बारा दिवसांत १०७४ कोटींची करवसुली

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे अनेकांची झोप उडाली असली तरी याच नोटा राज्यातील नगरपालिका आणि महापालिकांसाठी वरदान ठरल्या आहेत. एरवी विविध प्रकारच्या कारवाईचा दट्टय़ा लावूनही कर भरण्यास टाळाटाळ करणारे नागरिक आता स्वत:हून कर भरण्यास पुढे येत आहेत. परिणामी गेल्या बारा दिवसांत राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांची विविध कर व थकबाकीपोटी विक्रमी एक हजार ७४ कोटी २१ लाख रुपयांची कर वसुली  झाली आहे. यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेला सर्वाधिक ३२२ कोटींचा तर पुणे महानगरपालिकेला १२० कोटी रूपयांचा महसूल मिळाल्याची माहिती नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर यांनी सोमवारी दिली.

राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांच्या विविध करांचा भरणा व थकबाकी भरण्यासाठी जनतेची अडचण होऊ नये यासाठी केंद्र शासनाने चलनातून रद्द करण्यात आलेल्या नोटा नागरिकांकडून स्वीकारण्यास महापालिका, नगरपालिकांना परवानगी दिली आहे. नागरिकांना कर भरणे सुलभ व्हावे यासाठी राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांची कार्यालये शासकीय सुट्टीच्या दिवशीही सकाळी आठ पासून ते मध्यरात्रीपर्यंत सुरु ठेवण्यात आली. या सवलतीचा फायदा घेत लोकांनीही मोठय़ा प्रमाणात करभरणा केल्याने महापालिकांसाठी हा निर्णय फायदेशीर ठरला आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी जुन्या चलनातील नोटा २४ नोव्हेंबपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.

महानगरपालिकानिहाय जमा झालेली रक्कम

  • बृहन्मुंबई महानगरपालिका ३२२ कोटी ६ लाख
  • नवी मुंबई महानगरपालिका ४२ कोटी ५ लाख
  • कल्याण-डोिबवली ५२ कोटी ४ लाख
  • मीरा-भाईंदर ४१ कोटी ३४ लाख
  • वसई- विरार १७ कोटी ४५ लाख
  • उल्हासनगर ३० कोटी ८९ लाख
  • पुणे ११९ कोटी ६९ लाख
  • पपरी-चिंचवड ३४ कोटी ९४ लाख
  • ठाणे ३८ कोटी
  • नाशिक १९ कोटी १६ लाख
  • औरंगाबाद ५९ कोटी ६६ लाख
  • नागपूर २० कोटी ४ लाख
  • राज्यातील सर्व नगरपालिका १३६ कोटी ८४ लाख