दुरुस्तीला मुहूर्त सापडेना; कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार
पुरातन वास्तू वारसा लाभलेल्या कुलाबा परिसरातील गेट वे ऑफ इंडिया येथील जल पर्यटनासाठी आकर्षणस्थान बनलेला धक्का क्रमांक २ (जेट्टी) खचून भगदाड पडल्याच्या घटनेला दोन महिन्यांहून अधिक कालावधी लोटला. मात्र खचलेल्या धक्क्याच्या दुरुस्तीसाठी पालिकेला अद्याप मुहूर्त मिळू शकलेला नाही.
गणेश विसर्जनानिमित्त होणारी गर्दी आणि पावसाळा सरताच सुरू होणारी फेरीबोट सेवा लक्षात घेऊन या धक्क्याची तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे होते. मात्र निविदा प्रक्रियेअंती दुरुस्तीचे कंत्राट देण्यात आलेल्या कंत्राटदाराने हे काम करण्यास नकार दिल्यामुळे त्याचे नाव काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर धक्क्याच्या दुरुस्तीचे काम करून घेण्यासाठी अन्य कंत्राटदाराला पालिकेकडून विनवण्या करण्यात येत आहेत.
गेट वे ऑफ इंडिया आणि आसपासच्या परिसरात पावसाचे पाणी साचू नये यासाठी पालिकेने या विभागामध्ये पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे उभारले आहे. या पर्जन्य जलवाहिन्यांमधून वाहणारे पाणी गेट वे ऑफ इंडियावरील धक्का क्रमांक २ च्या खालून मोठय़ा वाहिनीच्या माध्यमातून समुद्रात सोडले जाते. गेट वे ऑफ इंडिया येथील धक्क्यांवर सतत धडकणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि मुसळधार पाऊस यामुळे धक्का क्रमांक २ खालील पर्जन्य जलवाहिनीचे नुकसान झाले असून पर्जन्य जलवाहिनीलगत धक्क्याची मोठय़ा प्रमाणावर धूप झाली आहे. या कारणांमुळे धक्क्याखाली मोठी पोकळी निर्माण झाली असून जूनमध्ये हा धक्का अचानक खचला. पालिकेच्या परिरक्षण विभाग, पुरातन वास्तू जतन विभागाच्या अधिकाऱ्यांनी खचलेल्या धक्क्याची २८ जून रोजी संयुक्तरीत्या पाहणी केली. संरचनात्मक सल्लागार कंपनीने पाहणी करून हा धक्का तात्काळ बंद करण्याची सूचना केली. त्यानुसार हा धक्का जलवाहतुकीसाठी बंद करण्यात आला. धक्क्याच्या दुरुस्तीसाठी पुरातन वास्तू जतन विभागाने निविदा मागविल्या होत्या. पुरातन वास्तू वारसा विभागाने निविदा प्रक्रियेअंती राजवीर कंपनीची या कामासाठी निवड केली. मात्र या कंत्राटदाराने घुमजाव करीत हे काम नाकारले. कंत्राटदाराने काम करण्यास नकार दिल्यामुळे त्याचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे याबाबतचा प्रस्ताव या विभागाने तयार केला असून वरिष्ठांची मंजुरी मिळताच या कंत्राटदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. नव्याने निविदा मागविण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता या विभागाने दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील कंत्राटदाराला हे काम करण्यासाठी विचारणा केली होती. तिसऱ्या क्रमांकावरील पॅरामाउंट कंपनीने काम करण्याची तयारी दर्शविली आहे.
गेट वे ऑफ इंडिया येथील धक्का क्रमांक २च्या दुरुस्तीचे काम पालिकेच्या पुरातन वास्तू विभागाकडून करण्यात येत आहे. कंत्राटदाराच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाली असून काम सुरू करण्यात येईल.
– किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, ‘ए’ विभाग