मुंबई विद्यापीठाकडून मात्र अद्याप परवानगी नाही

मुंबई : सोमय्या महाविद्यालयातील ४० स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमाच्या तुकडय़ा बंद करून ‘सोमय्या विद्याविहार’ या खासगी विद्यापीठात अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. परंतु, अभ्यासक्रम बंद करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे महाविद्यालयातील अभ्यासक्रमांवरून विद्यार्थी संभ्रमात आहेत.

पात्र शिक्षण संस्थांना स्वायत्तता देऊन त्यांचे रूपांतर खासगी विद्यापीठांमध्ये करण्याच्या शासनाच्या धोरणांतर्गत ‘सोमय्या विद्याविहार विद्यापीठ’ सुरू करण्यात आले. त्यानुसार सोमय्या एज्युकेशन ट्रस्टअंतर्गत येणारी सर्व महाविद्यालये आता खासगी विद्यापीठाचा भाग असतील. सद्य:स्थितीत या महाविद्यालयांमध्ये सुरू असणारे स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रम खासगी विद्यापीठांतर्गत सुरू करण्याचा निर्णय संस्थेने घेतला. त्यानुसार मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील ४० तुकडय़ा बंद करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. वाणिज्य शाखेच्या १८०० जागा, कला शाखेतील ११ विषयांच्या तुकडय़ा बंद होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत.

मुंबई विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील अभ्यासक्रम बंद करण्यासाठी संस्थेने विद्यापीठाकडे अर्ज दिला आहे. मात्र, अद्याप विद्यापीठाकडून अभ्यासक्रम बंद करण्यास परवानगी मिळालेली नाही. तरीही संलग्न महाविद्यालयांचे अभ्यासक्रम बंद करण्यात येत आहेत. खासगी विद्यापीठात अभ्यासक्रम सुरू होणार असले तरी तेथील शुल्क संलग्न महाविद्यालयांपेक्षा पाचपट असून विद्यार्थ्यांवर महागडे अभ्यासक्रम लादले जात असल्याचा आरोप करून महाविद्यालयावर कारवाई करण्याची मागणी मनविसेचे उपाध्यक्ष संतोष गांगुर्डे यांनी केली आहे.

प्रक्रिया काय?

महाविद्यालयांमधील अभ्यासक्रम बंद करण्यासाठी विद्यापीठाकडे अर्ज आल्यानंतर स्थानिक पाहणी समिती नेमण्यात येते. या समितीच्या अहवालानुसार विद्यापीठ पुढील निर्णय घेते. सोमय्या महाविद्यालयांबाबत अर्ज आला आहे. मात्र, अद्याप पुढील प्रक्रिया करण्यात आलेली नाही, असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले

सोमय्या विद्याविहार विद्यापीठात मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या तीन महाविद्यालयांतील अभ्यासक्रम नसतील. खासगी विद्यापीठ कायद्यानुसार सोमय्या विद्याविहार विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठाअंतर्गत व्यवस्थापन, अभियांत्रिकी, कला, वाणिज्य, संगणकशास्त्र असे स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रम आहेत. संलग्न महाविद्यालयातील व्यवस्थापन, अभियांत्रिकी, कला, वाणिज्य या शाखांतील स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रम बंद करण्यासाठी आम्ही मुंबई विद्यापीठाकडे अर्ज केला आहे. विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.

– प्रा. व्ही. एन. राजशेखरन पिल्लई, सोमय्या विद्याविहार विद्यापीठ