तस्कर बेबी पाटणकरशी संबंध असल्याच्या आरोपावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास गोखले यांना निवृत्तीच्या आदल्या दिवशी अटक करण्यात आली. या अटकेमुळे त्यांची सहाय्यक पोलीस बनण्याची संधी हुकली आहे. अटकेमुळे त्यांचे नाव बढती मिळालेल्या अधिकाऱ्यांच्या यादीतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
 सुहास गोखले अमली पदार्थ विरोधी शाखेच्या आझाद मैदान कक्षामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. ३१ मे २०१५ रोजी ते सेवानिवृत्त होणार होते. मात्र शुक्रवार २९ मेच्या रात्रीच त्यांना अटक करण्यात आली.
याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३० मे रोजी सात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बढती मिळाली होती. त्यात सातवा क्रमांक गोखले यांचा होता. परंतु त्यांच्या अटकेमुळे महासंचालक कार्यालयाने गोखले यांचे नाव रद्द केले. जर त्यांना अटक झाली नसती तर ते सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झाले असते. त्यांची ही संधी हुकलीच.