पावसाळा लांबला असला आणि गेल्या आठवडय़ात मराठवाडय़ातदेखील अनेक ठिकाणी पावसाने चांगलीच हजेरी लावली असली तरी सोलापूर, लातूर, बीड आणि यवतमाळ जिल्ह्य़ांत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. तर संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा ३२ टक्के अधिक पाऊस झाला आहे.

सोलापूर जिल्ह्य़ात मागील आठवडय़ात सरासरीपेक्षा ५० टक्के पाऊस कमी झाला होता. त्यानंतर आठवडाभरात जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. एका रात्रीतच ११५ मिमी पाऊस झाला. या सर्वाच्या परिणामी जिल्ह्य़ात शनिवार अखेर पावसाची नोंद सरासरीपेक्षा ३९ टक्के कमी होती. बीड जिल्ह्य़ात सरासरीपेक्षा २६ टक्के, लातूर २१ टक्के आणि यवतमाळ ३० टक्के कमी पाऊस पडला. राज्यात सरासरीपेक्षा सर्वाधिक म्हणजेच ११३ टक्के अधिक पावसाची नोंद पुणे जिल्ह्य़ात झाली आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, सातारा, नाशिक, धुळे सरासरीपेक्षा ६० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, नंदुरबार, जळगाव, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्य़ांत सरासरीपेक्षा २० ते ५९ टक्के अधिक पाऊस झाला. उर्वरित महाराष्ट्रात पावसाने सरासरी गाठली.

पावसाच्या दीर्घकालीन पूर्वानुमानानुसार ३ ऑक्टोबपर्यंत राज्यात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात दमदार पावसाची शक्यता आहे. तर १७ ऑक्टोबपर्यंत काही ठिकाणी तुरळक पाऊस पडू शकतो. त्यानंतरच्या आठवडय़ात राज्यात पावसाची शक्यता नाही.