09 March 2021

News Flash

ठाण्यात मुलींचा जन्मदर सर्वात कमी

प्रमाण दरहजार मुलांमागे ७७० इतके खालावले; केंद्राच्या अहवालातून बाब उघड

|| शैलजा तिवले

प्रमाण दरहजार मुलांमागे ७७० इतके खालावले; केंद्राच्या अहवालातून बाब उघड

गेल्या वर्षभरात राज्यातील मुलींचा जन्मदर अगदी नगण्य प्रमाणात वाढला असला तरी ठाण्यामध्ये, मात्र दर हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण अवघे ७७० वर आले आहे. एका वर्षांत हे प्रमाण दीडशेहून अधिक आकडय़ांनी खाली आल्यामुळे ठाण्यात मुलींच्या जन्मदराबाबत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडील अहवालामधून ही भीषण बाब उघड झाली आहे. ठाण्याखालोखाल अहमदनगर जिल्ह्य़ामध्येही मुलीच्या जन्मदराची घसरण कायम राहिली आहे.

केंद्र सरकारच्या अहवालानुसार राज्यातील मुलींच्या जन्मदरामध्ये वाढ झाली आहे. २०१६-१७ काळात  ९२२ इतके नोंदलेल्या मुलींच्या जन्मदराचे प्रमाण २०१७-२०१८ या काळामध्ये ९२६ असे झाले. यामध्ये ठाणे जिल्हा मात्र मुलींच्या जन्मदरामध्ये नीचांकावर आला आहे. सातत्याने खालावणाऱ्या मुलींच्या जन्मदराची दखल घेत ठाण्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी चार महिन्यांपूर्वी जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. ठाणे जिल्ह्य़ातील सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांची धडक मोहिमेअंतर्गत तपासणी करण्याचे तसेच यासाठी तालुकानिहाय व महापलिका क्षेत्रामध्ये चार सदस्यांची पथके तयार करण्याचेही सूचित केले होते. यानंतर मात्र यातील कोणत्याही आदेशांचे पालन झाले नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर सध्या राज्याबाहेर असून त्यांच्याशी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकलेला नाही. तसेच त्यांना पाठविलेल्या भ्रमणध्वनी संदेशालाही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी सोनावणे यांनी मुलींच्या घटत्या जन्मदराबाबत आपल्याला काही ठाऊक नसल्याचे सांगितले.

ठाणे शहरात स्त्रीभ्रूण हत्या किंवा अवैधरीत्या गर्भिलग चाचणीचे प्रकार मोठय़ा प्रमाणात घडतात, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यां इंदवी तुळपुळे यांनी केला. सोनोग्राफी केंद्रावर वचक ठेवणारी दक्षता समिती पालिकेकडून दहा वर्षांपूर्वी नेमण्यात आली होती. मात्र काही बैठकांनंतर ही समिती बासनात गुंडाळून ठेवण्यात आली. त्यामुळे या केंद्रावर देखरेख करणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही. तसेच अशा गैरप्रकारांमध्ये दोषी आढळलेल्यावरही कारवाई झाल्याचेही दिसून आलेले नाही, असे त्या म्हणाल्या. ठाणे आदिवासी पाडय़ांमध्ये आत्तापर्यंत मुलीच्या जन्माचे स्वागतच केले जाते. मात्र सध्या ‘सुशिक्षित’ आदिवासी तरुण वर्गातून हुंडा मागण्याची प्रथा सुरू होत असल्याने शहरामध्ये आलेले स्त्रीभ्रूण हत्येचे लोण आदिवासी गावांमध्येही पसरण्याची भीती तुळपुळे यांनी व्यक्त केले.

धुळ्यामध्ये टक्का वाढला

उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्य़ामध्ये मुलींच्या जन्मदाराचे प्रमाण नोंद घेण्याइतपत वाढले आहे. २०१५-१६, २०१६-१७ मुलींचा जन्मदर अनुक्रमे ८७३, ९१० नोंदविलेल्या धुळे जिल्ह्य़ामध्ये मुलींचा टक्का वाढला असून यावर्षी हे प्रमाण ९६२ वर गेले आहे. नाशिक आणि जळगावमध्ये मुलींचा जन्मदर नगण्य प्रमाणात वाढला असला तरी नंदुबारमध्ये मात्र यंदा घसरण झाली आहे.

