मुंबईतील सरासरी तापमानात अचानक ६ अंशांची वाढ

गुलाबी थंडीचा ऋतू कितीही हवाहवासा वाटला तरी हिवाळा ऋतू आता मुंबईकरांचा निरोप घेत आहे. बुधवारी मुंबईतील तापमान सरासरीपेक्षा तब्बल ६ अंश से.ने वाढले. थंडीने निरोप घेतल्याचे हवामानशास्त्र विभागाकडून अधिकृतरीत्या जाहीर करण्यात येत नसले तरी दर वर्षी साधारण फेब्रुवारीच्या मध्यावर थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो. सध्याही तशीच स्थिती असून यानंतर तापमान खाली उतरण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

नोव्हेंबरपासून तब्बल साडेतीन महिने मुंबईकरांनी सुखद गारवा अनुभवला. फेब्रुवारीतही गेल्या आठवडय़ात मुंबईसह राज्यातील तापमान खाली घसरले होते. मुंबईत ७ फेब्रुवारी रोजी किमान तापमान १४ अंश से.वर गेले होते. अर्थात या मोसमातील ते सर्वात नीचांकी तापमान नव्हते. जानेवारीमध्ये तर मुंबईत किमान तापमान ११.९ अंश से.पर्यंत गेले होते. त्या वेळी राज्यात अहमदनगरमध्ये किमान तापमान ४.९ अंश से.वर घसरले होते. कडाक्याच्या थंडीचे हे काही दिवस वगळता मात्र हा ऋतू दिलासा देणारा ठरला. मात्र हा गारव्याचा ऋतू आता निरोप घेत असून बुधवारी तापमानात झालेली वाढ त्याचीच निदर्शक आहे.

बुधवारी सांताक्रूझ येथे किमान तापमान तब्बल १९.३ अंश से. होते. हे तापमान सरासरीपेक्षा तब्बल ५.७ अंश से.अधिक होते. सध्याची स्थिती पाहता २३ तारखेपर्यंत तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे, असे मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर म्हणाले.

राज्यात सर्वात कमी तापमान पुणे येथे १४.८ अंश से. राहिले. पश्चिम किनारपट्टीवरील तापमानातील वाढ अधिक असली तरी सर्वच भागांमध्ये दिवसाच्या तापमानातही वाढ झाली आहे.