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातून संजीव नाईक यांना पराभवाची धूळ चारत शिवसेनेचे राजन विचारे लाखोंच्या मताधिक्याने विजयी झाले.

दक्षिण मध्य मुंबईतून काँग्रेसचे एकनाथ गायकवाड विजयाच्या हॅट्ट्रिकची आशा बाळगून होते. काँग्रेसचा हक्काचा मतदार, मनोहर जोशी यांची नाराजी आणि मनसे रिंगणात असतानाही शिवसेनेचे राहुल शेवाळे यांच्या पारडय़ात मतदारांनी दणदणीत मते टाकली.

शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले आनंद परांजपे कल्याण मतदारसंघातून उतरले होते. मनसेनेही आगरी मते खेचू शकेल असा तुल्यबळ उमेदवार दिला होता. त्या तुलनेत नवखे असलेले श्रीकांत शिंदे यांना मतदारांनी मोदी लाटेला स्मरून भरभरून मते दिली.

दक्षिण मुंबईत मिलिंद देवरा यांच्यासमोर अरविंद सावंत टिकणार नाहीत, असा उमेदवारी जाहीर झाली तेव्हाचा अंदाज होता. प्रत्यक्षात या गुजरातीबहुल मतदारसंघाने ‘मोदी फॉर पीएम’चा सूर लावत सावंत यांच्याबाजूनेच एकगठ्ठा मतदान केले आणि देवरा पराभूत झाले.

सातवेळा आमदार आणि एकदा खासदार आणि मधली अनेक वर्षे राज्यात मंत्रीपद असा दबदबा असलेल्या पद्मसिंह पाटील यांना पराभव माहीतच नव्हता. उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेनेचे रवि गायकवाड यांनी तब्बल दोन लाख ३३ हजार मतांनी त्यांना पराभवाची धूळ चारली.

रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे यांना विजयाची खात्री होती. शिवसेनेचे अनंत गीते यांनी त्यांचा पराभव केला. दोन हजार मतांच्या फरकाने गीते विजयी झाल्याने तटकरे यांनी फेरमतमोजणीची मागणी केली असली तरी मोदीलाटेने त्यात काही फरक पडणार नसल्याचेच जाणवते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2014 2:54 am

Web Title: stamp on uddhav thackerays leadership
Next Stories
1 मुंबईसह ठाणे आणि कल्याणमध्ये शिवसेना-भाजपचे निर्विवाद वर्चस्व
2 कॉंग्रेसचा आपटीबार, अब की बार मोदी सरकार!
3 संधी दिली, आता स्थिर सरकार द्या..
Just Now!
X