संदीप आचार्य

देशभरातील अनेक राज्यांत प्राणवायूअभावी करोना रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. महाराष्ट्रातही  प्राणवायूच्या मुद्द्याने रौद्र रूप धारण केले असून केंद्र सरकारने राज्याची  प्राणवायूची गरज लक्षात घेऊन १६६१ मेट्रिक टन  प्राणवायू साठा  प्राणवायू उत्पादक कंपन्यांकडून उचलण्यास मान्यता दिली आहे. तथापि हा  प्राणवायू राज्याला मिळालेला नसून सध्या राज्य सरकार स्वखर्चाने दररोज ४०० मेट्रिक टन ऑक्सिजन विकत घेत आहे.

महाराष्ट्रात १२०० मेट्रिक टन  प्राणवायूचे उत्पादन होत असून उत्पादन होणारा सर्व  प्राणवायू वैद्यकीय कारणांसाठी वापरण्याचा आदेश सरकारने जारी केला आहे. तथापि रोजच्या रोज राज्यात नव्याने बाधित होणारे ६५ ते ६८ हजार करेनाबाधित रुग्ण आढळून येत असून त्यांच्यासाठी १५५० मेट्रिक टन  प्राणवायूचा वापर करावा लागत असल्याचे आरोग्य विभागातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हा जास्तीचा  प्राणवायू राज्य सरकार ‘स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया’कडून विकत घेत असून जवळपास ४०० मेट्रिक टन  प्राणवायू यासाठी विकत घेण्यात येत असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. ‘स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया’च्या नागपूर, हैदराबाद व गुजरात येथील प्लांटमधून हा  प्राणवायू घेण्यात येत असून वाहतुकीसह सर्व खर्च राज्य सरकार करत आहे.

राज्यात सध्या ६२ हजारांहून अधिक ऑक्सिजन बेड असून वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता आता केंद्राकडून जास्तीच्या  प्राणवायूच्या पुरवठ्याला मान्यता मिळणे गरजेचे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील विविध राज्यांतील  प्राणवायू पुरवठ्याचा आढावा घेतला. त्या वेळी  प्राणवायूची अत्यंत गरज असलेल्या बारा राज्यांची एकत्रित मागणी ४८०० मेट्रिक टन एवढी होती. केंद्र शासनाचे काही प्रमुख विभाग तसेच देशातील  प्राणवायू उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची बैठक होऊन राज्यांची मागणी व पुरवठा याचा अभ्यास करण्यात आला.

केंद्र सरकारने मंजूर केल्यानुसार अजून महाराष्ट्राला जास्तीचा  प्राणवायू मिळाला नसल्याचे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ही देशात सर्वाधिक असून  प्राणवायूची गरजही किती तरी जास्त आहे. परिणामी सध्या दररोज ४०० मेट्रिक टन  प्राणवायू ‘स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया’कडून विकत घेण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

देशाच्या वेगवेगळ्या राज्यांतील रुग्णांची संख्या वेगाने वाढल्यामुळे  प्राणवायू उत्पादन कंपन्यांनाही त्यांचे उत्पादन वाढविण्यास सांगण्यात आले आहे. राज्य सरकारने युनिसेफच्या मदतीने पाच ठिकाणी ऑक्सिजन प्लांटचे काम हाती घेतले आहे. तसेच २० जिल्ह्याांत जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने ऑक्सिजन प्लांटचे काम सुरू करण्यात आले असून ११ ठिकाणी सीएसआर निधीतून हे काम होणार आहे. याशिवाय २०० बेडपेक्षा मोठ्या असलेल्या आरोग्य विभागाच्या दहा रुग्णालयांत ऑक्सिजन प्लांटचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

प्राणवायू एक्सप्रेसमधील तीन टँकर नागपुरात

नागपूर :  विशाखापट्टणम येथून निघालेली प्राणवायू एक्सप्रेस शुक्रवारी रात्री नागपुरात दाखल झाली. येथे तीन टँकर उतरवण्यात आले. त्यामुळे शहरातील प्राणवायूचा तुटवडा भरून निघण्यास मदत होणार असून करोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.  वाटपाचे नियोजन स्थानिक प्रशासन करणार आहे.