सांगली, कोल्हापूरमध्ये संख्या वाढली

पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली आणि कोल्हापूरमध्येही मुलींची संख्या वाढली आहे. सांगलीमध्ये २०१६-१७ साली ८९६ नोंदविलेला मुलींचा जन्मदर या वर्षी ९०५ वर पोहोचला आहे, तर कोल्हापूरमध्ये २०१६-१७ साली ८८४ मुलींचा जन्मदर नोंदविला असून या वर्षी ९३२ असा नोंदविला गेला आहे.

मराठवाडय़ामध्ये प्रमाणात वाढ

मराठवाडय़ामध्ये अहमदनगर वगळता मुलींचे प्रमाण वाढले असून औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्य़ांमध्ये गतवर्षीपेक्षा मुलींच्या जन्मदरामध्ये वाढ झाली आहे. परभणीमध्ये मात्र मुलींच्या जन्मदराचे प्रमाण घसरले आहे.

अमरावतीमध्ये प्रमाण घटले

विदर्भामध्ये वाशिम, बुलढाणा, वर्धा या जिल्ह्य़ांमध्ये मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढले असले तरी अमरावतीमध्ये मात्र ९६७ वरून ९१०वर आले आहे. नागपूर, गोंदिया भागामध्येही मुलींचे प्रमाण घटले आहे.

पुण्याची प्रगती

मुलींची घट झाल्याने चर्चेत असलेल्या पुण्यामध्ये मात्र यंदा मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढले. गतवर्षी पुण्यात मुलींचा जन्मदर ८९९ नोंदला असून या वर्षी ९१४ पर्यंत वर गेला आहे.

रत्नागिरीत घट

कोकणपट्टय़ामध्ये अन्य जिल्ह्य़ांमध्ये मुलींच्या जन्मदरामध्ये वाढ झाली असली तरी रत्नागिरीमध्ये मात्र मुलींच्या प्रमाणात घट झाली आहे. रत्नागिरीमध्ये गेल्या वर्षी मुलींचा जन्मदराचे प्रमाण ९४० नोंदले. या वर्षी यामध्ये ९२२ पर्यंत घट झाली आहे. मुंबईमध्ये मुलींच्या जन्मदरात प्रमाण नगण्य वाढ झाली.

भीषण परिस्थिती..

ठाणे जिल्ह्य़ामध्ये गेल्या काही वर्षांपासून मुलींचा जन्मदर सातत्याने घसरत असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या गेल्या काही वर्षांच्या अहवालानुसार ठाण्यामध्ये २०१४-१५, २०१५-१६, २०१६-१७ या वर्षांमध्ये मुलींच्या जन्मदराचे प्रमाण अनुक्रमे ९३३, ९४३, ९३० असे घसरत आले. या वर्षी मात्र हे प्रमाण थेट ७७० पर्यंत खाली आले आहे.

चंद्रपूरमध्ये सर्वाधिक मुली

आदिवासी जिल्हा म्हणून गणना केल्या जाणाऱ्या चंद्रपूरमध्ये सर्वात जास्त म्हणजे १,१७६ अशी मुलींच्या जन्मदराची नोंद झाली आहे. एक हजाराचा आकडा पार केलेले राज्यातील चंद्रपूर हा एकमेव जिल्हा आहे.

अहमदनगरमध्ये घसरण कायम

ठाण्यानंतर सर्वात कमी जन्मदाराचे प्रमाण अहमदनगरमध्ये नोंदले गेले. या जिल्ह्य़ामध्ये २०१५-१६, २०१६-१७ या वर्षांमध्ये दर हजार मुलांमागे मुलींच्या जन्मदराचे प्रमाण अनुक्रमे ९०६, ८९५ असून ही घसरण या वर्षीही कायम राहिली आहे. २०१७-१८ या वर्षांमध्ये मुलींचा जन्मदर तब्बल ८८४ वर आल्याचे या अहवालामधून स्पष्ट झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 1:29 am

Web Title: thane has the lowest female birth rate
Next Stories
1 मध्य रेल्वे, हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक
2 महामार्ग आणि द्रुतगती मार्गाची संथगती..
3 परवडणाऱ्या घरांची गिरण्यांच्या जमिनींसारखी ‘परवड’ होणार
Just Now!
X