News Flash

रेल्वे प्रवास आणखी काही दिवस खडतर

पावसामुळे मध्य रेल्वेच्या ३५ लोकलमध्ये तांत्रिक बिघाड

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पावसामुळे मध्य रेल्वेच्या ३५ लोकलमध्ये तांत्रिक बिघाड

मुसळधार पावसामुळे मंगळवारी मध्य रेल्वे पाण्याखाली गेल्यानंतर त्याचा मोठा फटका रेल्वेला आणि प्रवाशांना बसला. मध्य रेल्वेवरील लोकल सेवा पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन जरी करत असले तरी ही सेवा पुन्हा नियमितपणे रुळावर येण्यास दोन दिवसांचा अवधी लागणार आहे. रेल्वे रुळावर साचलेल्या पाण्यामुळे मध्य रेल्वेवरील ३५ लोकलच्या एक्सल मोटरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि परिणामी गुरुवारी रविवारच्या वेळापत्रकानुसार गाडय़ा चालविण्यात आल्या. बिघाड झालेल्या लोकल दुरुस्त करून त्या पुन्हा सेवेत दोन दिवसांत दाखल केल्या जातील आणि मध्य रेल्वेचा मुख्य मार्ग व हार्बर पूर्ववत होईल असे मध्य रेल्वेकडून गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करण्यात आले. यामुळे प्रवाशांना मात्र लोकल दिरंगाईचा मनस्ताप सहन करावा लागेल.

मंगळवारी पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबईची पार दैना उडवली. रस्ते तुडुंब भरले आणि रेल्वे रूळही पाण्याखाली गेले. हे पाणी ओसरायला तब्बल २४ तास लागले. बुधवारी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मध्य रेल्वेवर साचलेले पाणी ओसरले आणि लोकल सेवा पूर्वपदावर येईल असे वाटत असतानाच सेवा कोलमडलेलीच होती. गुरुवारीही लोकल बऱ्याच उशिराने धावत होत्या. त्यामागील नेमके कारण प्रवाशांना समजत नव्हते.मंगळवारच्या पावसामुळे कुर्ला, सायन, माटुंगा आणि परेल स्थानकातील रेल्वे रुळ पाण्याखाली गेले होते. सुमारे १२ ते १५ इंचापर्यंत पाणी या ठिकाणी साचले होते. त्यातून रेल्वे चालविणे मध्य रेल्वे प्रशासनाला शक्य नव्हते. लोकल पाण्यात तासन्तास उभ्या राहिल्यामुळे मध्य रेल्वेच्या ताफ्यातील तब्बल ३५ लोकलच्या एक्सल मोटरमध्ये पाणी शिरले. त्यामुळे या लोकलमधे बिघाड झाला. या लोकल नादुरुस्त झाल्याने रेल्वेसमोर आणखी एक मोठे संकट उभे राहिले. आता ३५ लोकल दुरुस्त करून त्या दोन दिवसांत सेवेत दाखल करण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न आहे.

मरेच्या ताफ्यात एकूण १४५ लोकल असून त्यापैकी १२२ लोकल चालवल्या जातात. या लोकलच्या सुमारे १६०० फेऱ्या होतात. परंतु पावसामुळे सध्या १०० लोकलच्या मदतीने फेऱ्या चालवल्या जात आहेत. नादुरुस्त लोकलमध्ये सिमेन्सच्या लोकलची संख्या जास्त आहे. शनिवापर्यंत या सर्व लोकल दुरुस्त करुन त्या सेवेत आणण्याचा प्रयत्न असल्याचे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक गोयल यांनी सांगितले.

लोकलमधील उद्घोषणेचा बोजवारा

लोकलमध्ये प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत मोटरमन-गार्डकडून माहिती देण्याची प्रणाली अस्तित्वात आहे. ही प्रणाली अस्तित्वात असतानादेखील त्याचा मंगळवारच्या पावसात वापर करण्यात आला नाही याबाबत विचारले असता, लवकरच तशी सोय केली जाईल असे गोयल यांनी सांगितले. पावसात अनेक लोकल दोन स्थानकादरम्यान अडकल्या असता प्रवाशांना लोकल सुरू राहणार की बंद ठेवणार याची माहिती उपलब्ध होत नव्हती.त्यामुळे अनेकजण लोकलमधेच तासन्तास बसून राहिले व बऱ्याच वेळानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाने त्यांची सुटका केली.

टिटवाळा-आसनगावसाठी आणखी दोन दिवस

नागपूर-मुंबई दुरान्तो एक्सप्रेस मंगळवारी रुळावरूंन घसरल्याची घटना आसनगाव स्थानकाजवळ घडली. यामुळे रेल्वे रूळ आणि ओवरव्हेड वायरचे मोठे नुकसान झाले. रुळांवर मोठय़ा प्रमाणात चिखल आल्याचे पाहून गाडीच्या लोको पायलटने एमजर्न्‍सी ब्रेक लावला व त्यामुळे मोठा अपघात टळल्याचेदेखील ते म्हणाले. बुधवारी रात्री १० वाजून १०मिनिटांनी डाऊन मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र अप मार्गावर सतत चिखल येत असून या मार्गावरील वाहतुक सुरू करण्यासाठी दोन दिवसांचा तरी कालावधी लागणार असल्याचे गोयल यांनी सांगितले.

पश्चिम रेल्वेच्या सात लोकलमधे बिघाड

मंगळवारच्या पावसात मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवाही पूर्णपणे ठप्प झाली होती. रुळावर साचलेल्या पाण्यामुळे पश्चिम रेल्वेवरील सात लोकलच्या एक्सेल मोटारमधे पाणी शिरले आणि लोकलमध्ये बिघाड झाला. त्या दुरुस्त करून पुन्हा सेवेत लवकरच आणल्या जातील अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.  पश्चिम रेल्वे मार्गवर  ९२ लोकल धावतात. सात लोकल नादुरुस्त झाल्याने सध्या ८५ लोकल धावत आहेत.त्याचबरोबर मंगलवारच्या घटनेत आपल्या ताफ्यातील लोकलमधे उदघोषना व्यवस्थित होत होत्या असा दावाही यावेळी करण्यात आला.

ठाण्यात आणखी दोन मृतदेह सापडले

ठाणे शहरात मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमध्ये नाल्यातून वाहून गेलेल्या तीन व्यक्तींचे मृतदेह आढळले असतानाच गुरुवारी कळवा व विटावा खाडीत आणखी दोन मृतदेह सापडले आहेत. हे दोन्ही मृतदेह मंगळवारी सायंकाळी कोरम परिसरातून बेपत्ता झालेल्या दीपाली विशाल बनसोडे (२९) आणि याच भागातील नाल्यातून वाहून गेलेल्या गौरी अशोक जैस्वाल (१४) या दोघींचे आहेत. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा आता पाचवर पोहचला असून आणखी एका बेपत्ता तरुणाचा शोध सुरू आहे. रामनगरमधील नाल्यातून वाहून गेलेला अजय आठवाल हा अजूनही बेपत्ता आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 1:59 am

Web Title: technical failure in mumbai railway due to heavy rain
Next Stories
1 गणेशोत्सव आणि पावसामुळे निकाल जाहीर करण्यास विलंब
2 १२ हजारांहून अधिक इमारती १९४० पूर्वीच्या!
3 मुंबईतील मिठागरांच्या जमिनी खुल्या केल्यास गहजब
Just Now!
X