‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेत वक्त्यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र

मुंबई : आपल्याला डॉक्टर, अभियंता किंवा आणखी काही व्हायचे आहे, असे अनेकजण सांगतात, पण नेमके ते का व्हायचे, हे अनेकांना सांगता येत नाही. तेव्हा आपण आयुष्यात पुढे काय करणार आहोत, याचा विचार प्रत्येकाने स्वत:शी ठामपणे केला पाहिजे. कारण नुसती पदवी नव्हे, तर पॅशनही महत्त्वाची आहे, असे मार्गदर्शन तज्ज्ञांनी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत उपस्थित विद्यार्थ्यांना केले. यामुळे यशाकडे नेणाऱ्या मार्गाविषयीची सजगताही वाढली.

या कार्यशाळेत शुक्रवारी बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते आणि डॉ. जयंत पानसे यांनी अनुक्रमे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखा आणि त्यातील करिअर या विषयीचा कानमंत्र उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना दिला.  प्राप्तिकर उपायुक्त प्रसाद चाफेकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीविषयी मार्गदर्शन केले तर करिअर समुपदेशक विवेक वेलणकर यांनी कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील करिअर संधी उपस्थितांसमोर उलगडली.

मुळात तुम्हाला डॉक्टर का व्हायचे आहे, हा प्रश्न स्वत:च्या मनाशी विचारून त्याचे उत्तर शोधा. हे उत्तर तुम्हाला सापडले नाही तर तुम्ही तुमच्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. वैद्यकीय शाखेत प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थी अकरावीची परीक्षा झाली की जागे होतात. खरे तर दहावीची परीक्षा दिली की तुम्ही याविषयी गंभीरपणे विचार केला पाहिजे, असं नमूद करून डॉ. अन्नदाते म्हणाले, वैद्यकीय शाखेसाठीच्या प्रवेश परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. हा अभ्यास तुम्ही वाचन, समजून घेऊन वाचन, लक्षात ठेवून वाचन आणि जे वाचलं आहे ते लिहून काढणे, अशा टप्प्यात करा. काही विद्यार्थ्यांना नीट परीक्षेची भीती वाटते. ती दूर करण्यासाठी दररोज किमान पाच प्रश्न सोडवायचेच असा मनाशी निर्धार केला तर तीन महिन्यांतच तुमची भीती पळून जाईल. ‘एमबीबीएस’नंतर ‘एमडी’ करणे केव्हाही उत्तमच आहे. आयुर्वेद आणि होमिओपॅथी या शाखांसह नर्सिग, फिजिओथेरपिस्ट, जैववैद्यकीय तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी यांना येणाऱ्या काळात चांगली मागणी असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

कोणतीही पदवी तुम्हाला मोठे करत नसते तर तुमच्यातील जिद्द, निष्ठा, क्षमता आणि एखाद्या गोष्टीसाठी तुमची ‘पॅशन’ तुम्हाला मोठे करत असते, असेही डॉ. अन्नदाते यांनी सांगितले.

डॉ. पानसे म्हणाले, वैद्यकीयखालोखाल विद्यार्थी आणि पालक यांच्या पसंतीचे क्षेत्र अभियांत्रिकीचे आहे. अभियांत्रिकीच्या आज सुमारे दीड लाख जागा उपलब्ध असून नोकरीची मात्र खात्री नाही. कमी पगाराच्या नोकरीवरही काम करावे लागते. अभियांत्रिकी हे क्षेत्र परिणाम आणि कारण यावर अवलंबून आहे. अभियांत्रिकी शाखेकडे प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थ्यांनी इंग्रजी लेखन, संवादकौशल्य यावरही अधिक मेहनत घेणे गरजेचे आहे. अभियांत्रिकी शाखेकडे प्रवेश घेण्यापूर्वी आपली शारीरिक, मानसिक आणि आर्थिक क्षमताही तपासून पाहणे आवश्यक आहे.

कार्यकर्ता अधिकारी!

प्राप्तिकर उपायुक्त प्रसाद चाफेकर यांनी सांगितले की, कार्यकर्ता अधिकारी होण्यासाठी प्रशासन सेवेत यावे. येथे काम करताना तळमळ कार्यकर्त्यांची असावी आणि लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिकाराचा वापर करावा. प्रामाणिकपणे जगता येईल इतके वेतन प्रशासकीय सेवेतील नोकरीत नक्कीच मिळते. या नोकरीत तुमच्या हातात सत्ता, अधिकार येतात, त्यांचा उपयोग लोकांच्या भल्यासाठीच करावा. कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील पदवी घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देता येते. ही परीक्षा देण्यासाठी वय वर्षे २१ हे अधिक योग्य आहे. जेवढय़ा लहान वयात तुम्ही ही परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण व्हाल त्याचा फायदा पुढे नोकरीत सेवाज्येष्ठतेसाठी होतो.

चाफेकर यांनी आपल्या भाषणात या परीक्षेची तयारी, विषयांची निवड, शिस्त आणि वेळेचे महत्त्व, आत्मविश्वास याविषयीही विवेचन केले.

विवेक वेलणकर मार्गदर्शन करताना म्हणाले, कोणतीही अभ्यासशाखा किंवा करिअर निवडले तरी कष्टाला पर्याय नाही, हे कायम लक्षात ठेवा. तुमच्या आवडीचे जे विषय आहेत त्यांचा विचार करून शाखेची निवड केली तर तो अभ्यास कष्ट वाटणार नाही.

या कार्यशाळेत विद्यालंकारच्या गणित विभागाचे प्रमुख हितेश मोघे, गरवारे इन्स्टिटय़ूच्या मेधा तापीयालवाला, निरंजन आमटे, झील अकादमीच्या पल्लवी पाडेकर यांनीही विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले.

दरम्यान लोकसत्ता- मार्ग यशाचा या कार्यशाळेत गुरुवारी (पहिल्या दिवशी) मनोविकार तज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे, शेफ देवव्रत जातेगावकर, नाटककार दिग्दर्शक अभिराम भडकमकर, चित्रकार समीक्षक महेंद्र दामले, अभियांत्रिकी तज्ज्ञ डॉ. जयंत पानसे, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजय सुरसे, समुपदेशक विवेक वेलणकर, नाशिक जिल्ह्य़ाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (डेप्युटी सीईओ) अनिल नागणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विविध संस्था, अभ्यासक्रम यांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते.