सुहास बिऱ्हाडे

@suhas_News

suhas.birhade@expressindia.com

१४ सप्टेंबर २०१८. नालासापोरा येथील १३ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीच्या घराजवळ एक अनोळखी इसम आला. तुझ्या वडिलांनी दुकानातील सामान घ्यायचे आहे, अशी भूलथाप देऊन तिला सोबत नेले. तुझे वडील जवळच आहेत असे सांगून एका इमारतीच्या गच्चीवर नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

या घटनेनंतर आठवडय़ाभरातच नालासोपाऱ्यातील आणखी दोन अल्पवयीन मुली अशाच प्रकारे लैंगिक अत्याचाराच्या शिकार बनल्या. हा अनोळखी इसम अल्पवयीन मुलींना विविध कारणं सांगून घेऊन जायचा आणि शहरातील निर्जन स्थळी नेऊन बलात्कार करायचा. याच विकृताने नवी मुंबई, ऐरीली, ठाणे मुंबई येथेही अशाच प्रकारे अनेक अल्पवयीन मुलींना आपले सावज बनवले होते. २०१६ पासून पोलीस आणि गुन्हे शाखा त्याचा शोध घेत होती. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात बलात्काराचे १५ गुन्हे दाखल होते, पण तो हाती लागत नव्हता. त्याने आता नालासोपाऱ्यात आपला मोर्चा वळवला होता.

सीसीटीव्ही दृश्यांच्या आधारे नवी मुंबई पोलिसांनी या विकृत नराधमाची छायाचित्रे काढून त्याच्या प्रती नवी मुंबईत तसेच आसपासच्या शहरांत वाटल्या होत्या. त्याची माहिती देणाऱ्यास २५ हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. पण दोन वर्षांपासून हा अत्याचारी पोलिसांच्या तावडीत सापडत नव्हता. नालासोपाऱ्यातील तुळींज पोलिसांनी हे आव्हान स्वीकारले. पण केवळ सीसीटीव्ही चित्रीकरण आणि त्या छायाचित्रावरून त्याला पकडणे सोपे नव्हते. त्याला पकडण्याबरोबरच त्याने आणखी कृत्य करू नये यासाठी मोठी जनजागृती करणे आवश्यक होते.

तुळींज पोलिसांनी मग तीनही अल्पवयीन मुलींचे सविस्तर जबाब घेतले. हा विकृत कसा बोलतो, त्याच्या वर्णनावरून त्याचे रेखाचित्र बनवले. नालासोपाऱ्यात बलात्काराची घटना घडली त्या संखेश्वर नगर येथील सीसीटीव्हीचे चित्रण पोलिसांना मिळाले होते. त्यातील विकृताच्या छायाचित्राची भित्तिपत्रके जागोजागी चिकटविण्यात आली. गणेशोत्सवाचा काळ होता. शाळांमध्ये, वस्त्यावस्त्यांमध्ये पोलीस त्याची छायाचित्रे घेऊन फिरू लागले. अशीच माहिती घेत असताना संखेश्वर नगर येथील एका सीसीटीव्हीच्या चित्रीकरणात हा तरुण दिसला. नालासोपारा स्थानकाजवळ जाताना तो या चित्रीकरणात आढळला होता. आधीच्या दोन घटनांतील सीसीटीव्हींतही तो रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले होते. यावरून तो रेल्वेने प्रवास करत असावा, असा अंदाज पोलिसांनी बांधला. त्यानंतर वसई, नायगाव, भाईंदर, मीरा रोड स्थानकांतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यास सुरुवात करण्यात आली. जवळपास पाचशे तासांचे चित्रण पोलिसांनी तपासले. हे काम सोपे नव्हते. मात्र लाखो प्रवाशांच्या गर्दीतून पोलिसांनी या विकृताला शोधून काढले. तो मीरा रोड येथे उतरल्याचे दिसून आले.

त्याने केलेली सर्व कृत्ये बुधवारची होती.

एका सीसीटीव्ही चित्रीकरणात हा तरुण मोबाइलवर बोलत असताना दिसला. त्यावरून पोलिसांनी ‘डम्प डाटा’ काढून त्या वेळी त्या ठिकाणहून आलेल्या-गेलेल्या फोन कॉलची पडताळणी सुरू केली. त्याच वेळी मीरा रोड परिसरात तुळींज, नवी मुंबई व ठाण्याच्या पोलिसांनी ठिकठिकाणी सापळे लावले. एका पानाच्या टपरीवर उभा असताना हा विकृत पोलिसांच्या तावडीत सापडला.

मीरा रोडलाच राहणाऱ्या या विकृताचे नाव रेहमत कुरेशी. आजवर शंभरहून अधिक मुलींवर अत्याचार केल्याची कबुली या नराधमाने दिल्यावर पोलीसही हादरून गेले. लोकलने नवी मुंबई, ठाणे, नालासोपारा या परिसरात जायचे. एखादी मुलगी दिसली की तिच्यावर दोन-तीन दिवस पाळत ठेवायची. त्यानंतर तिला खोटे बोलून निर्जनस्थळी न्यायचे व तिच्यावर अत्याचार करायचा, अशी त्याची विकृत कार्यपद्धत होती. अनेक महिने पोलिसांना गुंगारा दिल्याने तो आपल्या कृत्याबद्दल बेफिकीरही झाला होता. मात्र वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, उपअधीक्षक दत्ता तोटेवाड यांनी संपूर्ण ऑपरेशन अगदी अभ्यासपूर्ण पद्धतीने, संयमाने हाताळणे आणि गेली अनेक वर्षे मोकाट असणारा हा विकृत सापडला.

कुल्र्यातील ‘सीरियल किलर’

२०१० मध्ये कुर्ला येथे अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या ‘सीरियल किलर’ची दहशत निर्माण झाली होती. त्याचा शेवटपर्यंत तपास लागला नव्हता. तो ‘सीरियल किलर’ अन्य कुणी नसून हाच विकृत रेहमत कुरेशी होता. त्याने दोन अल्पवयीन मुलींच्या हत्येची कबुलीही दिली आहे.