मुंबईकरांना येत्या काळात पार्किंगसाठी ५ पट जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण दक्षिण मुंबईतील फोर्ट, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, लोअर परेल आणि गोरेगाव या भागात नवे पार्किंगचे दर लागू होण्याची शक्यता आहे. यासाठी मुंबई महापालिकेकडून नव्या धोरणावर विचार सुरु आहे.

महापालिका आयुक्त अजोय मेहता म्हणाले, दररोज मुंबईकरांची शेकडो खासगी वाहने रस्त्यावर येत असल्याने आणि पार्किंगमुळे वाहतुक कोंडीमध्ये भर पडत असते. हे टाळण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करावा यासाठी पार्किंगची फी वाढवण्याचा विचार सुरु आहे. बिझनेस हब्समध्ये रहदारीच्या काळात पार्किंगच्या फीमध्ये वाढ करणे, प्रत्येक खासगी वाहनावर कंजेशन टॅक्स लावणे, ठरवून दिलेल्या पार्किंगच्या जागेबाहेर वाहने लावणाऱ्यांवर मोठा कर आकारण्याचा विचारही सुरु आहे.

वाहतुक तज्ज्ञांच्या मते, पार्किंगचे दर वाढवणे हा रहदारी कमी करण्यावरचा चांगला उपाय आहे. यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्याला प्रोत्साहन मिळेल त्याचबरोबर प्रदूषण आणि अपघातही कमी होतील. ज्या मालकांच्या मोठ्या आणि लांबलचक कार असतील त्यांना जास्त पार्किंग फी आकारली जावी कारण त्यांच्या कारला जास्त जागा लागते, असे रोड सेफ्टी फाऊंडेशनचे विश्वस्त अशुतोष अत्रे यांनी म्हटले आहे.

मुंबई मोबिलिटी फोरमचे विवेक पै म्हणाले, वाहतुक कोंडी टाळण्यासाठी पार्किंग फी वाढवणे हा हुशारीचा निर्णय ठरू शकतो. मात्र, कंजेशन टॅक्स हा मुंबईसाठी व्यवहार्य नाही. कारण मुंबई शहर हे एका रेषेत पसरलेले आहे, शहराची चारही बाजूने योग्य प्रमाणात वाढ झालेली नाही.
गेल्या दशकापूर्वीपासून राज्यातील नागरी व्यवस्थापनाकडून कंजेशन टॅक्सबाबत अभ्यास सुरु आहे. मात्र, राजकीय इच्छाशक्तीची कमी असल्याने तसेच नागरिकांचा विरोध होईल या भितीने याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. लंडन, स्टॉकहोम, मिलान, सिंगापूर आणि सॅन डिएगो यांसारख्या जगातील महत्वाच्या मेट्रो शहरांमध्ये अशा प्रकारे कंजेशन टॅक्स आकारण्यात येतो.