ध्वनीचित्रफीत सध्या विद्यार्थ्यांमध्ये चर्चेचा विषय; उपाययोजनेसाठी समितीची स्थापना

मुंबई : देशातील नामांकित आयआयटी मुंबईमध्ये प्रवेश घेण्याची मनिषा लाखो विद्यार्थी दरवर्षी बाळगतात. या आयआयटीच्या वर्गामध्ये शिरण्याचा मोह परिसरातील गायीलाही आवरलेला नाही. आयआयटीच्या वर्गात अचानक गाय शिरल्यामुळे उडलेल्या गोंधळाची ध्वनीचित्रफीत सध्या विद्यार्थ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

आयआयटीच्या परिसरात एका बैलाने विद्यार्थ्यांला धडक देण्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर या प्रतिष्ठित शैक्षणिक संकुलात भटकणाऱ्या मोकाट जनावरांचा विषय ऐरणीवर आला. आता पुन्हा एकदा या जनावरांमुळे गमतीदार प्रसंगाला विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागले आहे. एका वर्गात तासिका सुरू असताना अचानक एक गाय शिरली. कर्मचाऱ्यांनी या गायीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. वर्गात भटकून अखेर ही गाय बाहेर पडली अशी ध्वनीचित्रफित समाज माध्यमांवर फिरत आहे. ही चित्रफित आयआयटी मुंबई येथील असल्याचीही चर्चा आहे. विद्यार्थ्यांमध्ये या चित्रफितीचा विषय सध्या रंगला आहे.

ही चित्रफित आयआयटी मुंबई येथीलच आहे किंवा नाही हे खात्रीने सांगता येणार नाही, असे आयआयटीच्या प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र आयआयटीच्या आवारात सध्या मोकाट जनावरांचा वावर वाढला असून त्यावर उपाय योजण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. महापालिका, स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने भटक्या गुरांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कर्मचारी, सुरक्षा विभाग सर्वतोपरी काळजी घेत आहे,’ असे आयआयटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.