केंद्रीय यंत्रणांचा तपास दिशाहीन

मुंबई : एकाचवेळी तीन केंद्रीय यंत्रणांनी विविध मुद्यांवर, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सखोल तपास करूनही अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूमागील गूढ उकलेले नाही.

सुशांतची हत्या करण्यात आली,  कोटय़वधी रुपयांना लुबाडण्यात आले, त्याला जाणीवपूर्वक अमली पदार्थाची सवय लावण्यात आली, या आरोपांआधारे सुरू झालेला केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), सक्तवसुली संचलनालय (ईडी) व अमली पदार्थविरोधी पथकाचा (एनसीबी) तपास वर्षभराच्या अवधीनंतही अस्पष्ट आणि दिशाहिन असल्याचे दिसते आहे.

गेल्यावर्षी १४ जूनला वांद्रे येथील निवासस्थानी सुशांत मृतावस्थेत (गळफास घेतलेल्या अवस्थेत) आढळला. सर्वप्रथम मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून घेत चौकशी, तपास सुरू केला. ही आत्महत्याच आहे, सुशांत मनोविकाराने (बायपोलर डिसॉर्डर) ग्रासला होता, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या चौकशीतून पुढे येत होती.

चाळीस दिवसांत मुंबई पोलिस सुशांतचे कुटुंबीय, त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती, घरी काम करणारे नोकर, मित्रपरिवार, चित्रपट-जाहिरातींच्या निमित्ताने त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे चौकशी करत होते. तर त्याचवेळी सुशांतचे वडील के . के.  राजपूत यांनी पाटण्याच्या राजीव नगर पोलीस ठाण्यात रिया आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात गंभीर आरोप करणारी तक्रार दाखल केली. या तक्रारीत चक्रवर्ती कु टुंबाने सुशांतची हत्या केली, त्याच्या बँक खात्यातील १५ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप होता. या तक्रारीआधारे पाटणा पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने तपास हाती घेतला. त्या पाठोपाठ ईडीने स्वतंत्र गुन्हा नोंदवून अपहाराच्या तर एनसीबीने अमली पदार्थाच्या दृष्टिकोनातून तपास सुरू केला. एनसीबीने रिया, तिच्या कुटुंबीयांसह अनेकांचे अटकसत्र सुरू केले.

याच दरम्यान एम्सच्या तज्ज्ञ पथकाने सुशांतची हत्या झाल्याचा अंदाज फेटाळून लावला. ही आत्महत्याच असल्याचे या पथकाने सीबीआयला कळविले. या अहवालानंतरही केंद्रीय यंत्रणांनी तपास सुरूच ठेवला. मात्र हत्या, आरोपी, हेतू, अंमलीपदार्थाची जाणीवपूर्वक सवय हे तर्क स्पष्ट करणारे पुरावे यंत्रणा गोळा करू शकल्या नाहीत.

पुन्हा राजकीय आरोपांच्या फैरी  

मुंबई : हिंदी चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या कथित आत्महत्या प्रकरणावरून पुन्हा राजकीय आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत फायदा मिळविण्यासाठी भाजपने सुशांतसिंहच्या मृत्यू प्रकरणाचा वापर करून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न के ल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक आणि प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी के ली.

सुशांतच्या आत्महत्येच्या नावावर भाजपला बिहार निवडणूक लढवायची होती म्हणून सीबीआयला पुढे करून महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचण्यात आले होते, असा आरोप मलिक यांनी के ला. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत असताना हे प्रकरण केंद्रीय गुप्तचर विभागाकडे (सीबीआयकडे) सोपविण्यात आले. त्यातून आतापर्यंत काय निष्पन्न झाले, असा सवाल त्यांनी के ला.

सीबीआय सत्य का लपवत आहे?

सुशांतच्या बाबतीत सीबीआय कोणत्याच निष्कर्षांपर्यंत आलेले नाही. त्याच्या मृत्यूबाबत अंतिम निष्कर्ष सीबीआय केव्हा सांगेल, सीबीआयने सत्य लपवून का ठेवले आहे, असे प्रश्न सचिन सावंत यांनी विचारले. सुशांतने आत्महत्याच केल्याचे मुंबई पोलिसांनी त्यांच्या तपासातून स्पष्ट केले होते. सर्वोच्च न्यायालयानेही मुंबई पोलिसांचा तपास योग्यच होता असे म्हटले होते. तरीही भाजपने आत्महत्येला राजकीय रंग देत त्याचा बिहार विधानसभा निवडणुकीत मुद्दा बनवला होता, असा आरोप सावंत यांनी के ला.