प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : बेघर, बेरोजगारांना जेवणाचा पुरवठा करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचा पालिकेला अचानक साक्षात्कार झाला असून, काही जाचक अटींमुळे या निविदा प्रक्रियेतून महिला बचत गट बाद होण्याची चिन्हे आहेत. सध्या  एक लाख २५ हजार २२३ जेवणाच्या पाकिटांचा पुरवठा करण्यात येत असताना सात परिमंडळांसाठी दोन लाख एक हजार ३७४ पाकिटांच्या पुरवठय़ासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत.

टाळेबंदी बेघर आणि बेरोजगार कामगारांवर उपासमारीची वेळ आली. अखेर पालिकेने दुपारी आणि रात्री जेवणाचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. तातडीने मोठी हॉटेल्स, खाद्यपदार्थाचा पुरवठा करणारे व्यावसायिक आणि काही महिला बचत गट यांच्या मदतीने पालिकेने जेवणाचा पुरवठा सुरू केला. दुपार आणि रात्र असे दोन्ही मिळून साधारण सात लाख पाकिटे जेवणाचा पुरवठा करण्यात येत होता. पुढे नगरसेवकांनीही आपापल्या प्रभागातील गरजूंसाठी जेवणाच्या पाकिटांची मागणी केली. प्रशासनाने त्याचीही पूर्तता केली. गेल्या तीन महिन्यांपासून अखंडपणे या जेवणाचा पुरवठा करण्यात येत आहे.

दरम्यानच्या काळात परप्रांतीय कामगार मुंबईबाहेर गेले. त्यामुळे हळूहळू जेवणाच्या पाकिटांची मागणी कमी होत गेली. आता दुपार आणि रात्र मिळून एक लाख २५ हजार २२३ जेवणाच्या पाकिटांचा पुरवठा करण्यात येत आहे.

आता प्रशासनाने जेवणाच्या पुरवठय़ासाठी निविदा मागविल्या आहेत. निविदा प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या निविदाकाराचा स्वत:चा मुदपाकखाना (किचन) असावा, गेल्या दोन आर्थिक वर्षांमधील त्याची वार्षिक उलाढाल ५० लाख रुपये असावी, करोनामुळे निर्माण परिस्थितीत प्रतिदिन पाच हजार जेवणाच्या पाकिटांचा पुरवठा करण्याचा अनुभव असावा, पुरवठा करण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा ‘एफएसएसएआय’च्या मानांकनानुसार असावा, प्रतिदिन किमान ५० हजार जेवणाच्या पाकिटांचा पुरवठा करण्याची क्षमता असावी आदी अटी निविदेमध्ये आहेत. या अटींमुळे सध्या जेवणाचा पुरवठा करणारे महिला बचत गट निविदा प्रक्रियेबाहेर फेकले जाणार आहेत. तर सध्या पुरवठा करणाऱ्या बडय़ा मंडळींना हे काम मिळण्याचीच चिन्हे आहेत.

‘परिमंडळ-५’साठी ६६ हजार पाकिटे

कुर्ला, गोवंडी, मानखुर्द, चेंबूर परिसराचा समावेश असलेल्या पालिकेच्या ‘परिमंडळ ५’मध्ये सर्वाधिक म्हणजे ६६ हजार ६६ पाकिटांच्या पुरवठय़ासाठी निविदा मागविली आहे. अन्य परिमंडळांसाठी १० हजार ते ३० हजार पाकिटांसाठी निविदा काढल्या आहेत.  खासदार – मंत्री, आमदार, नगरसेवक यांना दरदिवशी एका वेळी अनुक्रमे १५००, १०००, ५००, पाकिटे याप्रमाणे निविदा मागविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

जेवणाचा दर्जा आणि दर यात एकसूत्रीपणा यावा  या उद्देशाने निविदा काढण्यात आल्या आहेत. पालिकेच्या सात परिमंडळांसाठी निविदा काढण्यात आल्या असून एका निविदाकाराला एकाच परिमंडळातील काम देण्यात येईल.  

      – संजीव जयस्वाल, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका