हरिश्ंचद्र यादव (४५) हा चालक अंधेरीजवळील सहार गावात राहत होता. त्याच्याकडे इनोव्हा गाडी होती. ती चालवून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. ६ एप्रिल २०१६ रोजी त्याच्या मालकाने एका मालाची डिलिव्हरी आणण्यासाठी वापीला जायला सांगितलं होतं. त्वरित त्याला निघावं लागलं होतं. त्यामुळे भावाला निरोप देऊन तो निघाला.
दुसऱ्या दिवशी म्हणजे ७ एप्रिलला हरिश्चंद्र घरी परतणं अपेक्षित होतं. परंतु तो आला नाही. त्याचा फोन बंद होता. वापीला जिथे बोलावलं होतं तिथे चौकशी केल्यावर समजलं की हरिश्चंद्र वापीला पोहोचलाच नाही. भावाने त्वरित सहार पोलीस ठाणे गाठलं आणि हरिश्चंद्र बेपत्ता असल्याची तक्रार दिली. तसेच बेपत्ता हरिश्चंद्रचे छायाचित्र आणि माहिती असलेली भित्तिपत्रके ठिकठिकाणी चिटकवली. ९ एप्रिल रोजी दीनानाथ घोडबंदर येथील सरकारी रुग्णालयाच्या आवारात भित्तिपत्रक लावत होता. त्या वेळी रुग्णालयातील शिपायाने हरिश्चंद्रचे छायाचित्र ओळखले. महामार्गावरील भिवंडी रोडच्या कॉमन ब्रिजच्या खाली हरिश्चंद्राचा मृतदेह सापडला होता. वसईच्या वालीव पोलिसांनी केवळ अपमृत्यू अशी नोंद करून मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी पाठवला. हरिश्चंद्र बेपत्ता असल्याची तक्रार सहार पोलीस ठाण्यात दाखल होती म्हणून वालीव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास तिथे वर्ग करण्यात आला.
सहार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव मुखेडकर यांनी पोलीस उपनिरीक्षक गुरव व महांगरे यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपवली. तपासकर्त्यांना ६ एप्रिलला सहार येथील पेट्रोलपंपावर हरिश्चंद्र पेट्रोल भरत असतानाचे सीसीटीव्ही फुटेज सापडले. ज्या ठिकाणी मृतदेह सापडला होता त्या जागेची पाहणी केली. पण काहीच सापडले नाही. याच दरम्यान पोलिसांना एक आशेचा दुवा दिसला. काही दिवसांनी हरिश्चंद्राचा मोबाइल पंधरा मिनिटांसाठी सुरू झाल्याचे समजले. हा फोन लगेच बंद झाला. पोलिसांनी त्या फोनचा ‘आयएमईआय’ क्रमांक तज्ज्ञांच्या मदतीने शोधून काढला. आता ज्या फोनमध्ये हरिश्चंद्राचा सिमकार्ड टाकून चालू केला होता. तो फोन पोलिसांना कळू शकणार होता.
पोलिसांना जास्त वेळ वाट पाहावी लागली नाही. त्या फोनमध्ये नवीन सिमकार्ड टाकून सुरू करण्यात आला होता. हा फोन आता विकास यादवच्या नावावर होता. पोलिसांनी या विकास यादवच्या कॉल्सवर पाळत ठेवली. या क्रमांकावर एका व्यापाऱ्याचे सतत फोन येत असत. त्या व्यापाऱ्याकडून पोलिसांनी माहिती घेतली. विकास यादव चालक होता आणि मालाची ने-आण करीत असायचा. पोलिसांनी व्यापाऱ्याला विश्वासात घेतले आणि त्याच्या मदतीने विकासला ताब्यात घेतले. पोलिसांच्या सरबत्तीपुढे विकास उघडा पडला आणि त्याने हत्येची कबुली दिली. चार मित्रांसह मिळून त्याने हे कृत्य केले होते.
अशी झाली हत्या
६ एप्रिलला हरिश्ंचद्र यादव मालाची डिलिव्हरी घेण्यासाठी वापीला निघाला होता. महामार्गावर त्याला सुनील यादव (२०), अभिषेक यादव (२०), राजू यादव (२०) विकास यादव (२०) भेटले. हे सर्व तरुण ठाण्याच्या मानपाडा येथे राहणारे होते आणि व्यवसायाने सगळे चालक होते. त्यांनी हरिश्चंदला नालासोपाऱ्याला सोडण्याची विनंती केली. हरिश्चंद्राने आढेवेढे न घेता त्यांना गाडीत घेतले. या चौघांनी यथेच्छ मद्यपान केलेले होते. गाडी महामार्गावरून पुढे जात होती. मात्र, नालासोपारा फाटा येथे गाडीतून उतरून हे चौघेही टंगळमंगळ करत होते. हे पाहून हरिश्चंद्रने त्यांना रागाने गाडीत बसण्यास सांगितले. यावर शाब्दिक बाचाबाची झाली आणि हरिश्चंद्रने सुनीलच्या कानशिलात लगावली. तेच निमित्त झाले. सुनीलने रागाच्या भरात हरिश्चंद्रच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. हत्येनंतर त्याचा मृतदेह भिवंडी कामण रोडच्या कॉमन ब्रिजच्या खाली टाकून दिला.
एक चूक महागात पडली
हत्येनंतर आरोपींनी हरिश्चंद्रचा मोबाइलही फेकून दिला. परंतु, त्याआधी सुनीलने या मोबाइलमधील सिमकार्ड काढून घेतले. त्या वेळी हेच सिमकार्ड आपल्या अघोरी कृत्यावर प्रकाश टाकेल, याची त्याने कल्पनाही केली नसावी. काही दिवसांनी हे चौघे जण एका ढाब्यावर मद्यपान करायला बसले होते. त्या वेळी टेबलावर ठेवलेले त्यांचे मोबाइल फोन कुणी तरी पळवले. त्यांची पंचाईत झाली. विकासला घरी फोन करायचा होता. त्या वेळी सुनीलने आपल्या खिशातील सिमकार्ड काढून त्याला दिले. हे हरिश्चंद्रचे सिमकार्ड आहे, हे तो मद्यधुंद अवस्थेत पुरते विसरून गेला होता. तेच सिमकार्ड टाकून विकासने आपला दुसरा मोबाइल हॅण्डसेट सुरू केला. परंतु, फोन सुरू करताच त्यात हरिश्चंद्रसाठीचे एसएमएस येऊ लागले. ते पाहताच या चौघांची नशा उतरली आणि त्यांनी तातडीने तो मोबाइल बंद केला. परंतु, दरम्यानच्या १५ मिनिटांत सिमकार्डने आपले काम केले होते. ज्या मोबाइलमध्ये सिमकार्ड टाकले होते, त्या मोबाइलचा आयईएमआय क्रमांक पोलिसांनी मिळवला आणि त्या आधारे विकासला ताब्यात घेतले. त्यानंतर दिल्लीत पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या अभिषेक व राजू यादव यांनाही अटक करण्यात आली. परंतु, मुख्य आरोपी सुनील यादव पलायन करण्यात यशस्वी झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.