विशाखापट्टणम स्टील प्लांट सायडिंगमधून द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूच्या सात (एलएमओ) टँकर्ससह रो-रो सेवेद्वारे प्राणवायू एक्सप्रेस रात्री ८.१० वाजता नागपुरात दाखल झाली व तीन टँकर उतरवून  उर्वरित टँकरसह  नाशिककडे निघाली. यावेळी रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील आणि त्यांची चमू तसेच स्थानिक प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. तीन टँकर स्थानिक प्रशासनाच्या सुपूर्द करण्यात आले राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला आहे. प्राणवायूअभावी राज्यातील अनेक रुग्ण दगावले आहेत. ही तूट भरून काढण्यासाठी विशाखापट्टणम येथून प्राणवायू मागवण्यात आले. प्राणवायूची वाहतूक रस्ता मार्गापेक्षा रेल्वेने अधिक जलद गतीने होते. त्यामुळे रेल्वेच्या रो-रो  सेवेमार्फत प्राणवायू आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

आज नाशिकला आगमन

नाशिक : करोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने संपूर्ण राज्यात प्राणवायूचा तुटवडा भासत आहे. अशा संकटसमयी विशाखापट्टणमहून निघालेली देशातील पहिली प्राणवायू एक्स्प्रेस शनिवारी सकाळी देवळालीतील मालधक्क्यावर पोहोचणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या जिल्ह्यांत नाशिकहून रस्तेमार्गाने सात टँकर सुरक्षा व्यवस्थेत पाठविले जाणार आहेत. प्र्रत्येकी १६ टन क्षमतेचे हे टँकर आहेत. या माध्यमातून ११२   टन द्रवरूप प्राणवायूचा पुरवठा होईल. प्राणवायूसाठी नवी मुंबईच्या कळंबोली रेल्वे स्थानकातून १८ एप्रिलच्या रात्री रिकामे टँकर घेऊन ही एक्स्प्रेस विशाखापट्टणमला गेली होती.

राज्यनिहाय साठा

* केंद्रीय आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव निपुण विनायक यांनी संबंधित राज्यांना २१ एप्रिल रोजी पत्र पाठवून प्रत्येक राज्याला किती ऑक्सिजन कंपन्यांकडून उचलता येईल ते स्पष्ट केले.

* या पत्रानुसार महाराष्ट्राला १६६१ मेट्रिक टन ऑक्सिजन मंजूर झाला आहे.

* गुजरातने केंद्राकडे ९७५ मेट्रिक टनाची मागणी केली होती. त्यांना १००० मेट्रिक टन मंजूर करण्यात आला आहे. -दिल्लीने ४८० मेट्रिक टनाची मागणी केली असून त्यांना ८०० मेट्रिक टन दिला जाणार आहे.

* उत्तर प्रदेशने ७५३ मेट्रिक टन मागणी केली व त्यांना ८०० मेट्रिक टन मंजूर करण्यात आला.

पोलाद कं पनीकडून  प्राणवायू

मुंबई :  महाराष्ट्रातील प्राणवायू निर्मिती वाढविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील ‘सोना अलॉयज’ या पोलाद निर्मिती कंपनीला तातडीने विजेचा भार वाढवून दिल्याने दररोज किमान १५ टन प्राणवायू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोणंद येथील ‘सोना अलॉयज’ या उद्योगाने टाळेबंदीच्या मंदीमुळे आपल्या कारखान्याचा विजेचा जोडभार कमी केला होता. प्राणवायूची टंचाई लक्षात घेऊन प्रकल्पातून अतिरिक्त किमान १५ टन प्राणवायू निर्मिती करण्याची तयारी दाखवत कंपनीने ८०० केव्हिएचा भार वाढवून मागितला. तो राऊत यांनी तातडीने मंजूर केल्याने एक-दोन दिवसांत पोलाद कंपनीकडून १० ते १५ टन प्राणवायू राज्याला मिळेल.