शेतकऱ्यांच्या समस्या, पाण्याचे दुर्भिक्ष्य, दुष्काळ, भारनियमन यांपासून ते सार्वजनिक ठिकाणी असलेला चेंगराचेंगरी होण्याचा धोका अशा आसपास दिसणाऱ्या समस्यांची जाण त्यावर शोधलेल्या उपायांमधून विद्यार्थ्यांमधील कल्पकतेची झलक रविवारी उपस्थितांना पाहता आली. ‘मराठी विज्ञान परिषदेने होमी भाभा विज्ञान केंद्रात आयोजित केलेल्या नवव्या राज्यस्तरीय बाल विज्ञान संमेलनात राज्यभरातील शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे १०४ प्रकल्प सादर करण्यात आले.

शहरी आणि ग्रामिण भागांतील विद्यार्थी त्यांच्या भोवतालच्या समस्यांवर या संमेलनात व्यक्त झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे संमेलन हक्काचे व्यासपीठ ठरले आहे. इंटरनेट, पुस्तके मिळवण्यासाठी कष्ट घ्यावे लागणाऱ्या अकोल्यातील हिवरखेड येथील सुयश कोचिंग क्लासचे ५३ विद्यार्थी संमेलनात सहभागी झाले होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत कुठेच मागे राहू नये असे वाटते. म्हणून मी माझ्या फोनवर विद्यार्थ्यांना माहिती उपलब्ध करून देतो. संमेलनासाठी देण्यात आलेल्या विषयांतील आवडलेला विषय विद्यार्थी निवडतात आणि महिनाभर आम्ही प्रकल्पावर काम करतो, असे शिक्षक अमोल येऊल यांनी सांगितले.

चाळीसगाव येथील ए. बी. हायस्कूलचा विद्यार्थी चंद्रजीत कच्छवा याने ‘सौरऊर्जा उपकरणे’ हा विषय प्रकल्पासाठी निवडला. ‘‘आमच्या गावी भारनियमन होते. रात्री-अपरात्री वीज आली की वडिलांना झोपेतून उठून शेतातला बंब सुरू करावा लागायचा, म्हणून आम्ही सौरपंप लावून घेतला. त्यावरून मी सौरऊर्जा उपकरणे तयार केली, असे चंद्रजीत याने सांगितले.

गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालयाच्या वेदांत फाटक याने आपत्कालीन स्थितीत चेंगराचेंगरी टाळण्यासाठी सरकत्या भिंतीचा उपाय सुचवला. ‘‘माझा दादा ज्या सिनेमागृहात काम करतो. तिथे बॉम्ब असल्याची अफवा पसरली होती. दरवाजातून लोक बाहेर पळत असताना चेंगराचेंगरी झाली. तेव्हा बाबांनी मला ‘आपत्ती व्यवस्थापन’ विषय सुचवला. मी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्या मुलाखती घेतल्या. वास्तुविशारदांचा सल्ला घेतला’’, असे त्याने सांगितले.

विज्ञानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, हा या संमेलनाचा उद्देश आहे. यामुळे समस्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करायला विद्यार्थी शिकतात, असे मराठी विज्ञान परिषदेच्या सुचेता भेडसगावकर यांनी सांगितले.

निकाल

छोटा गट (आठवी ते दहावी)

* प्रथम क्रमांक – ओम चौधरी, वेदांत चव्हाण (तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय, जळगाव) – चाळीसगाव परिसरातील सर्पदंश समस्येचा अभ्यास.

* द्वितीय क्रमांक – पूर्वा भामरे, श्रावणी जाधव (कै. एन. एस. पी. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धुळे)- गाजर गवतापासून जैविक खतनिर्मित.

* तृतीय क्रमांक – युग वर्मा, रिनिका छेडा (उत्पल संघवी ग्लोबल स्कूल, जुहू, मुंबई)- जीवन दिया (लाइट अ लॅम्प प्लांट अ लाइफ)

मोठा गट (कनिष्ठ महाविद्यालय)

* प्रथम क्रमांक – प्राजक्ता चिनावलकर (पू. साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार)- २०१९ सालचा दुष्काळ व त्याचे परिणाम.

* द्वितीय क्रमांक – ईशा वडस्कर, वैष्णवी तडसे (लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर) – क्लोथ्स (व्हरायटीज, युझेस, कॅरेक्टरीस्टिक्स)

* तृतीय क्रमांक – ज्ञानेश्वरी धांडे, वैष्णवी चौधरी (धनाजी नाना विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, जळगाव)- गावातील पाणी समस्या.