मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामांना जून महिन्यापासून सुरुवात

बहुचर्चित आणि देशातील पहिल्या अशा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रत्यक्ष कामांना येत्या जून २०१८ पासून सुरुवात केली जाणार आहे. बुलेट ट्रेनची सेवा १५ ऑगस्ट २०२२ साली सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार या प्रकल्पाच्या कामाला जूनचा मुहूर्त निवडण्यात आला आहे. यात ठाणे ते विरापर्यंत असणाऱ्या खाडीनजीक २१ किलोमीटर लांबीचा सर्वात मोठा भुयारी मार्ग होईल, अशी माहिती राष्ट्रीय हाय स्पीड रेल निगम लिमिटेडचे जनसंपर्क अधिकारी अधिकारी धनंजय कुमार यांनी मुंबईत दिली. या मार्गासाठी आवश्यक १५ दिवसांच्या विविध चाचण्या डिसेंबर २०१७ मध्येच पूर्ण करण्यात आलेल्या असून त्यात भूकंपप्रतिरोधक चाचणीचाही समावेश आहे. त्याचा अहवाल बुलेट ट्रेनवर काम करणाऱ्या जपानच्या कंपनीला पाठविण्यात आल्याचे ते म्हणाले. प्रकल्पासाठी एक लाख आठ हजार कोटी रुपये अपेक्षित आहे.

बुलेट ट्रेनसाठी जी निविदा काढण्यात येईल त्यामध्ये २० टक्के जपानसाठी आणि उर्वरित ८० टक्के देशातील किंवा परदेशातील कोणत्याही कंपन्या सहभागी होऊ शकतील. ठाणे जिल्ह्य़ातील ज्या जमीन आवश्यक  आहेत. त्यांच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आल्याचे धनंजय कुमार यांनी सांगितले.

मुंबई ते अहमदाबाद रेल्वेचा बहुतांश मार्ग उन्नत असला तरी ठाणे खाडी ते विरारदरम्यान ही गाडी सागरी बोगद्यातूनच जाणार आहे. बुलेट ट्रेनच्या मार्गात एकूण आठ भुयारी मार्ग असतील आणि यात ठाणे खाडीतून जाणारा भुयारी मार्ग सर्वात मोठा असणार आहे. या मार्गात एकूण असणाऱ्या ४७ रोड ओव्हर ब्रिजपैकी २७ ब्रिज हे राज्यात असणार आहेत. ही गाडी २०२२ साली प्रत्यक्षात सेवेत आणली जाईल.

बुलेट ट्रेनचा वेग ताशी साडे तीनशे किलोमीटर असला तरी प्रत्यक्षात ३२० किलोमीटर इतक्या वेगाने ती धावेल. त्यामुळे मुंबई ते अहमदाबाद ५०८ किलोमीटरचे अंतर दोन ते अडीच तासांत कापले जाईल, असा दावाही त्यांनी केला. सध्या दुरोंतो एक्स्प्रेस हेच अंतर सात तासांत कापते.

मुंबई, ठाणे, बोईसर, बडोदा, अहमदाबाद अशा काही ठिकाणी प्रत्यक्षात बुलेट ट्रेनच्या कामांना सुरुवात होईल. मोजमाप, तांत्रिक कामांबरोबरच अन्य कामे होतील.

२० हजार कोटींचे भांडवल

बुलेटच्या दहा डब्यातून एकाच वेळी ७५० प्रवासी प्रवास करू शकतील. मॅग्नेट महाराष्ट्रमध्ये बुलेट ट्रेनचे इ-५ प्रकारातील डबे दाखविण्यात येणार आहेत. राज्य सरकारचे या प्रकल्पासाठी २० हजार कोटी रुपयांचे भागभांडवल असेल. तर जपान सरकारकडून ०.१ टक्के व्याज दराने ८८ हजार कोटी रुपयांचे दीर्घकालीन कर्ज उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.

बुलेट ट्रेनची वैशिष्टय़े

  • ५०८ किमीपैकी १२० किमीचा मार्ग राज्यातून
  • १२ स्थानकांपैकी चार स्थानके राज्यातील आहेत. यामध्ये वांद्रे-कुर्ला, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सूरत, भरुच, बडोदा, आणंद, अहमदाबाद, साबरमती स्थानके आहेत.
  • बुलटे ट्रेनचा प्रवास वेगवाग असल्याने मुंबई-अहमदाबाद रस्तेमार्गे जाणारे वाहनधारकही त्याकडे वळतील.
  • मुंबई ते अहमदाबाद विमान सेवेपेक्षा बुलेट ट्रेनचे भाडे कमी ठेवण्याचा प्रयत्न असेल.
  • बुलेट ट्रेनची सुरुवात बीकेसीमधून होणार आहे. येथूनच मेट्रो-२ ही धावणार असल्याने या दोघांची कनेक्टिव्हिटी देता येते का याची चर्चा सुरू आहे.

२९ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता

२०२२ साली सेवेत येणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी २९ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यापैकी २५ हजार कर्मचारी हंगामी तत्त्वावर आणि चार हजार कायमस्वरूपी कर्मचारी असतील. बडोदा येथील रेल्वे विद्यापीठात त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.