* मोनासिंगचे स्पष्टीकरण  * प्रसिद्ध करणाऱ्या विरोधात पोलिसांकडे तक्रार
हिंदी चित्रपटसृष्टी आणि मालिकांमधील कलाकारांसाठी शुक्रवारचा दिवस अत्यंत हादरा देणारा ठरला. आतापर्यंत मोठय़ा पडद्यावरील कलाकारांपुरते मर्यादित असलेले ‘एमएमएस’ प्रकरण छोटय़ा पडद्याकडे सरकल्याचे प्रत्यंतर शुक्रवारी आले. ‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेतून पुढे आलेल्या मोना सिंगचा एक अश्लील एमएमएस शुक्रवारी दुपारी विविध सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांवर प्रसिद्ध झाला आणि एकच खळबळ उडाली. हा ‘एमएमएस’ आपला नसून दुसऱ्याच मुलीच्या शरीरावर आपला चेहरा चिकटवला आहे, असा दावा मोनाने केला असून याबाबत तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
संबंधित ‘एमएमएस’मध्ये मोना सिंग एका घरात आक्षेपार्ह अवस्थेत फिरताना दाखवण्यात आली आहे. मात्र ती मुलगी म्हणजे आपण नाही, असे मोनाचे म्हणणे आहे. इंटरनेटवर पडीक असलेल्या काही महाभागांनी आपला चेहरा दुसऱ्याच मुलीच्या शरीरावर चिकटवला आहे, असे मोनाने सांगितले. या प्रकरणी पोलीस तपास करत असून ते लवकरच या नराधमाला शोधतील, असा विश्वास तिने व्यक्त केला.
अभिनेत्री किंवा कलाकार असण्याआधी आम्ही जबाबदार महिला म्हणून समाजात वावरतो. असे कृत्य आमच्या हातून होणार नाही. आम्हालाही आमच्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवाराला तोंड द्यावे लागते, असे स्पष्ट करत मोनाने आपली नाराजी व्यक्त केली. हा एमएमएस ज्या आयपी अ‍ॅड्रेसवरून इंटरनेटवर टाकण्यात आला, त्याचा शोध पोलीस घेत आहेत. एमएमएस तयार करणारी आणि इंटरनेटवर टाकणारी व्यक्ती मोनाच्या जवळची असावी, असा संशयही पोलिसांनी व्यक्त केला.
आम्ही नाही ‘त्यातले’!
प्रसिद्ध अभिनेते व अभिनेत्री यांच्या एमएमएस क्लिप्स उघड होण्याचा आणि ‘हा एमएमएस आमचा नाही’ असे त्यांनी सांगण्याचा प्रकार काही पहिल्यांदाच घडलेला नाही. याआधी अश्मित पटेल आणि रिया सेन या दोघांचा प्रणय थेट इंटरनेटवर एमएमएस क्लिपच्या माध्यमातून समोर आला होता. शाहीद आणि करिना यांचे प्रेमसंबंध जोरात असताना एका प्रसिद्ध ठिकाणी त्यांनी घेतलेल्या चुंबनदृश्याची चित्रफीतही गाजली होती. हॉट सीन्ससाठी प्रसिद्ध असलेल्या मल्लिका शेरावतचाही एक अश्लील एमएमएस जगभरात पोहोचला होता. काही लोकांसमोर कतरिना कैफ ‘स्ट्रिपिंग’ करत असल्याच्या व्हिडिओनेही खळबळ उडवून दिली होती. या एमएमएस प्रकरणातून प्रिटी झिंटाही सुटलेली नाही. प्रिटी आंघोळ करताना एका महाभागाने त्याचा एमएमएस तयार केला होता. मात्र या सगळ्याच प्रकरणात असलेल्या प्रथितयश कलाकारांनी, ‘आम्ही नाही त्यातले’, असाच पवित्रा घेतला होता.