पटसंख्येअभावी निर्णय; अन्य माध्यमाच्याही ९ शाळांचे विलीनीकरण

गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पटसंख्येची घसरगुंडी सुरू असल्यामुळे मुंबई महापालिकेला मराठी, गुजराती, उर्दू, तेलुगु, तामिळ माध्यमाच्या १८ शाळा बंद करण्याची वेळ पालिकेवर ओढवली असून त्या अन्य शाळांमध्ये विलीन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. बंद करण्यात येणाऱ्या १८ पैकी नऊ शाळा मराठी माध्यमाच्या आहेत. मराठीच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला मराठी माध्यमाच्या शाळा वाचविणे अशक्य बनल्याची टीका विरोधकांकडून होऊ लागली आहे.

गोरगरीब कुटुंबातील प्रत्येक मुलाला शिक्षण घेता यावे यासाठी पालिकेने मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू, तेलुगू, तामिळ माध्यमाच्या प्राथमिक शाळा सुरू केल्या. पालिकेने सुरू केलेल्या शाळांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. काही वर्षांपूर्वी पालिका शाळांतील पटसंख्या लक्षणीय होती. मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वाढलेली संख्या आणि शिक्षणाचा दर्जा घसरल्याने पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होऊ लागली. गेल्या १० ते १५ वर्षांमध्ये पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमालीची कमी झाली आहे. पटसंख्येला लागलेली गळती रोखण्यासाठी शिवसेनेच्या आग्रहाखातर पालिका प्रशासनाने विद्यार्थ्यांना २७ शालोपयोगी वस्तू देण्याची योजना सुरू केली. मात्र या वस्तू वेळेवर मिळत नसल्यामुळे आणि त्यांचा दर्जा योग्य नसल्यामुळे या योजनेने पटसंख्येला बळ मिळू शकले नाही.

पटसंख्या घसरल्यामुळे पालिका प्रशासनाने मुंबईतील ठिकठिकाणच्या १८ शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्यात मराठी माध्यमाच्या नऊ, गुजराती माध्यमाच्या दोन, उर्दू माध्यमाच्या चार, तेलुगू माध्यमाच्या दोन, तर तामिळ माध्यमाच्या एका शाळेचा समावेश आहे.

या शाळा बंद

महात्मा गांधी मराठी शाळा, उन्नत नगर मराठी क्रमांक २ शाळा, मुद्रण कामगार मराठी शाळा, डी. एन. नगर मराठी शाळा क्रमांक २, वांद्रे पेटीट मराठी शाळा, ओशिवरा मराठी शाळा क्रमांक ३, ओशिवरा मराठी शाळा क्रमांक १, एस. आर. पी. कॅम्प मराठी उ. प्रा. शाळा, स्वामी कृष्णानंद शेरवाला उ. प्रा. मराठी शाळा.